मुंबई (अक्षय मांडवकर) - पुणे जिल्ह्यातील बारामतीच्या गवताळ पठारावर काळ्या रंगाच्या कोल्ह्याचे दर्शन झाले आहे (black jackal). गेल्या वर्षभरापासून हा कोल्हा या भागात वावरत असून गेल्या आठवड्याभरापासून त्याचे पुन्हा दर्शन घडू लागले आहे (black jackal). या कोल्ह्याचा रंग प्रामुख्याने काळा असला तरी, त्याला मेलेनिस्टिक कोल्हा असे म्हणता येणार नाही. (black jackal)
कोल्हा हा श्वान कुळातील प्राणी आहे. जगात कोल्ह्याच्या तीन प्रजाती सापडतात. त्यापैकी भारतात सर्वदूरगोल्डन जॅकल म्हणजेच सोनेरी कोल्हा ही एकमेव प्रजात आढळते. भारतामधील कोल्ह्यांचा वावर हा जंगल, गवताळ प्रदेश, कांदळवन, शेत जमिनी आणि शहरी अधिवासातही आढळतो. मु्ंबईत प्रामुख्याने कांदळवनांमध्ये कोल्ह्यांचा अधिवास आहे. सोनेरी कोल्हांचा रंग हा मातकट असतो. मात्र, बारामतीच्या गवताळ प्रदेशामध्ये वावरणारा काळा कोल्हा वन्यजीव छायाचित्रकारांचे लक्ष वेधून घेत आहे. बारामतीचे वन्यजीव छायाचित्रकार प्रवीण जगताप यांनी या कोल्ह्याची नोंद केली आहे. याविषयी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना जगताप यांनी सांगितले की, "गेल्या दीड वर्षांपासून हा कोल्हा बारामतीच्या गवताळ प्रदेशात अधिवास करत असून वर्षातील काही कालावधीसाठी तो नजरेस पडतो. गेल्या काही आठवड्यापासून हा काळा कोल्हा पुन्हा दिसू लागला आहे."
वन्यजीवांमधील असे बदल हे प्रामुख्याने जेनेटिक म्युटेशनमुळे होतात. गुणसूत्रांमधील हे बदल त्याचे शारीरिक स्वरूप, वागणूक किंवा त्याची कार्य करण्याची क्षमता देखील बदलू शकतात. यामुळे वन्यजीवांच्या नेहमीच्या रंगापेक्षा वेगळा रंगही येऊ शकतो. शरीराचे रंग ठरवणारे 'मेलेनिन' रंगद्रव्य वाढल्यामुळे ज्याप्रमाणे वन्यजीव पूर्णत: काळे होतात म्हणजेच मेलेनिस्टिक होतात, त्याचप्रमाणे 'मेलानीन' कमी झाल्यामुळे 'ल्युकिझम' (Leucism) म्हणजेच पांढरा रंगही येऊ शकतो. बारामतीमधील हा काळा कोल्हा पूर्णत: काळा नाही. त्याच्या शरीरावर हलका मातकट रंग आहे. त्यामुळे त्याला मेलेनिस्टिक कोल्हा असे म्हणू शकत नाही.