मुंबई : आपल्या रुचकर आणि दर्जेदार उत्पादनांच्या जोरावर ग्राहकांच्या मनावर गेली ७५ वर्षे अधिराज्य गाजविणारे चितळे बंधू आपली जगप्रसिद्ध बाकरवडी आता नव्या ‘मिनी’ स्वरूपात घेऊन आले आहेत. चितळेंच्या या खमंग बाकरवडीचे हे नवे 'मिनी' रूप खवय्यांच्या विशेष पसंतीस देखील उतरत आहे.
सध्या देशभरात आयपीएलचा उत्साह शिगेला पोहोचत असताना या क्रिकेट फिव्हरचे औचित्य साधत चितळे बंधूंनी ही ‘मिनी’ बाकरवडी सादर केली आहे. मिनी बाकरवडीच्या प्रसिद्धीसाठी तीन नव्या जाहिरातीही प्रदर्शित करण्यात आल्या असून सुप्रसिद्ध मराठी अभिनेता अमेय वाघ व आयुष मेहरा यांच्यावर चित्रित झालेल्या या जाहिरातींमध्येही क्रिकेट आणि आयपीएलवर विशेष भर देण्यात आला आहे. 'गेट मॅच रेडी विथ चितळे बाकरवडी' अर्थात 'आयपीएल क्रिकेट सामन्याची तयारी चितळे बाकरवडी सोबतच' असा संदेश या जाहिरातींमधून देण्यात आला आहे.
मिनी बाकरवाडीच्या साथीने क्रिकेटप्रेमींचा आयपीएल सामन्यांचा थरार अधिक रोमांचक होईल असा विश्वास व्यक्त करीत चितळे बंधूं मिठाईवालेचे भागीदार इंद्रनील चितळे म्हणाले, "आयपीएल दरम्यान क्रिकेट चाहते वेगवेगळ्या संघांमध्ये जरी विभागले गेले तरी खाद्यपदार्थ खऱ्या अर्थाने त्यांना एकत्र बांधून ठेवतात. आता चितळे बंधूंच्या या नव्या मिनी बाकरवडीसोबत आम्ही क्रिकेटरसिकांच्या रोजच्या क्रिकेट दिनचर्येचा एक अविभाज्य भाग बनणार आहोत याचा आम्हाला विशेष आनंद आहे.”
आयपीएल ही भारतातील एक नावाजलेली आणि प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली क्रिकेट स्पर्धा आहे त्यामुळेच आम्ही या क्रिकेट हंगामाच्या निमित्ताने मिनी बाकरवडी बाजारात आणण्याचा निर्णय घेतला. नजीकच्या भविष्यात या नव्या उत्पादनामुळे व जाहिरातींमुळे आम्ही भारताच्या नव्या बाजारपेठांमध्ये निश्चितच विस्तार करू, याची आम्हाला खात्री आहे असे चितळे बंधूंचे भागीदार केदार चितळे म्हणाले.
चितळे बंधू सध्या ७५ वर्षांची यशस्वी वाटचाल पूर्ण करून आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरे करीत आहेत. मुंबई इंडियन्स संघासोबत ते ‘स्नॅकिंग पार्टनर’ म्हणूनही जोडलेगेले आहेत. अशातच ही मिनी बाकरवडी क्रिकेट रसिकांना चितळेंसोबत जोडणारा महत्वाचा दुवा ठरणार आहे हे विशेष.
चितळे बंधूंबद्दल थोडक्यात
१९७६ साली, चितळे बंधूंनी महाराष्ट्रातील खास आणि लोकप्रिय खाद्यपदार्थ – बाकरवडी – सादर केली, जी अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरली. या अनोख्या चवीच्या पदार्थाची वाढणारी मागणी लक्षात घेऊन, १९९६ मध्ये चितळे बंधूंनी भारतात पहिल्यांदाच यंत्राच्या सहाय्याने बाकरवडी तयार करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. यामुळे दर्जा आणि चव यामध्ये सातत्य राखले गेले आणि बाजारपेठेची वाढती मागणी पूर्ण करता आली.
पुण्याच्या गजबजलेल्या रस्त्यांपासून ते अमेरिका, युरोप, आखाती देश आणि त्यापलीकडेहीअनेक घराघरांपर्यंत, चितळे बंधू आणि चितळे बंधू अमेरिकाज हे नाव आता अनेक सण-उत्सवांचं अविभाज्य घटक बनलं आहे. गोड पदार्थांपासून ते तिखट-चविष्ट खाद्यपदार्थांपर्यंत, २५० हून अधिक विविध उत्पादनांची पर्वणी ग्राहकांना उपलब्ध आहे.
चितळे बंधूंच्या गौरवशाली वाटचालीकडे मागे पाहत असतानाच, कंपनीने भविष्याकडे लक्ष केंद्रित केले आहे – उत्तम दर्जाची उत्पादने आणि खाद्यानुभव ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याच्या वचनासह! सचिन तेंडुलकर यांच्या उपस्थितीत सुरू झालेला ७५ वर्षांचा अमृतमहोत्सव हा चितळे बंधूंची परंपरा आणि आधुनिकता या संगमातला नवा अध्याय आहे, जो कंपनीच्या पुढील यशस्वी प्रवासाची सुरुवात करतो.