पंडित दीनदयाळ उपाध्याय यांनी मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये दि. 22 ते 25 एप्रिल,1965 दरम्यान एका ऐतिहासिक व्याखानमाला सादर केली होती. त्या माध्यमातून ‘एकात्म मानवदर्शन’ आणि ‘अंत्योदय’ अशा विचारांची दीनदयाळजींनी मांडणी केली. याच पार्श्वभूमीवर ‘एकात्म मानवदर्शन हीरक महोत्सवा’चे आयोजन महाराष्ट्र शासनातर्फे रामनारायण रुईया महाविद्यालयामध्ये करण्यात आले आहे. याचे औचित्य साधून पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या राष्ट्रोद्धारक विचारांचा घेतलेला आढावा...
11 फेब्रुवारी 1968 रोजी भारतीय जनसंघाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष पं. दीनदयाळ उपाध्याय यांचा मृतदेह, मुगलसराय जंक्शन (आताचे पं. दीनदयाळ उपाध्याय जंक्शन) येथे सापडला. केरळमधील कलिकत येथे पार पडलेल्या अधिवेशनात, देशभरातून आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड केली होती. डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेल्या केरळमध्ये, जनसंघाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या अध्यक्षासाठी भव्य मिरवणूक काढून एक सशक्त राजकीय संदेश दिला होता. भारतीय जनसंघाची वाढती ताकद आणि समाजातील असलेला प्रभावच, त्यांच्या हत्येमागचे कारण ठरले. ही हत्या आजही एक न सुटलेले कोडे आहे.
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचा जन्म दि. 25 सप्टेंबर 1916 रोजी, भगवतीप्रसाद आणि रामप्यारी देवी यांच्या पोटी झाला. त्यांना बालपणापासूनच संघर्षमय जीवनाची साथ होती. पण, त्यांच्या बुद्धिमत्तेची चमक लहानपणापासूनच दिसून येत होती. 1937 साली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले आणि संघाच्या विचारांनी प्रभावित होऊन, 1942 साली पूर्णवेळ प्रचारक झाले. त्यांचा संपूर्ण जीवनप्रवास अत्यंत साधा, कष्टमय पण समाजसेवेला समर्पित होता.
ते उत्कृष्ट विचारवंत, लेखक आणि दूरदृष्टी असलेले राजकारणी होते. स्वतंत्र भारतासाठी कोणती दिशा योग्य, यावर अनेक विचार मांडले जात होते. मात्र, बरेच उपाय परकीय विचारांवर आधारित होते. परंतु, त्यावेळी दीनदयाळ यांनी स्पष्ट सांगितले, भांडवलशाही, साम्यवाद किंवा समाजवाद हे परकीय विचार भारतासाठी योग्य नाहीत. त्यांनी भारतीय संस्कृती, मूल्य आणि परंपरेवर आधारित, एकात्म मानववाद हा विचार मांडला. आज या विचारसरणीचे महत्त्व भारतातच नव्हे, तर जागतिक स्तरावरही वाढले आहे. केंद्रातील मोदी सरकारसह विविध राज्यांतील भाजप सरकारे, त्यांच्या विचारांचा आधार घेत समाजकल्याणाच्या योजना राबवत आहेत.
दीनदयाळ यांच्या विचारांचा गाभा हा व्यक्ती, कुटुंब, समाज आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद आहे. केवळ भौतिक नव्हे, तर मानसिक व आध्यात्मिक उन्नती, रोजगार निर्मिती, पर्यावरण संवर्धन आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ‘अंत्योदय’ अर्थात, समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवणे, हा त्यांच्या विचारांचा मूलाधार आहे. त्यांनी ‘राष्ट्रप्रथम’ हा मूल्यधर्म अंगीकारला होता.
2014 साली नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या केंद्र सरकारने आणि विविध राज्यांतील भाजप सरकारांनी, पं. दीनदयाळ यांच्या विचारांची अंमलबजावणी सुरू केली. दीनदयाळ यांनी सांगितले होते की, राष्ट्र फक्त भौतिक साधनांनी नव्हे, तर प्रत्येक नागरिक आत्मनिर्भर झाल्यावरच घडते. याच विचारांचा पाठपुरावा करत मोदी म्हणतात की, ‘आत्मनिर्भर भारत’ हे केवळ एक धोरण नसून, 130 कोटी भारतीयांचा संकल्प आहे!
गरीब कल्याणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने, ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने’अंतर्गत 80 कोटी नागरिकांना मोफत रेशनची हमी दिली. ‘वन नेशन, वन राशन कार्ड’ योजनेच्या माध्यमातून, देशातील सर्व भागांमध्ये मजुरांना रेशनची सुविधा मिळत आहे. शेतकर्यांना किमान आधारभूत किंमत मिळत आहे, तर ‘प्रधानमंत्री किसान सन्मान निधी’मधून 11 कोटी शेतकर्यांना, आर्थिक साहाय्यही दिले गेले आहे. कापड उद्योगासाठी अनेक योजना राबवण्यात आल्या असून, या क्षेत्रातील उद्योग व कामगारांच्या कल्याणासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
खादी खरेदीचे आवाहन करून, खादीला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यामुळे खादीच्या विक्रीत चारपट वाढ झाली असून, ही एक अभिनंदनाची बाब आहे. ‘प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत सुमारे 3.25 कोटी गरिबांना पक्की घरे उपलब्ध करून देण्यात आली असून, त्या घरांची चावी महिलांच्या हाती सोपवण्याचे कार्य अत्यंत स्तुत्य आहे. स्वस्त घरे उपलब्ध करून देण्यासाठी, मध्यम व निम्मवर्गीय कुटुंबांना चार टक्के दराने स्वस्त व्याजदरात कर्ज मिळत आहे. त्यामुळे गरिबांच्या घराचे स्वप्न साकार होत आहे.
‘आयुष्मान भारत योजने’च्या माध्यमातून, 50 कोटी नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंतच्या मोफत उपचारांची सुविधा मिळत आहे आणि त्यामुळे निरोगी जीवनशैलीचा मार्ग मोकळा झाला आहे. जन औषधी केंद्रांद्वारे स्वस्त औषधे उपलब्ध करून देण्यात येत असून, या योजनेमुळे आतापर्यंत सर्वसामान्य जनतेची सुमारे 30 हजार कोटी रुपयांची बचत झाली आहे. ‘जल जीवन मिशन’अंतर्गत 15 कोटी घरांमध्ये, स्वच्छ पाणी पोहोचवण्याचे कार्य पूर्ण झाले आहे. गरीब कल्याणासाठी सरकारने घेतलेल्या या सर्व प्रयत्नांमुळे, मागील दहा वर्षांत सुमारे 25 कोटी गरीब लोक गरिबी रेषेखालील स्थितीतून बाहेर आले आहेत.
पंडित दीनदयाळ उपाध्याय म्हणाले होते की, “जर भारतासारखा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा देश सैनिक दृष्टिकोनातून आत्मनिर्भर झाला, तर जागतिक शांततेला धोका निर्माण होण्याची शक्यता कमी होईल. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने भारताला सैन्यदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक व अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ‘राफेल’ विमानांची मागणी पूर्ण करण्यात आली. हलक्या लढाऊ विमान ‘तेजस’चे भारतातच उत्पादन सुरू झाले आहे.
भारतीय सैनिकांसाठी भारतात तयार करण्यात आलेल्या बुलेटप्रूफ जॅकेट्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘वन रँक, वन पेन्शन’ ही जुनी मागणी पूर्ण करून माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी योजनांची अंमलबजावणी केली गेली आहे. संरक्षण उत्पादनाच्या क्षेत्रातील प्रयत्नांमुळे, या वर्षापर्यंत 16 हजार कोटी रुपयांचा निर्यात टप्पा पार करण्यात आला आहे. 2025 सालापर्यंत, 41 हजार कोटी रुपयांच्या निर्यातीचे उद्दिष्ट समोर ठेवून कार्य सुरू आहे.
‘अंत्योदय’ साधत असताना विविध योजनांद्वारे गरिबांची सेवा व उत्थान, आत्मनिर्भरतेचा प्रसार, स्वदेशी तत्त्वावर आधारित संरक्षण उपकरणांचे उत्पादन तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी राबवलेल्या योजनांमुळे, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या विचारांच्या पूर्ततेकडे आपण वाटचाल करत आहोत. गरीब कल्याण, सुरक्षा, वारसा, तसेच आपल्या सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण आणि संवर्धन यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथीनिमित्ताने, त्यांच्या विचारांना कृतीत उतरवणे हीच त्यांच्याप्रति खरी श्रद्धांजली आहे.
- शिवप्रकाश
(लेखक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सह-संघटनमंत्री आहेत.)