मूत्यूद्वारातून अमृततत्त्वाकडे दृष्टी ठेवणारे, मृत्यूच्या क्षणावर एखाद्या कुशल घोडेस्वाराप्रमाणे स्वार होऊन बैठक लावू शकतात. परंतु, त्याकरिता सतत अभ्यासाची व अनासक्तीची आवश्यकता आहे. शरीराला राख फासून जंगलात जाण असा अर्थ मुळीच नाही. जंगलात जाऊनसुद्धा आम्ही आसक्त राहू शकतो आणि समाजात राहूनसुद्धा सर्व निहित कर्मे करून, अनासक्त वा वैराग्यशील राहू शकतो. राग्य म्हणजे इच्छित कर्माची आसक्ती आणि अनासक्ती म्हणजे, अनासक्त कर्म करीत राहणे. शरीर असेपर्यंत कर्म करणे वा होणे ओघानेच आले. गीता सांगते, न हि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः॥11 अध्याय 18॥ आम्हाला हे अशक्य वाटते, याचे कारण आम्ही तसे वागण्याचा कधी प्रयत्नच करीत नाही.
आसक्तीरहित कर्माद्वारे साधकांत, विलक्षण संयम व इच्छाशक्ती येत असते. त्याचा लाभ मृत्यूच्या राज्यात, प्रभुत्वपणे डोकावून पाहण्याकरिता होऊ शकतो. उदा. आपण दिवसभरातून किती वेळा श्वासोच्छवास घेतला, याची आपल्याला मुळीच जाणीव नसते. परंतु, श्वासोच्छवास सहजगत्या सुखेनैव चालू असतो. श्वासोच्छवासाचे कर्म आपणहून चालू असते. त्या कर्मावर आमचे लक्ष नसते, आसक्ती नसते. अशा रितीने खाणे, पिणे, निजणे, उठणे, चालणे या क्रिया झाल्या, म्हणजे त्याला वैराग्य वा अनासक्तयोग म्हणतात. हे सर्व शक्य आहे, तसे वागण्याचा प्रयत्न मात्र झाला पाहिजे. दैनंदिन जीवनात वैराग्य वाढले की, त्या शक्तीचा विनियोग दिव्य जीवनाकडे आपोआप होत असतो. पावसाचे वाहून जाणारे पाणी जसे अडवून कृषीकरिता उत्तम तर्हेने वापरता येते, तद्वत् क्षुल्लक कर्मात आसक्ती न ठेवली तर त्याचा विनियोग दिव्य जीवनातील गूढ रहस्ये जाणण्याकरिता होतो, असा सर्व साधकांचा अनुभव आहे. आपली शक्ती-बुद्धी क्षुल्लक अशा जडजीवनाकरिताच वाया जाते; त्यामुळे त्याचा ओघ दिव्य जीवनाकडे वळत नाही. अशा कर्मयोग्याला कोणतीही योगसाधना न करताच, सर्व दिव्य शक्ती आणि सिद्धी आपोआप प्राप्त होतात; हे कर्मयोगाचे एक रहस्य आहे. असेही काही महामानव पाहण्यात आहेत की, कोणत्याही साधना न करताही त्यांना अतींद्रिय शास्त्रातील दिव्य अनुभव आले आहेत. अशा सहजावस्थेत राहणार्या व्यक्तीला कर्मयोगी म्हणतात. जो जाणून कर्म करतो तो नव्हे, तर ज्याच्या शरीराद्वारे आपोआप कर्म होतात तो कर्मयोगी होय. अशा सहजकर्म योग्याला त्याच्या त्या प्राकृतिक अवस्थेमुळे जे दिव्य अनुभव येतात, यामुळे त्याच्या ज्ञानात सतत भर पडून तो ज्ञानी होतो. असा ज्ञानी पुरुष सर्वांत श्रेष्ठ होय. परंतु, ज्ञानप्राप्तीकरिता आसक्तीरहित कर्म घडणे आवश्यक आहे. अनासक्त योग म्हणजे कर्मयोग होय.
यावर एक बोधप्रद कथा आहे. एक साधक होता. त्याच्या गुरूंनी त्याला वनात जाऊन 12 वर्षे खडतर तपस्या करण्यास सांगितले. 12 वर्षे तपस्याकाल संपविल्यावर, तो आपल्या गावी परत जायला निघाला. वाटेत एका झाडाच्या फांदीवर एक पक्षी बसला होता. ती फांदी जाण्या-येण्याच्या वाटेवर आडवी पसरली होती. त्या फांदीखालून तपस्वी चालला असताना त्या पक्षाने आपली विष्ठा टाकली. एका तपस्व्याच्या अंगावर एक क्षुद्र पक्षी विष्ठा टाकतो म्हणजे काय? तपस्व्याने क्रोधयुक्त दृष्टीने पाहिले मात्र तर काय, तो पक्षी जळून भस्म झाला! तपस्व्याला स्वतःच्या सामर्थ्याची जाणीव झाली आणि जाणिवेसह अहंकार येणे साहजिकच होते. पुढे जाता जाता एक गाव लागले. गावातील पहिल्या घरी जाऊन तपस्व्याने ललकार दिली, “माई भिक्षा वाढा.” घरात वृद्ध सासू-सासरे आपापल्या खाटेवर पडले होते. सूनबाई जात्यावर दळण दळीत होती. जात्याच्या आवाजामुळे, ललकारी सूनबाईला ऐकू गेली नाही. त्याचा पारा चढला आणि त्याने पुनः एकदा जोरात ललकारी दिली, कोण आहे घरात? भिक्षा वाढता की नाही? दारावर कोण आले आहे, याची तुम्हाला कल्पना आली नाही काय? आता मात्र ललकारी ऐकू गेली. सून जात्यावरील पीठ ओंजळीत धरोन, लगबगीने तपस्व्याला भिक्षा द्यायला गेली. पण भिक्षा घेण्याऐवजी तो तपस्वी त्या सुनेकडे रागाने पाहू लागला. सून लगेच उत्तरली महाराज क्रोध करू नका, भिक्षा घ्या. मला तुमचा आवाज जात्याच्या घर्षणामुळे ऐकू आला नाही आणि मी काही तो पक्षी नव्हे, की तुमच्या केवळ क्रोधयुक्त पाहण्यामुळे जळून जाईन. तपस्वी स्तंभितच झाला. कारण पक्ष्याच्या जळण्याची गोष्ट कोणालाच माहीत नव्हती. मग असे असताना, त्या सूनबाईला पक्षाच्या भस्म होण्याची गोष्ट कशी कळली? तपस्व्याने त्या सूनबाईचे पाय धरले आणि तिला ती गोष्ट कशी कळली, अशी त्याने विचारणा केली. बाई उत्तरली, मी काही तुमच्यासारखी 12 वर्षे तपस्या केली नाही, की योगसाधना केली नाही. पण रोज सासू-सासर्यांची आणि पतीची सेवा करणे म्हणजे परमात्म्याची सेवा करणे आहे, असे मनोमन मानते. माझे मन शुद्ध आहे व त्यामुळेच मला सर्व कळते.
कर्मयोग असा असावा लागतो. कर्मयोगाने सर्व सिद्धी व ज्ञान आपण होऊन प्राप्त होतात. असा अनासक्त कर्मयोग जीवनात असल्यास, अशा सहजावस्थेतील साधकाला जीवनातील सर्व रहस्ये आपणहून कळायला हरकत नाही.
बिहार प्रांतातील आयुष्यभर ज्या गृहस्थाने साधारण लिपिक म्हणून काम केले, त्याची ही कथा. असली महान साधना त्या गृहस्थाने केव्हा केली, हे त्याचे त्यालाच माहीत! त्याचा मोठा मुलगा 60 वर्षांचा होता, त्या गृहस्थाचे वय 84 असावे. घरी एक दिवस सत्यनारायण पूजन केले गेले. पूजाअर्चा झाल्यावर तिकडील पद्धतीप्रमाणे, उपाध्यायांनी सत्यनारायणावरील हार घरातील सर्वांत वृद्ध अशा त्या यजमानांच्या गळ्यात टाकला. म्हातारा गहिवरून आला आणि आता देहत्याग करण्यास यापेक्षा उत्तम वेळ कोणती आहे, असा विचार करून म्हातार्याने आपल्या मोठ्या मुलाला बोलावून सांगितले, “आता आम्ही जातो.” म्हातार्याची प्रकृती अगदी ठणठणीत होती. ‘रघुपती राघव राजाराम’चा गजर सुरू झाला. प्रत्येकाचे ध्यान त्या जिवंत मरणाकडे लागलेले. धून रंगात आली; म्हातारा शून्यात विलीन झाला
. ‘यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम!’
योगिराज हरकरे
(क्रमशः)
(शब्दांकन : राजेश कोल्हापुरे)
9702937357