उथळ पाण्याला खळखळाट फार असतो,असे म्हणतात.खासदार संजय राऊतांचे वर्तनही अगदी तसेच.पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हळहळत असताना, हे त्याचे राजकारण करण्यात गुंग.या दहशतवादी हल्ल्याला भाजपचे द्वेषाचे आणि धर्माचे राजकारण जबाबदार असल्याचा दावा त्यांनी केला.त्याही पलिकडे जात,संरक्षण खर्चात कपात करुन तो पैसा ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरल्याचे विधान त्यांनी केले.वास्तविक,धर्म विचारून हिंदूंना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी कृत्याचा राऊतांनी आणि त्यांच्या पक्षाने निषेध नोंदवणे क्रमप्राप्त होते. पण, त्यात त्यांनी लांगूलचालनाची संधी शोधली.समाजाला विभाजित करण्याच्या आणि देशात फूट पाडण्याच्या या जिहादी प्रयत्नांना बहुधा ‘उबाठा’ गटाचे समर्थन असावे.म्हणूनच त्यांच्या पक्ष प्रमुखाने साधे निषेध नोंदवणारे ट्वीट करण्याचे औदार्य दाखवले नाही. असो! त्यांचे राजकारण त्यांना लखलाभ.
पण, संरक्षण खर्चात कपात करून तो पैसा ‘लाडकी बहीण’ योजनेसाठी वापरल्याचा दावा संजय राऊतांसारख्या संपादकाने करणे म्हणजे अगदीच हास्यास्पद. संरक्षण विभाग हा पूर्णतः केंद्र सरकारच्या अखत्यारित येतो आणि लाडकी बहीण योजना हा विषय राज्याच्या अधिकारक्षेत्रात. त्यामुळे या याजनेसाठी संरक्षण खात्याचा निधी कोणत्या मार्गाने वळवला, याचे पुरावे त्यांनी सादर करावे. अन्यथा या दिशाभूल करणाऱ्या विधानांबाबत माफी मागावी. पण, तेवढे सौजन्य ते दाखवणार नाहीत. कारण, दुकान बंद करावे लागेल.
अमित शाह यांचा अपयशी आणि अपशकूनी गृहमंत्री असा उल्लेख देखील राऊतांनी केला. सरकारे पाडण्यात गुंतलेल्या शहांचे देशाच्या सुरक्षेकडे लक्ष नाही, असे त्यांचे म्हणणे. बहुधा होळीला पिलेल्या भांगेची झिंग अजून उतरली नसल्याने राऊत अशी विधाने करीत असावेत. पण, भारताचे आजवरचे सर्वात यशस्वी गृहमंत्री असा ज्यांचा उल्लेख जगभरात केला जातो, त्यांच्याविषयी असे उद्गार काढायला यांची जीभ कचरतेच कशी? लांगुलचालनाच्या नादात राऊत आणि त्यांचा पक्ष कोणत्या थराला जातोय, याचे भान त्यांनी बाळगावे. दहशतवादी हल्ल्यात जीव गमवलेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याआधीच सुरू झालेला हा राजकारणाचा पोरखेळ थांबवा राऊत!