वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा! मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन
‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा मुंबईत थाटात शुभारंभ
23-Apr-2025
Total Views | 9
मुंबई : वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मंत्री पंकजा मुंडे यांनी मंगळवार, २२ एप्रिल रोजी केले.
मुंबईतील पवई तलाव स्वच्छता व संवर्धन अभियानाच्या शुभारंभ सोहळ्यात त्या बोलत होत्या. जागतिक वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांच्या सहयोगाने गणेश घाट पवई येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी यावेळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम, आमदार दिलीप लांडे, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अविनाश ढाकणे, महानगरपालिका उपायुक्त श्री.संतोष दौड इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "निसर्गाने मानवाला सर्व काही भरभरून दिले. पण माणसाने मात्र अतिहव्यासाने सभोवतालच्या निसर्गाचे नुकसान केले. निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी शासनाबरोबरच लोकसहभागही आवश्यक आहे. यासाठी आपण वेळीच जागृत होऊन पर्यावरण संवर्धनाचे कर्तव्य बजावण्याची नितांत गरज असून सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर महाराष्ट्र नक्कीच प्रदुषणुक्त होईल," असे म्हणत त्यांनी पर्यावरण रक्षणात कर्तव्य आणि हक्क या दोन्ही गोष्टींची जोड देण्याची गरज व्यक्त केली.
त्या पुढे म्हणाल्या की, "ज्याप्रमाणे नवरात्रीत देवीची आराधना केली जाते. त्याचप्रमाणे या सृष्टीची, वसुंधरेची आराधना केली पाहिजे. वसुंधरेला वाचविण्यासाठी आपण एकत्र काम केले पाहिजे. जलयुक्त शिवार योजना, लेक माझी भाग्यश्री अशा योजनांना लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जलयुक्त शिवार योजनेतून ग्रामीण विभागात पाणी टंचाईवर मात करण्यात यश मिळाले, हा पूर्वानुभव लक्षात घेऊन पर्यावरण विभागदेखील निसर्ग रक्षणासाठी लोकाभिमुख चळवळ निर्माण करेल. पवई तलावाची स्वच्छता ही या चळवळीची सुरुवात असून नागरिकांचा वाढता सहभाग हे खूप मोठे योगदान ठरेल," असेही त्या म्हणाल्या.
‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ अभियानाचा शुभारंभ
दिनांक २२ एप्रिल ते १ मे पर्यंत ९ दिवस राज्यस्तरीय ‘पर्यावरण वाचवा, वसुंधरा सजवा’ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते राज्याचे फूलझाड ताम्हण रोपाचे रोपण करण्यात आले. या अभियानाच्या निमित्ताने संपूर्ण राज्यात ग्रामपंचायतीपासून ते नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका क्षेत्रात पर्यावरण संवर्धन अभियान राबवण्यात येणार आहे.