रोजगाराच्या क्षेत्रातही नवा 'धारावी पॅटर्न'

कर्मचारी निवडीसाठी अनेक कंपन्यांची धारावीला पसंती

    23-Apr-2025
Total Views | 10



New

मुंबई, आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे वर्षानुवर्षे चिकटलेले 'बिरूद', मूलभूत सुविधांसाठी दैनंदिन संघर्ष, बेताची आर्थिक स्थिती, उच्च शिक्षणाचा अभाव, रोजगाराभिमुख शिक्षणाची वानवा, अनुभवाची कमतरता या आणि अशा अनेक कारणांमुळे धारावीतील उमेदवारांना बऱ्याचदा नावाजलेल्या कंपन्यांकडून नोकरीच्या संधी नाकारल्या जात होत्या. मात्र, गेल्या काही वर्षभरापासून धारावी सोशल मिशनच्या (डीएसएम) माध्यमातून करण्यात आलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे चित्र काहीसे बदलले आहे.

नवभारत मेगा डेव्हलपर्स (एनएमडीपीएल) चा महत्त्वकांक्षी उपक्रम असलेल्या डीएसएममुळे खासगी कंपन्यांचा धारावीतील उमेदवारांकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतो आहे. नुकताच याचा प्रत्यय धारावीतील तरुणाईला आला. ८ मार्च २०२५ रोजी, डीएसएमने महाराष्ट्र नेचर्स पार्क येथे आतापर्यंतचा सर्वात मोठा रोजगार मेळावा आयोजित केला. हा धारावीच्या सशक्तीकरणाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरला. १३०० हून अधिक उमेदवारांनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला आणि ४५०० पेक्षा जास्त जणांनी नोंदणी केली. डीएसएमने मागील वर्षभरात दोन मोठे रोजगार मेळावे आणि दहा पेक्षा अधिक लहान रोजगार मेळावे घेतले आहेत. प्रत्येक महिन्याच्या पहिल्या शनिवार आणि तिसऱ्या शुक्रवारी या लहान उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. सलून, ब्युटी पार्लर, हॉटेल, मोबाइल रिपेअरिंग, टेक सपोर्ट यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये धारावीतील तरुण आता काम करत आहेत.

स्थानिक गरजांनुसार आखण्यात आलेले हे अभ्यासक्रम महिला, शाळा सोडलेले विद्यार्थी आणि नवउद्योजकांसाठी संधी निर्माण करत आहेत. धारावीचा पुनर्विकास जरी सुरु असला तरी डीएसएम हे सुनिश्चित करत आहे की, इथल्या माणसांची प्रगतीही तितकीच महत्त्वाची आहे. इथे केवळ इमारती उभ्या राहत नाहीत तर येथील नागरिकांचे भविष्य देखील उज्वल करत आहे. याच प्रतिभावंत युवा वर्गाला संधी उपलब्ध करून देण्याचे काम डीएसएम करत आहे.

टाटा स्टारबक्स, आयनॉक्स, स्वस्ति मायक्रोफायनान्स, श्रीराम फायनान्स, अर्बन कंपनी, कोटक एज्युकेशन फाउंडेशन, रिलायन्स स्मार्ट पॉइंट, टीमलीज, महिंद्रा अँड महिंद्रा, क्रिस्टल ग्रुप, डॉमिनोज, मॅकडोनाल्ड्स आणि पिझ्झा हट यासारख्या ५२ नामांकित कंपन्यांनी रिटेल, हॉस्पिटॅलिटी, फायनान्स, लॉजिस्टिक्स, फास्ट फूड चेन आणि होम सर्व्हिसेसमध्ये अनेक संधी उपलब्ध करून दिल्या. तर याद्वारे ३०० हुन अधिक उमेदवारांना तिथेच थेट नोकरीची संधी मिळाली आणि यामुळे धारावीच्या क्षमतेविषयी असलेल्या चुकीच्या गृहितकांना ठोस उत्तर देखील मिळाले आहे.

धारावीतील रोजगारक्षम तरुण
 
"मला आसुस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड मध्ये फ्रंट डेस्क एक्झिक्युटिव्ह म्हणून ४.५७ लाखरुपयांची वार्षिक पगाराची नोकरी मिळाली आहे. धारावी सोशल मिशनमुळे मला ही नोकरी मिळाली आणि माझ्या करिअरची दिशा बदलली. मी खूप आनंदी आहे".
समृद्धी सिंह पवार, वय वर्षे २१

मी ग्रीन मूनकेअर हेल्थकेअरमध्ये हाऊसकीपिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून १.५ लाख पॅकेजसह नोकरी मिळाली. या रोजगार मेळाव्यामुळे मला माझं कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आणि योग्य नोकरी मिळाली आणि माझे आयुष्य देखील सुधारले.'
- रोहित वाघे,
 
“धारावी रोजगार मेळाव्यात भाग घेऊन आम्हाला चांगले उमेदवार भेटले.”
- वेदप्रकाश त्रिपाठी, स्पेक्ट्रम टॅलेंट मॅनेजमेंट

“ही एक सामाजिक जबाबदारी आहे, आणि बँकिंग क्षेत्रातील संधींसाठी आम्ही धारावीतील अधिक उमेदवारांना संधी देण्यास इच्छुक आहोत.”
- अल्बर्ट परेरा, बीपीओ
“आम्ही फक्त महिलांसाठीच्या पदासाठी उमेदवार शोधत होतो. या रोजगार मेळाव्यात अनेक चांगले उमेदवार मिळाले आहेत."
- सोनाली नाईक, टाटा स्टारबक्स

“१०वी-१२वी शिक्षण असलेल्या उमेदवारांना संधी दिली. यापैकी बहुतांश उमेदवार आमच्या पदांसाठी योग्य होते.”
-अजय सिंह, स्विगी इंस्टा मार्ट





अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121