मुंबई : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात संपूर्ण राज्य हादरले असून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, गुरुवार, २४ एप्रिल रोजी या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला आहे.
मंगळवार, २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ नागरिकांचा मृत्यू झाला. यात डोंबिवलीतील ३, पुण्यातील २ तर नवी मुंबईतील एका व्यक्तीचा समावेश आहे. या सगळ्यांच्या मृत्यूने संपूर्ण राज्य हळहळले आहे.
सर्वांनीच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला आहे. काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये डोंबिवलीतील अतुल मोने, हेमंत जोशी,संजय लेले या तीन जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. त्यामुळे शहरात गुरुवारी डोंबिवली बंदची हाक देण्यात आली. तसेच भाजपच्या वतीने डोंबिवलीतील इंदिरा चौकात निदर्शने करण्यात आली. यासोबतच परभणी, मालेगाव, अमरावती यासह अनेक ठिकाणी गुरुवारी बंद पाळण्यात आला.