प्रत्येकाने एक महिन्यात एक बांगलादेशी-रोहिंग्या शोधून काढा : मंत्री मंगल प्रभात लोढा
जम्मू काश्मीरमधील हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध मोर्चा
24-Apr-2025
Total Views | 15
मुंबई : पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवार, २३ एप्रिल रोजी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
गिरगाव येथील शहीद तुकाराम ओंबळे चौकात हा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला. यावेळी एक है तो सेफ है, सनातन हिंदू एकता जिंदाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद अशा घोषणांचे फलक हातात दाखवण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, "जम्मू काश्मीरमध्ये शाहिद झालेल्या लोकांचा काहीही दोष नसताना केवळ ते हिंदू आहेत म्हणून त्यांना मारण्यात आले. तुकाराम ओंबळे यांनी दहशतवादी कसाबला इथे जिवंत पकडताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले होते. त्यामुळे हा चौक सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. या घटनेत पाकिस्तानचा हात आहे. त्यांना कितीही समजावून सांगितले तरी काही होणार नाही. कधीतरी अंतिम युद्ध होईल," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "या घटनेनंतर सरकार आपले काम करत आहे. पण आपण फक्त दिवे लावून आणि भाषण करून थांबायचे नाही. तर मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्याना शोधून काढून त्यांचा बहिष्कार करायला हवा. ते जिथे कुठे असतील तिथून त्यांना शोधून काढा. जीवनात देशासाठी काहीतरी करायचे असल्यास एक महिन्यात एक रोहिंग्या किंवा बांगलादेशी शोधून पोलिसात तक्रार दाखल करावी. असे केल्यास मुंबईतील बांगलादेशी आणि रोहिंग्यांची घुसखोरी बंद होईल," असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.