मुंबई : २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम परिसरातील बैसरन खोऱ्यावर अज्ञात दहशतवाद्यांनी भीषण हल्ला चढवला. निसर्गसंपन्न अशा या ठिकाणी पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर बेछूट गोळीबार करण्यात आला. या अमानवी कृत्यात २६ जणांनी प्राण गमावले असून, मृतांमध्ये २२ भारतीय, २ विदेशी पर्यटक आणि २ स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. अनेक जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
ही धक्कादायक घटना समोर आल्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. सुरक्षित पर्यटनस्थळ म्हणून ओळख असलेल्या पहलगाममध्ये घडलेला हा प्रकार हा अत्यंत चिंताजनक असून, देशातील आणि परदेशातील नागरिकांनी या घटनेबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.
दहशतवादी हल्ल्यानंतरचा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून, त्यातील दृश्यं अंगावर शहारे आणणारी आहेत. या हल्ल्याचा व्यक्तिगत आघात अभिनेता प्रवीण तरडे यांच्यावर झाला आहे. सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर करत त्यांनी सांगितले की, त्यांच्या अतिशय जिवलग मित्राचा या घटनेत मृत्यू झाला आहे.
प्रवीण तरडे यांनी लिहिलं आहे, “आतंकवाद दारात आला... माझा मित्र या हिंसाचारात हरपला. संतोष, माफ कर. आम्ही काहीही करू शकलो नाही.” त्यांच्या या पोस्टवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया देत दुःख व्यक्त केलं आहे.
या घटनेवर स्नेहल तरडे यांनीही कठोर शब्दांत संताप व्यक्त केला आहे. आपल्या पोस्टमध्ये त्या म्हणतात, “ते उघडपणे गोळ्या झाडतात आणि आपण त्यांच्या विरोधात बोलताना स्वतःला थांबवतो – ही किती विदारक स्थिती आहे. मनात इतका राग आहे की कितीही कठोर भाषा वापरली, तरी हे दुःख आणि अस्वस्थता कमी होणार नाही.”
देशातील शांतता, पर्यटकांची सुरक्षा आणि राष्ट्रीय एकात्मतेला हादरवणाऱ्या या घटनेमुळे पुन्हा एकदा काश्मीरमधील परिस्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकार आणि सुरक्षा यंत्रणा हल्लेखोरांचा तपास लावण्यासाठी कामाला लागल्या आहेत. दरम्यान, देशभरातून या क्रूर घटनेचा निषेध आणि शहीद झालेल्या निरपराध पर्यटकांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.