अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली समाजद्रोही वक्तव्य करणे, ही काही प्रगत विचारांची ओळख ठरू शकत नाही. अलीकडे दिग्दर्शक अनुराग कश्यप याने ब्राह्मण समाजाविरोधात वापरलेली अर्वाच्य आणि जातवाचक भाषा ही केवळ असंस्कृतच नव्हे, तर त्याच्या वैचारिक अहंकाराचे ठळक दर्शन घडवणारी आहे. गंमत म्हणजे, स्वतः डावी-उजवी-मध्य अशी कोणतीही विचारसरणी नाकारून, स्वतंत्र विचारसरणीचा पुरस्कार करणारा अनुराग कश्यप हा नेहमी एका ठराविक विचारधारेच्या प्रचारातच दिसतो.
भारतीय संस्कृती, हिंदू धर्म, परंपरा आणि देशाभिमान यावर सातत्याने टीका करत, स्वतःला ‘आधुनिक’ समजणे ही त्याची सवयच झाली आहे. ‘केरला स्टोरी’सारख्या वास्तववादी चित्रपटाला ‘प्रपोगंडा’ म्हणणे, हे त्याच सवयीचे उदाहरण. विशेष म्हणजे, यातून हे स्पष्ट दिसते की, समाजातील पीडितांच्या वेदना, त्यांच्या कुटुंबीयांचे अपरिमित दुःख याचा जराही विचार, अनुराग याच्या संवेदनाशून्य मनाला शिवत नाही. ‘लव्ह जिहाद’मुळे उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबांचे दुःखही, त्याला ‘प्रपोगंडा’ वाटते. कारण, सर्वकाही स्वतःच्या साचेबद्ध चौकटीतूनच पाहण्याची वृत्ती त्याच्या अंगी बाणली आहे.
इतकेच नाही तर स्वतः भारतीय चित्रपटसृष्टीत राहून, त्याच सृष्टीवर सतत टीका करणे आणि कामे मिळाली नाहीत की, ‘माझ्यावर अन्याय होतोय’ अशी तक्रार करणे, हे त्याच्या दुटप्पी स्वभावाचे प्रतीक आहे. त्यांच्या अलीकडच्या ब्राह्मण समाजाबाबतच्या वादग्रस्त वक्तव्यावर झालेल्या टीकेनंतर, अनुरागने ‘मी मर्यादा विसरलो’ म्हणत माफी मागितली. पण, त्यामागचा सूरही अहंकाराचाच होता. ‘माझे शब्द मी मागे घेऊ शकत नाही, फार फार तर माफी मागू शकतो’ असे म्हणणे म्हणजे, माफी मागून समाजावर उपकारच करण्यासारखे आहे. अनुराग अशा कृतीला बिनधास्तपणा म्हणून मिरवतो. आज अनेक नवयुवक अनुरागच्या याच बिनधास्तपणाचे चाहते आहेत.
समाजाला अशा ‘बिनधास्तपणाचे’ किंवा ‘निर्भीडतेचे’ आकर्षण असायला हरकत नाहीच, पण अश्लीलता, जातिवाचक विखार आणि अनादर याला जर अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले, तर ती लोकशाहीची शोकांतिकाच ठरेल. म्हणूनच समाजाने सजग राहून, या तथाकथित स्वतंत्र विचारवंतांच्या असंस्कृततेचा स्पष्ट प्रतिवाद करणे आज काळाची गरज आहे.
सोयीचेे राजकारण
छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी आदिवासी समाज हा हिंदू समाजाचा मोठा भाग असल्याचे म्हटले आणि त्यावरून राजकीय वादळ निर्माण झाले. वास्तविकपणे मुख्यमंत्री साय यांनी त्यांच्या संबोधनामध्ये सांगितले की, “आदिवासी समाज हा सरना उपासना पद्धतीवर विश्वास ठेवतो.” यामध्ये सरना हे एक पवित्र ठिकाण आहे जिथे झाडांचा समूह असतो. तिथे देव-देवतांचे प्रतीक म्हणून, दगडांची पूजा केली जात असल्याचेही साय यांनी म्हटले.
तसेच, शंकर पार्वतीसारखीच गौरा-गौरीपूजन पद्धती आदिवासी समाज पिढ्यान्पिढ्या करत आला आहे. आदिवासी समाजातही हिंदू असण्यावरून मतभेद आहेत. तथापि, साय यांच्या विधानाकडे केवळ राजकीय चष्म्यातून पाहणे योग्य नाही. पुरीचे शंकराचार्य निश्चलानंद सरस्वती यांनी पूर्वी यासंदर्भात ठळक मतप्रदर्शन केले आहे. “आदिवासींची उपासना पद्धती भिन्न असली, तरी ती हिंदू परंपरेतीलच आहे. मूळ हिंदू धर्माच्या व्यापक पटात अनेक पंथ, उपपंथ, पूजा-पद्धती आणि परंपरा समाविष्ट आहेत. आदिवासी संस्कृतीही त्याच परिघातली आहे,” ही गोष्ट ऐतिहासिक आणि आध्यात्मिकदृष्ट्याही स्पष्ट आहे. परंतु, मुख्यमंत्री साय यांच्या वक्तव्यावर विरोधी प्रतिक्रिया देणारे, ख्रिश्चन मिशनरी धर्मांतरणाच्या व्यापक संकटावर मात्र सोयीस्कर मौन धारण करतात.
आज छत्तीसगढसह संपूर्ण भारतात आदिवासी समाजात धर्मांतराचे प्रमाण झपाट्याने वाढते आहे. आरोग्य, शिक्षण, सेवा या नावांखाली पसरलेले ख्रिश्चन मिशनरी जाळे, पारंपरिक श्रद्धांना पोखरत आहे. आदिवासी समाजाला हिंदू म्हणण्यास जेवढा विरोध केला जातो, तेवढ्याच कटिबद्धपणे मिशनर्यांपासून त्यांचे रक्षण का केले जात नाही हा प्रश्नच आहे? त्यांच्या मूळ श्रद्धा, जीवनपद्धती, देवपूजा, निसर्गपूजन यांचे अस्तित्व का दुर्लक्षित केले जाते? मुख्यमंत्री साय यांचे विधान हे धार्मिक वास्तव अधोरेखित करणारे आहे.
हेे ऐकताना ज्यांना अस्वस्थता वाटते, त्यांनी स्वतःला विचारावे ही अस्वस्थता सत्यामुळे आहे की, आपल्याच राजकीय अजेंड्याला बसणार्या धक्क्यामुळे? आदिवासींच्या ओळखीवरून जो वाद निर्माण केला जातोय, तो खरंतर त्यांचे अस्तित्व धोक्यात घालणार्या शक्तींविरोधात निर्माण झाला पाहिजे. अन्यथा, सोयीचे हे राजकारण, उद्या आदिवासी समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न बनून उभे राहील.
- कौस्तुभ वीरकर