टॅग केलेल्या कासवांची घरवापसी; दुसऱ्यांदा अंडी घालण्यासाठी पुन्हा गुहागरच्याच किनारी
23-Apr-2025
Total Views |
मुंबई (अक्षय मांडवकर) - रत्नागिरीच्या गुहागर किनाऱ्यावर जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात 'फ्लिपर टॅगिंग' केलेल्या कासवाच्या माद्या महिन्याभरातच दुसऱ्या विणीसाठी गुहागर किनारी परतल्याची नोंद 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण विभागा'ने केली आहे (guhagar flipper tagged turtle). एकूण तीन मादी कासवांनी गुहागरच्या किनाऱ्यावर येऊन दुसऱ्यांदा अंडी घातल्याची नोंद करण्यात आली आहे (guhagar flipper tagged turtle). यामुळे कासव विणीच्या एकाच हंगामात 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या माद्या एकाहून अधिक वेळा वीण करत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. (guhagar flipper tagged turtle)
'भारतीय वन्यजीव संस्थान' (डब्लूआयआय) आणि 'कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण' विभागाच्या माध्यमातून कोकण किनारपट्टीवर सागरी कासवांचे 'फ्लिपर टॅगिंग' पार पडले. यामध्ये किनाऱ्यावर अंडी घालण्यासाठी आलेल्या मादी कासवांच्या फ्लिपरवर म्हणजे परांवर सांकेतिक धातूची पट्टी बसविण्यात आली. यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग मिळून एकूण ६२ मादी कासवांना टॅग करण्यात आले होते. यामधील सर्वाधिक टॅग हे गुहागरच्या किनाऱ्यावर करण्यात आले. याठिकाणी एकूण ५९ माद्यांना टॅग लावण्यात आले. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात टॅग केलेल्या तीन मादी कासवांनी महिनाभरानंतर गुहागर किनाऱ्यावर येऊन दुसऱ्यांदा अंडी घातल्याची नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी ओडिशा येथे २०२१ साली टॅग केलेल्या मादी कासवाने जानेवारी, २०२५ मध्ये गुहागर किनाऱ्यावर येऊन अंडी घातल्याचीही नोंद करण्यात आली होती.
१ फेब्रुवारी रोजी टॅग केलेल्या १११४३-१११४४ टॅगिंग क्रमांक असलेल्या मादीने २२ फेब्रुवारी रोजी येऊन पुन्हा अंडी घातली. ३१ जानेवारी रोजी टॅग केलेल्या १११२७-१११२८ टॅगिंग क्रमांकाच्या मादीने २ मार्चला येऊन दुसऱ्यांदा अंडी घातली, तर ११२०१-११२०२ असा सांकेतिक क्रमांक असलेल्या मादीने १२ फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा अंडी घातली आणि २ मार्चलाच येऊन पुन्हा अंडी घातली. अशा प्रकारे विणीच्या एकाच हंगामात 'ऑलिव्ह रिडले' कासवाच्या माद्या दोन वेळा अंडी घालत असल्याची ही दुसरी नोंद आहे. यापूर्वी आंजर्ले किनाऱ्यावर सॅटलाईट टॅग केलेल्या 'सावनी' या मादी कासवाने केळशी किनाऱ्यावर येऊन अंडी घातली होती.
सागरी कासवाच्या माद्या विणीच्या एकाच हंगामात त्याच किनाऱ्यावर दुसऱ्यांदा अंडी घालण्यासाठी आल्याच्या या नोंदी, 'फ्लिपर टॅगिंग'ची फलश्रुती म्हणावी लागेल. 'फ्लिपर टॅगिंग'मुळे प्राप्त झालेल्या या नोंदी घरट्यांची नेमकी संख्या ओळखण्यास फायदेशीर ठरत आहेत. तसेच दोन्ही वेळेस घातलेल्या अंड्यांमधील तफावत ओळखण्यास देखील मदत होते. अशा प्रकारे आपण जर अधिक माद्यांना 'फ्लिपर टॅगिंग' करु शकलो, तर त्यामाध्यमातून ठोस माहिती मिळण्यास मदत मिळेल. - कांचन पवार, विभागीय वन अधिकारी, कांदळवन कक्ष-दक्षिण कोकण