मत्स्यव्यवसायमंत्री नितेश राणे यांची माहिती;
सर्वंकष धोरण तयार करण्याचे निर्देश
24-Apr-2025
Total Views | 7
मुंबई (Nitesh Rane): “सागरी महामंडळाच्या जागांचा व्यावसायिक वापर करून उत्पन्नवाढीवर भर दिला जाणार आहे. त्यामुळे सागरी महामंडळाने त्यांच्या जागेच्या वापराबाबत सजग आणि कडक भूमिका घ्यावी. तसेच या जागांवर होर्डिंगची उभारणी, त्यावरील जाहिरात आणि जागांच्या व्यावसायिक वापराबाबत सर्वसमावेशक धोरण तयार करावे,” असे निर्देश मत्स्यव्यवसाय आणि बंदरेमंत्री नितेश राणे यांनी बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले. सागरी महामंडळाच्या जागांच्या व्यावसायिक वापराविषयी धोरण ठरवण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक संपन्न झाली. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते. यावेळी सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये यांसह महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
१०० कोटींचे उद्दिष्ट
“सागरी महामंडळांच्या मुंबई महानगर क्षेत्रातील जागांवर होर्डिंग उभारण्यासाठी धोरण राबवताना त्यातून जास्तीत जास्त महसूल निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत. होर्डिंगच्या माध्यमातून किमान १०० कोटी महसूलनिर्मितीचे उद्दिष्ट ठेवावे. तसेच यासाठी स्पर्धात्मकता निर्माण करावी,” असे मंत्री राणे म्हणाले.
मंत्री नितेश राणे पुढे म्हणाले, “खुल्या निविदा मागवाव्यात. होर्डिंग महामंडळाने स्वतः उभारावीत व त्यावरील जाहिरातींची हक्क विक्री करावी. अशा पद्धतीने महसूलवाढीसाठी मदत होईल. याशिवाय, महामंडळाच्या जागांचा व्यवसायिक वापर होतो, त्याचेही नियमन करणे गरजेचे आहे.”
“त्यासाठी सर्व जागा भाडेपट्ट्याने देताना स्पर्धात्मकता आणण्याच्या दृष्टीने निविदा मागवण्याची कार्यावाही करावी. अनेक वर्षे एकाच जागी व्यवसाय केला जातो. पण, नियमानुसार भाडे दिले जात नाही. अशा प्रकरणी संबंधित अधिकार्यावंर कारवाई करावी,” अशा सूचनाही मंत्री राणे यांनी बैठकीत दिल्या.