मुंबई : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे या हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. यात पुण्यातील दोन, डोंबिवलीतील ३ आणि पनवेलमधील एकाचा समावेश आहे.
मंगळवार, २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या बेछूट गोळीबारात २६ जणांचा मृत्यू झाला आहे तर २० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये डोंबिवलीतील संजय लेले, अतुल मोने आणि हेमंत जोशी यांचा समावेश आहे. तर पनवेलमधील दिलीप डिसले यांचा समावेश आहे.
हे वाचलंत का? - "या हल्लेखोरांचा आता असा बंदोबस्त करा की,..."; जम्मू काश्मीरमधील हल्ल्यावर काय म्हणाले राज ठाकरे?
दरम्यान, मुख्यमंत्री कार्यालयाकडून आलेल्या माहितीनुसार, संजय लेले आणि दिलीप डिसले यांचे पार्थिव श्रीनगर ते मुंबई या एअर इंडियाच्या विमानाने मुंबईत आणण्यात येईल. हे विमान श्रीनगर येथून दुपारी १२.१५ वाजता निघेल. तसेच पुण्यातील कौस्तुभ गणवते आणि संतोष जगदाळे यांचे पार्थिव सायंकाळी ६ वाजता निघेल आणि पुण्यात आणण्यात येईल. यासोबतच दुपारी १.१५ वाजता श्रीनगर येथून हेमंत जोशी आणि अतुल मोने यांचे पार्थिव घेऊन विमान निघेल आणि ते मुंबईत पोहोचेल.
मुंबईत मंत्री आशिष शेलार आणि मंत्री मंगलप्रभात लोढा हे विमानतळावर समन्वयासाठी असतील. तर पुणे विमानतळावर मंत्री माधुरीताई मिसाळ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यासोबतच जम्मू काश्मीरमध्ये अडकलेल्या इतरही पर्यटकांना परत आणण्यासाठी व्यवस्था करण्यात येत आहेत.