
मुंबई : (Pahalgam Terror Attack Updates) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा दुर्देवी मृत्यू झाला असून २० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये स्थानिकांसह पर्यटकांचाही समावेश आहे. या हल्ल्यात २६ वर्षीय नौदल अधिकारी विनय नरवाल यांचाही मृत्यू झाला आहे.
विनय हे नौदलात लेफटनंट पदावर कार्यरत होते. कोचीला त्यांचे पोस्टींग झाले होते. सात दिवसांपूर्वीच म्हणजे १६ एप्रिलला त्यांचे लग्न झाले होते. १९ एप्रिलला रिसेप्शन पार पडल्यानंतर विनय पत्नी हिमांशीसह काश्मीर येथे फिरायला आले होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी हिमांशी यांनी सांगितलं की "मी माझ्या पतीसह भेळ खात होते. त्यावेळी एक माणूस तिथे आला आणि त्याला विचारलं की तू मुस्लिम आहेस का? त्यावर विनय नाही म्हणाला. त्यानंतर त्या दहशतवाद्याने विनयवर गोळ्या झाडल्या.
दरम्यान, विनय नरवाल यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पत्नीला जबर धक्का बसला आहे. आपल्या पतीचा मृतदेह मांडीवर घेऊन मूक टाहो फोडणाऱ्या हिमांशी यांचा समाजमाध्यमांवर असलेला फोटो ह्रदय पिळवटून टाकणारा आहे. विनय यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या इतर नातेवाईकांनी, मित्रांनी तसेच शेजाऱ्यांनी घडलेल्या घटनेबद्दल बोलताना दुःख व्यक्त केले आहे.