मुंबई, महाड नवेघर येथील २५ एकर जमीनीपैकी ३ गुंठे जमीन ही कुणबी समाजाला देण्यात आली आहे. तर त्याच ठिकाणी उपलब्ध असलेली सहा गुंठे जागा बुरुड समाजाला समाजमंदिर आणि विद्यार्थी वस्तीगृहासाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पुढील १५ दिवसात प्रस्ताव देण्याचा आदेश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मंत्रालयातील दालनात गुरुवारी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे,महसूल विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, बुरुड समाजाने सामाजिक कामासाठी जागा मागितली आहे. सदर जागा ही जिल्हा परिषदेची असून ती पशूसंवर्धन विभागाला २००८ साली देण्यात आली आहे. ती जागा पशुसंवर्धन विभागाने विकसित केलेली नसून सध्या ही जागा बुरुड समाजाला आवश्यक असल्याने त्यांना देण्यात यावी. त्याच्या बदल्या रायगड जिल्हाधिकारी यांनी महाड शहरात महसूल विभागाची उपलब्ध असलेली जागा पशुसंवर्धन विभागाला द्यावी असे आदेशही बावनकुळे यांनी दिले.
रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले म्हणाले, पशुसंवर्धन आणि महसूल विभागाने या जागेबाबत सकारात्मक निर्णय घेतला हे महत्वपूर्ण आहे. विकासाच्या दृष्टीने असे निर्णय महत्वपूर्ण ठरतात. जिल्हाधिकारी यांनी तातडीने याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करावा.
जागेची अदलाबदली आणि बुरुड समाजाला अटी शर्तींवर जागा उपलब्ध करुन देण्याबाबत असे दोन प्रस्ताव सादर करण्यात यावेत अशा सूचनाही महसूलमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केल्या.