टायगर श्रॉफला ठार मारण्याची धमकी; बनावट कटाचा पर्दाफाश, पंजाबमधून एकजण अटकेत! सविस्तर जाणुन घ्या...

    23-Apr-2025   
Total Views | 8
 
 
 
threat to kill tiger shroff fake conspiracy exposed, one arrested from punjab know the details...
 
 
 
मुंबई : बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो टायगर श्रॉफला ठार मारण्याचा बनावट कट उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी मुंबई पोलिसांना एका व्यक्तीकडून फोन आला, ज्यामध्ये त्याने असा दावा केला की, एका सिक्युरिटी एजन्सीच्या मालकाने त्याला टायगर श्रॉफचा खून करण्यासाठी सुपारी दिली आहे. त्यासाठी त्याला दोन लाख रुपये आणि रिव्हॉल्वर दिल्याचे त्याचे म्हणणे होते.
 
या धक्कादायक कॉलनंतर मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. खार पोलीस ठाण्यात तात्काळ एफआयआर नोंदवण्यात आली आणि आरोपीला पंजाबमधील कपूरथला येथे अटक करण्यात आली.
 
लोकमत टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मनीष कुमार सुजिंदर सिंग (वय ३५) असे आहे. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सिंगने सांगितले की, तो कामावर वारंवार गैरहजर राहिल्यामुळे पगार कपात करण्यात आली होती, आणि त्यामुळे तो चिडलेला होता. व्यवस्थापनाविरुद्ध सूड उगवण्यासाठी आणि कंपनीची प्रतिमा मलीन करण्यासाठी त्याने हा खोटा कट रचल्याची माहिती समोर आली आहे.
 
खार पोलिसांनी मनीष कुमार सिंग याच्याविरोधात IPC कलम ३५३ (२), २१२ आणि २१७ अंतर्गत खोट्या बातम्या पसरवणे आणि सामाजिक अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे.
 
दरम्यान, टायगर श्रॉफ सध्या 'बागी ४' या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच आपल्या ३५व्या वाढदिवसानिमित्त त्याने ‘बागी ४’चा नवा पोस्टर शेअर केला होता, ज्यात त्याचा 'रॉनी'चा अधिक घातक आणि वेगळा अवतार पाहायला मिळतोय.
 
टायगरने पोस्टमध्ये लिहिलं, ''ज्या फ्रँचाईजीनं मला ओळख दिली, मला एक अ‍ॅक्शन हिरो म्हणून स्वत:ला सिद्ध करण्याची संधी दिली, तीच फ्रँचाईजी आज मला नव्याने घडवत आहे. यावेळी तो पूर्वीसारखा नाही, पण तरीही तुम्ही त्याला तितक्याच प्रेमाने स्वीकाराल, अशी आशा आहे. #कृतज्ञता”
 
'बागी ४'चे दिग्दर्शन ए. हर्षा यांनी केले असून या चित्रपटात टायगरसोबत संजय दत्त, हरनाज संधू आणि सोनम बाजवा यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२५ रोजी प्रदर्शित होणार आहे.






अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121