दहशतवादी आणि त्यांच्या आकांना लवकरच धडा शिकवू - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही
23-Apr-2025
Total Views | 7
दहशतवादी आणि त्यांच्या आकांना लवकरच धडा शिकवू - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची ग्वाही
नवी दिल्ली : जम्मू - काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांचे रक्त सांडणाऱ्या दहशतवाद्यांवर आणि त्यांच्या आकांवर लवकरच जोरदार हल्ला होईल, अशी ग्वाही संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी दिली आहे
.
जम्मू – काश्मीरमधील पहलगाम येथे इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये २६ पर्यटकांचा बळी केला आहे. त्यानंतर भारताने कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कठोर कारवाईचे स्पष्ट संकेत दिले आहेत.
देशास संबोधित करताना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, मंगळवारी पहलगाममध्ये धर्म विचारून लक्ष्य करणाऱ्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात आपल्या देशाने अनेक निष्पाप नागरिकांना गमावले. या अत्यंत अमानवी कृत्याने आपल्या सर्वांना खूप दुःख आणि वेदना दिल्या आहेत. मात्र, पुरातन महान संस्कृतीचा वारसा असलेला भारत देश कोणत्याही दहशतवादी कारवायांनी त्याला घाबरून जाणारा नाही. पहलगाममध्ये दहशतवादी कृत्यास जबाबदार असलेल्यांना नजीकच्या भविष्यात कडक प्रत्युत्तर दिले जाणार आहे, अशी ग्वाही संरक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
दहशतवादाविरोधात भारताची झिरो टॉलरन्स निती असल्याचा पुनरुच्चार संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केला. ते पुढे म्हणाले. या भ्याड कृत्याविरुद्ध भारतातील प्रत्येक नागरिक एकजूट आहे. या व्यासपीठावरून, मी देशवासियांना आश्वासन देतो की या घटनेच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकार आवश्यक आणि योग्य ते सर्व पाऊल उचलेल. आम्ही केवळ ही घटना घडवणाऱ्यांपर्यंत पोहोचणार नाही. ज्यांनी पडद्यामागे बसून भारताच्या भूमीवर असे घृणास्पद कृत्य करण्याचे कट रचले त्यांच्यापर्यंतही आम्ही पोहोचू, असाही विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला आहे.