मुंबई : काश्मीरच्या पहलगाम भागात मंगळवारी दुपारी २२ एप्रिल रोजी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या क्रूर हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी आहेत. या घटनेवर अभिनेते अनुपम खेर यांनी मंगळवारी रात्री एक भावनिक आणि संतप्त व्हिडीओ शेअर करत हल्ल्याचा तीव्र निषेध केला. काश्मीरी पंडित असलेले अनुपम खेर यांनी दहशतवाद्यांवर कठोरातली कठोर शिक्षा होण्याची मागणी केली आहे.
व्हिडीओत खेर म्हणतात, ''पहलगाममध्ये जे घडलं, हिंदूंचा एकामागून एक खून हे केवळ दुःखद नाही, तर अंतःकरणात असह्य राग निर्माण करणारं आहे. मी माझ्या आयुष्यात अनेक वेळा अशा घटना पाहिल्या आहेत, विशेषतः काश्मीरमधील हिंदूंवर झालेलं अन्याय. 'द काश्मीर फाईल्स' हा त्या कथांचा एक छोटासा भाग होता ज्याला अनेकांनी प्रोपगंडा म्हणून झिडकारलं.''
ते पुढे म्हणाले, ''वेगवेगळ्या राज्यांतून आलेले पर्यटक ज्यांना फक्त निसर्गसौंदर्य पाहायचं होतं त्यांना ओळखून, त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडल्या गेल्या. हे मानवीयतेच्या सीमा पार करणं आहे. कधी कधी अश्या घटनेला शब्दही तोकडे पडतात.''
खेर यांनी या हल्ल्यातील एका हृदयद्रावक प्रसंगाचाही उल्लेख केला मृत पतीच्या मृतदेहाशेजारी बसलेल्या एका स्त्रीचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. खेर म्हणाले, ''ती महिला, तिच्या पतीच्या मृतदेहाशेजारी शांत बसलेली… आणि तिचं म्हणणं 'मलाही मारून टाका', पण त्या दहशतवाद्यांनी तिला सांगितलं की, 'हे दुसऱ्यांना सांग.' हे माणुसकीच्या संकल्पनेलाच काळिमा फासणारं आहे.''
हा हल्ला पर्यटकांनी गजबजलेल्या भागात झाला, जेथे अनेक जण फोटो काढत होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तोयबाच्या संलग्न एका छुप्या संघटनेने स्वीकारली आहे.
गृहमंत्री अमित शहा सध्या काश्मीरमध्येच असून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियातील त्यांचा दौरा अर्धवट सोडून रात्री उशिरा भारतात परत येत तातडीने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.