पहलगाम : ( Lieutenant vinay narwal martyred in Pahalgam terror attack ) जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हरियाणातील करनालचे रहिवासी नौदलाचे लेफ्टनंट विनय नरवाल (२६) यांची गोळ्या घालून हत्या केली.
लेफ्टनंट विनयने त्याच्या हत्येच्या फक्त ७ दिवस आधी गुरुग्रामच्या हिमांशी नरवालशी लग्न केले होते. ते दोघेही २१ एप्रिल रोजी त्यांचा हनिमून करण्यासाठी पहलगामला गेले होते. विनयच्या मृत्यूची बातमी मिळताच त्याचे वडील, बहीण आणि सासरे त्याच रात्री काश्मीरला निघून गेले. बुधवारी सकाळी विनयचे पोस्टमॉर्टम करण्यात आले.
त्यांचे पार्थिव विमानाने दिल्लीला पोहोचेल. त्यांचे अंतिम संस्कार संध्याकाळी कर्नालमधील त्यांच्या वडिलोपार्जित गावी भुसली येथे केले जातील. सध्या त्यांचे कुटुंब कर्नालच्या सेक्टर ७ मध्ये राहते.
धर्म विचारल्यानंतर गोळ्या झाडल्या-
दि २२ एप्रिल पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर, लेफ्टनंट विनय यांच्या पत्नी हिमांशीने स्वतः खुलासा केला होता की, दहशतवाद्यांनी धर्म व नाव विचारल्यानंतर गोळीबार केला. हिमांशीचा व्हिडिओही व्हायरल झाला होता, ज्यामध्ये हिमांशी म्हणाली होती " बैसरन खोऱ्यात फिरत असताना दहशतवाद्यांनी विनयवर गोळीबार केला. ज्यामध्ये लेफ्टनंट विनयचा जागीच मृत्यू झाला.
भ्याड हल्ला दुर्दैवी आहे - मुख्यमंत्री सैनी
या दहशतवादी हल्ल्याबद्दल मुख्यमंत्री नायब सिंग सैनी म्हणाले, "जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती माझी तीव्र संवेदना आहे. हे भ्याड आणि घृणास्पद कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. दहशतवादाविरुद्धची आमची लढाई दृढ आणि अटळ आहे."
नौदलाच्या संवेदना
या घटनेबद्दल नौदलाने म्हटले आहे की, "पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या दुःखद निधनाने भारतीय नौदल हादरले आहे. या दुःखाच्या वेळी आम्ही नरवाल कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो."