"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

    24-Apr-2025   
Total Views | 44
 
Pahalgam Terror Attack
 
 
Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी सांगितलंय. काय आहे नातेवाईकांच्या कुटुंबीयांनी तसेच बचावलेल्या पर्यटकांनी अनुभवलेली हल्ल्याची थरारक कहाणी...
 
टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हटलं
 
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये पुण्यातील दोन जिवलग मित्र संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोन्ही कुटुंबं एकत्र कश्मीरला गेली होती. जगदाळे पती पत्नींसोबत त्यांची मुलगी आसावरी होती तर कौस्तुभ गणबोटे आणि पत्नी हे दोघं सोबत होते. फिरायला गेलेल्या कुटुंबाचा आनंद क्षणात हिरावला गेला. दोन्ही कुटुंबे अजूनही मोठ्या धक्क्यात आहेत. हल्ल्यातून बचावलेल्या कौस्तुभ गणबोटे यांच्या पत्नी संगीता यांनी तिथं घडलेल्या प्रसंगाबद्दल माहिती देताना म्हटलं, "त्यांनी आमच्या इथे बसलेल्या एकाला अजान पढता है क्या विचारलं. त्याच्याशी बोलणं सुरू असताना आम्ही लगेच टिकल्या वगैरे काढून फेकल्या की जेणेकरुन आम्हाला मारायला नको म्हणून आणि अल्लाहू अकबर म्हणायला सुरुवात केली. यानंतर तो चालत पुढे गेला, आणि या दोघांना मारून टाकलं. तसंच आमच्यामागे बसलेल्या एका माणसाला मारुन टाकलं." संगीता यांनी सांगितलं की घटनास्थळी एकही सुरक्षारक्षक किंवा सैनिक तैनात असता तर आम्हाला मदत झाली असती. गोळीबार झाल्यानंतर पुढे काय घडलं, हेही त्यांनी सांगितलं. त्या म्हणाल्या, "जाताना आम्ही घोड्यावर बसून गेलो होतो तेव्हा आजिबात भीती वाटली नव्हती. येताना आमचे पाय गुडघ्यापर्यंत चिखलात जात होते, परंतु तसंच आम्ही पळत खाली आलो. चपला वगैरे तिथंच सोडून आलो. आमचे घोडेवाले मुसलमान होते. तरीही ते आम्हाला परत न्यायला आले, शेवटपर्यंत त्यांनी आम्हाला साथ दिली. तो घोडेवालाही ढसाढसा रडला. फार चांगली माणसं होती ती." संगीता यांनी सांगितलं की 'आम्हाला वाचवण्यासाठी एक मुसलमान पुढे आला पण त्यालाही त्यांनी गोळ्या घातल्या.''तो म्हणाला तुम्ही कशाला मारता? यांनी काय चुक केली आहे? त्याला तर कपडे काढून गोळ्या झाडल्या. इतकं क्रूर काम त्या दहशतवाद्यांनी केलं,' असं संगीता यांनी सांगितलं.
 
'त्या" देवमाणसाचे उपकार आयुष्यभर विसरणार नाही
 
दरम्यान संतोष जगदाळे यांची मुलगी आसावरी जगदाळेने त्या थरारक घटनेबाबत भयावह अनुभव सांगितलाय.आसावरी म्हणाली , ३० मिनिटे आम्ही चढून तिथं गेलो. जागा खूप सुंदर आहे. तिथे फोटो काढत असताना अचानक फायरिंग सुरू झाली. लोक सैरावैरा पळायला लागली. आम्हीही पळत जाऊन टेंटमध्ये लपलो होतो. गणबोटे काका खाली झोपले होते, अनेक लोक तिथल्या टेंटमध्ये लपली होती. अनेक लोकांवर फायरिंग झाली. एकजण आमच्याकडे आला त्याला पकडून गोळ्या मारल्या. माझ्या वडिलांना ३ गोळ्या लागल्या. माझे वडील जागेवर पडले होते. काकांना देखील दोन गोळ्या लागल्या. त्यांनी फक्त पुरुषानं मारलं. आम्ही तिथून पळून आलो. एका तिथल्या स्थानिकाने आम्हाला मदत केली. तिथल्या सगळ्या स्थानिकांनी भरपूर मदत केली, असंही तिने सांगितलं. पुढे ती म्हणाली, त्यावेळी मला चक्कर आली होती. मिलिटरीची टीम तिथे पोहोचली होती. सगळ्या जखमी लोकांना श्रीनगरमध्ये शिफ्ट केलं गेलं होतं. रात्री १२ वाजता कळलं की, काही जणांचा मृत्यू झाला आहे. आम्हाला ओळख पटवण्यासाठी नेण्यात आलं. मला तेव्हा कळलं की बाबांचा आणि काकांचा मृत्यू झाला आहे. तिथला देवासारखा एक माणूस आमच्यासोबत उभा होता. आम्ही त्यांचे आयुष्यभर उपकार विसरणार नाही. आर्मीने आम्हाला खूप मदत केली. माझे वडील माझ्या कुटुंबाचे एकमेव आधार होते. घरात तेच कमवते होते. आज मी माझ्या वडिलांचे अंत्यसंस्कार करून आले. माझ्यासाठी ते सगळं विसरणं खूप अवघड आहे.
 
'कलमा' वाचला म्हणून जीव वाचला
 
दरम्यान या घटनेत आसाममधीलही एक कुटुंब थोडक्यात बचावलं आहे. या हल्ल्यातून वाचलेल्या आसाम विद्यापीठातील असोसिएट प्रोफेसर देबाशीष भट्टाचार्य यांनी आपला भयावह अनुभव सांगितला आहे. ते आणि त्यांची पत्नी आसाम विश्वविद्यालयाच्या बंगाली भाषेच्या विभागात कार्यरत आहेत. ते त्यांची पत्नी आणि मुलासोबत काश्मीरला गेले होते. त्याचवेळी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी हल्ला केला. हल्ल्याच्या थोड्याच वेळाआधी देबाषिश भट्टाचार्य आपल्या पत्नी आणि मुलासह बैसरण येथील एका झाडाखाली विश्रांती घेत होते. तेव्हा अचानक बाजूला असणाऱ्या लोकांचा आवाज त्यांच्या कानावर पडला. त्यावेळी काही जणांना कुराणमधील कलमा वाचताना त्यांनी ऐकलं. परिस्थिती लक्षात घेत देबाषिश यांनीही कलमा वाचण्यास सुरुवात केली. त्यावेळी दहशतवाद्यांपैकी एक जण त्यांच्या दिशेने आला. त्यानं देबाषिश यांच्या बाजूला असणाऱ्या एका व्यक्तीच्या डोक्यात गोळी घातली. यानंतर त्या दहशतवाद्याने देबाषिश यांना तू काय करतोयस असं विचारलं, त्यावेळी तेव्हा बिथरुन न जाता तेआणखी मोठ्याने कलमा वाचू लागले. त्यानंतर तो दहशतवादी तिथून निघून गेला. त्यानंतर योग्य वेळ साधत देबाषिश यांनी कुटुंबासह त्यांनी तिथून पळ काढला. हल्ल्याच्या ठिकाणापासून धावत ते एका कुंपणाच्या दिशेने निघाले. त्यांनी कुंपण ओलांडले आणि ते जवळपास दोन तास वेगाने चालत राहिले. त्यांना रस्ता माहीत नव्हता. पण त्यांनी घोड्यांच्या खुरांच्या निशाणांचा माग काढत अखेर ते एका घोडेस्वाराजवळ पोहोचले. त्याच्या मदतीने ते त्यांच्या हॉटेलवर पोहोचले. ते खूप घाबरले होते, पण सुरक्षित होते. घटनेबाबत बोलताना भट्टाचार्य म्हणाले, "मला अजूनही विश्वास बसत नाही की मी जिवंत आहे." योग्य प्रसंगावधान दाखवल्याने देबाषिश आणि त्यांचे कुटुंबिय दहशतवाद्यांच्या तावडीतून निसटून सुखरुप परतले आहेत. देबाशीष यांच्या पत्नी मधुमिता दास यांचे बंधू नबेंदू दास यांनी या घटनेबाबत बोलताना म्हटलं की, सुदैवानं दाढी असल्यामुळे दहशतवादी त्यांना ओळखू शकले नाही, त्यामुळे देबाशीष यांचा जीव वाचला. देबाशीष भट्टाचार्य, त्यांची पत्नी आणि मुलगा हे सर्व सुरक्षीत असून, ते श्रीनगरमध्ये आहेत, अशी माहिती नबेंदू दास दिली आहे.
 
 
 

अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121