धर्मादाय रूग्णालयांच्या संनियंत्रणासाठी राज्यस्तरीय विशेष तपासणी पथक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

    23-Apr-2025
Total Views | 8

State-level special inspection team to monitor charitable hospitals - CM Devendra Fadnavis directs

मुंबई, राज्यातील धर्मादाय रूग्णालयांकडून निर्धन, गरीब रूग्णांवर उपचार मोफत व्हावेत. रूग्णालयांनी शिल्लक खाटा, निर्धन रूग्ण निधींची माहिती (आयपीएफ) ऑनलाईन प्रणालीत नोंद करावी. काही रूग्णालयात अनामत रक्कम घेतल्याशिवाय उपचार केले जात नसल्याच्या तक्रारी येतात . या सर्व बाबींची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अशा धर्मादाय रुग्णालयांच्या नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून विशेष तपासणी पथक तयार करण्याचे निर्देश बुधवार, दि. २३ एप्रिल रोजी दिले.

सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मुख्य सचिव सुजाता सौनिक, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्याच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, विधी व न्याय विभागाच्या प्रधान सचिव सुवर्णा केवले, मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ श्रीकर परदेशी, धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती, मुख्यमंत्री सहायता मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, धर्मादाय विश्वस्त नियमानुसार धर्मादाय रूग्णालयात १० टक्के खाटा निर्धन घटक तर १० टक्के खाटा दुर्बल घटकातील रूग्णांसाठी आरक्षित ठेवणे बंधनकारक आहे. आपत्कालिन परिस्थितीत रूग्ण स्थिर होईपर्यंत तातडीचे उपचार व वैद्यकीय सेवा पुरविणे आवश्यक आहे. यासाठी रूग्णालयांनी कोणतेही अनामत रक्कम घेवू नये. धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाने धर्मादाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी. धर्मादाय रुग्णालयावर देखरेख ठेवण्यासाठी जिल्हास्तरीय समिती तयार करावी. शिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विषयक योजनांच्या संलग्नीकरण आणि समन्वयासाठीही प्रयत्न करावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

ऑनलाईन माहिती भरणे सक्तीचे
धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रूग्णालयांनी रूग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रूग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाईन प्रणालीत भरणे सक्तीचे करावे. महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या आणि महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करावी. याबाबत समन्वय करण्यासाठी क्लस्टर तयार करून समिती प्रमुख नेमून माहिती न भरणाऱ्या रुग्णालयावर कारवाई करण्याचे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

रूग्णालयात डॅशबोर्ड आणि फलक

राज्यातील प्रत्येक धर्मादाय रुग्णालयात रूग्णांच्या योजना, आजार, उपचाराबाबतची माहितीचे मोठ्या अक्षरातील फलक लावावेत. या फलकामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना रिक्त खाटांची स्थिती, रूग्णालयात कार्यरत शासकीय योजना आणि इतर माहिती मिळण्यास मदत होणार आहे. सर्व माहिती जाहिररित्या सर्वांना उपलब्ध होण्यासाठी ऑनलाईन प्रणालीवर टाकावी. शिवाय एका डॅशबोर्डवर माहिती दिल्यास रूग्णांना मदत होणार आहे. याचे नियमित अद्ययावतीकरण होण्यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.

आतापर्यंत ७ हजार ३७१ रूग्णांवर उपचार

धर्मादाय रूग्णालय कक्षाची स्थापना २०२३ रोजी झाली असून आतापर्यंत १० हजार ७३८ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले. यामध्ये ७ हजार ३७१ रूग्णांवर उपचार झाले असून २४ कोटी ५३ लाख रूपयांचा निधी खर्च झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सादरीकरणाद्वारे माहिती दिली.




अग्रलेख
जरुर वाचा
‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘द रूट्स ओपन माईक’च्या दोन यशस्वी वर्षांचा सांस्कृतिक उत्सव!

‘संस्कार भारती’ कोकण प्रांताच्या पुढाकारातून सुरु झालेल्या ’THE ROOTS OPEN MIC ’ या उपक्रमाने आपल्या दोन यशस्वी वर्षांची पूर्तता साजरी केली. ‘सा कला या विमुक्तये’ या मूलमंत्रासोबत विविध कलांच्या अभिव्यक्तीसाठी कार्यरत असलेला हा अनोखा उपक्रम. या उपक्रमांतर्गत दर महिन्याच्या तिसर्‍या शनिवारी होणार्‍या कार्यक्रमाच्या यंदाच्या सत्रात मातृदिवस आणि समरसतेसारख्या भावनिक विषयांना वाहिलेली सादरीकरणे करण्यात आली. तसेच दि. 20 मे रोजी येणार्‍या थोर कवी सुमित्रानंदन पंत यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहण्यात ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121