बीकेसीमध्ये स्थानकासाठी ७५ टक्के उत्खननाचे काम पूर्ण
24-Apr-2025
Total Views | 9
मुंबई (BKC Bullet Train Station): ‘नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ (एनएचएसआरसीएल)ने सोमवारी सांगितले की, “महानगरातील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन स्थानकासाठी सुमारे ७५ टक्के उत्खनन काम पूर्ण झाले आहे.”
‘एनएचएसआरसीएल’च्या प्रवक्त्याने सांगितले की, “भूमिगत बुलेट ट्रेन स्टेशनसाठी उत्खनन करण्यासाठी आवश्यक असलेल्या १८ लाख, ७२ हजार, २६३ घनमीटरपैकी सुमारे १४ लाख घनमीटर मातीकाम उत्खनन करण्यात आले आहे.”
‘मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प’ महाराष्ट्रात वेगाने प्रगती साधत आहे. महाराष्ट्रात या प्रकल्पासाठी मुंबईत दोन प्रमुख ठिकाणी मोठी विकासकामे सुरू आहेत. त्यांपैकी वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील मुंबई हायस्पीड स्थानक आणि बीकेसी ते शिळफाटापर्यंत जाणारा २१ किमी लांबीचा भूमिगत बोगदा ही दोन प्रमुख कामे आहेत.
‘नॅशनल हाय-स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड’ने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील बीकेसी या भूमिगत स्थानकासाठी ७५ टक्के खोदकाम पूर्ण झाले आहे, एकूण १८.७ लाख घनमीटरपैकी १४ लाख घनमीटर माती आतापर्यंत खोदण्यात आली आहे. स्टेशनसाठी बेस स्लॅबसाठी कास्टिंग आधीच सुरू झाले आहे, ज्यामध्ये जवळजवळ २५ हजार घनमीटर काँक्रीट आधीच टाकण्यात आले आहे, अशीही माहिती देण्यात आली आहे.
या खोल भूमिगत स्लॅबसाठी आवश्यक असलेले एकूण काँक्रीट अंदाजे दोन लाख घनमीटर असण्याची शक्यता आहे. ‘सिकंट पायलिंग’ ही भूमिगत बांधकामांसाठी मजबूत संरक्षक भिंती बांधण्यासाठी वापरली जाणारी एक पद्धत पूर्ण झाली आहे.
बीकेसी ते शिळफाटा बोगद्याचे कामही प्रगतिपथावर
बीकेसी ते शिळफाटा यादरम्यान बोगद्याचे कामही प्रगतिपथावर आहे. बोगद्यासाठी ३.३ किमी लांबीचे काम पूर्ण झाले आहे. २१ किमी लांबीचा हा बोगदा ‘मुंबई महानगर प्रदेश’ (एमएमआर)मधील हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉरचा एक महत्त्वाचा घटक असेल. २१ किमीपैकी १६ किमी बोगदा ‘टनेल बोरिंग मशीन’ (टीबीएम)द्वारे आणि शेवटचा पाच किमी ‘न्यू ऑस्ट्रियन टनलिंग मेथड’ (एनएटीएम) द्वारे बांधला जाईल. सध्या शिळफाटाच्या दिशेने ‘अॅडिशनल ड्रिव्हन इंटरमीडिएट टनेल’ पोर्टलसह इतर दोन बोगद्यांच्या साहाय्याने बांधकाम सुरू आहे. विक्रोळी आणि सावली येथील दोन उभ्या शाफ्टने अनुक्रमे ५६ मीटर आणि ३९ मीटर खोलीं गाठली आहे. पालघर जिल्ह्यात, ‘एनएटीएम’द्वारे सात पर्वतीय बोगद्यांसाठी कामदेखील सुरू आहे.