खाद्यसंस्कृतीसोबत वाचनसंस्कृती रुजवणार्या, तसेच वाचन चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या मनाची मशागत करणार्या भीमाबाई जोंधळे यांच्या कार्याची दखल घेत, त्यांना यंदाच्या ‘मराठी भाषा संवर्धक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. तेव्हा आज ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्ताने त्यांच्या या अनोख्या वाचन चळवळीचा आढावा घेणारा लेख...
मराठीतील विख्यात लेखक देवा झिंजाड यांच्या ‘एक भाकर, तीन चुली’ या कादंबरीत म्हटले आहे, ‘कष्टाला पर्याय कष्टच.’ खरोखरच काही माणसांच्या ललाटी कष्ट, संघर्ष यांची एक न संपणारी रेष असते. बरेचदा काही लोक या सगळ्या जीवनापासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. नाना प्रकारची व्यसने करत ते स्वतःची सुटका करू पाहतात. परंतु, परिस्थितीकडे पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या पदरी निराशाच येते. या निराशेच्या कुंठितावस्थेत राहण्याचा पर्याय भीमाबाईंकडे होता का? तो पर्याय त्यांच्याकडे असता, तरी त्याची निवड त्यांनी केली असती का? 75 वर्षांच्या भीमाबाई जोंधळे यांच्याकडे बघून तरी असे वाटत नाही.
नाशिकच्या भीमाबाई जोंधळे यांचा जन्म दिंडोरी तालुक्यातील खतवड या गावी झाला. जेमतेम पाचवीपर्यंत त्यांचे शिक्षण झाले.लहानपणापासून मातीशी जुळलेली त्यांची नाळ पुढची अनेक दशके अखंड राहिली.‘महिला शेतकरी’ म्हणजे भारताच्या शेतीव्यवस्थेचा कणा. गरिबी, उपासमारी, दारिद्य्र या सर्व संकटांना तोंड देत या देशातील स्त्रिया शेतात राबण्यासाठी उभ्या राहतात. पावसाच्या आसमानी-सुलतानी संकटाची टांगती तलवार असतानासुद्धा न डगमगता त्या लढत राहतात. भीमाबाई जोंधळे यांच्या नशिबीसुद्धा हीच लढाई होती. भीमाबाई यांच्या संसारामध्ये अनेक चढ-उतार आले. चार भिंतींमधल्या वादांमुळे दहा एकरांची शेती दोन एकरांवर आली. परंतु, या काळ्या मातीची सेवा करण्याचे व्रत त्यांनी सोडले नाही. भीमाबाई जमीन कसत होत्या. आपल्या संसाराचा गाडा हाकत होत्या. अचानक त्यांचे हे सुख त्यांच्याकडून हिसकावून घेण्यात आले.
त्यांच्या शेताशेजारी उभ्या राहिलेल्या केमिकल कंपनीच्या दुषित पाण्यामुळे त्यांची जमीन नापीक झाली. या कंपनीच्या विरुद्ध त्यांनी लढा देण्याचा निर्णय घेतला. परंतु, दुर्दैवाने बलाढ्य कंपनीच्या धनशक्तीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. त्यांना आपले घर, शेतजमीन विकून स्थलांतर करावे लागले. या सर्व कोलाहलामध्ये त्यांनी आपल्या मुलांचे शिक्षण थांबवले नाही. चहाची टपरी सुरू करून त्यांनी आपला उदरनिर्वाह सुरू केला आणि याच कष्टाच्या जोरावर त्यांची दोन्ही मुले इंजिनिअर झाली. भीमाबाईंच्या याच जिद्दीचे अनुकरण त्यांचा मुलगा प्रवीण यांनी केले. दहावीनंतर पेपरची लाईन टाकत त्यांनीसुद्धा घराला हातभार लावला.
याच चहाच्या टपरीचे रुपांतर नंतर उपाहारगृहामध्ये झाले आणि जन्माला आले अनोखे ‘आजींचे पुस्तकांचे हॉटेल!’ परंतु, ही कल्पना जन्माला आली, ती मुळी आजींच्या वेगळ्या दृष्टीमुळे. मोठ्यांपासून ते लहानग्यांपर्यंत प्रत्येकाच्या हातामध्ये आज मोबाईल आपल्याला बघायला मिळतो. काहींसाठी ही कामाची गरज, तर काहींनी कळत नकळत स्वतःलाच लावून घेतलेले व्यसन. यावर उपाय म्हणजे काय, तर पुन्हा एकदा माणसांच्या हाती पुस्तक देणे. खाद्यसंस्कृतीसोबत वाचनसंस्कृतीसुद्धा रुजवली जाऊ शकते, हा विचार करून उपाहारगृहामध्ये वाचनालय उभारले गेले. सुरुवातीला केवळ 25 पुस्तकांसोबत सुरू झालेल्या या पुस्तकांच्या हॉटेलमध्ये आजमितीला पाच हजारांपेक्षा जास्त पुस्तके आहेत. याचे कारण म्हणजे, लोकांनासुद्धा ही संकल्पना आवडली आणि त्यांनी आपल्या अवतीभोवती हा विचार पेरला. या उपाहारगृहाचे वैशिष्ट्य म्हणजे, प्रत्येक टेबलावर आपल्याला दोन पुस्तके बघायला मिळतात.
या उपाहारगृहामध्ये ऑर्डर देण्याची पद्धतसुद्धा निराळीच. जेवणाची ऑर्डर तोंडी द्यायची नाही, तर आपल्याला जो पदार्थ मागवायचा आहे, तो पाटीवर खडूने लिहायचा आणि वेटरकडे द्यायचा. जेवणाचे ताट येईपर्यंत आपसूकच पुस्तकाची पाच पाने वाचून झालेली असतात. जेवण आल्यानंतर एका बाजूला जेवणाचे थाट आणि दुसर्या बाजूला पुस्तकाचे पान वाढलेले असते!
आजीबाईंच्या हॉटेलचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेली कवितेची भिंत. महाराष्ट्रातील नामवंत कवींच्या विविध विषयांना स्पर्श करणार्या आशयपूर्ण कवितांचे पोस्टर अक्षरचित्रांच्या माध्यमातून साकारले गेले आहे. असे हे आजींच्या पुस्तकांचे हे हॉटेल आहे नाशिकला. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला ऐतिहासिक वारसा लाभलेला. याच वारशाचे दर्शन आपल्याला वेगवेगळ्या भित्तिचित्रांच्या माध्यमातून घडते.
ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांना अभिवादन म्हणून ‘अमृतवेल पुस्तक दालना’ची निर्मितीही करण्यात आली आहे, जिथे अनेक दर्जेदार पुस्तके सवलतीच्या दारात विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत. ज्ञानपीठ विजेते लेखक आणि नाशिकच्या साहित्यसृष्टीचे जीव की प्राण असणार्या कुसुमाग्रजांना अभिवादन करून ‘अक्षरबाग’ तयार केली आहे. या ठिकाणी पुस्तक प्रकाशनासाठी तसेच विविध साहित्यिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक कार्यक्रमांना सदर जागा विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.
साहित्यसेवा करणार्या भीमाबाईंच्या जाणिवा समाजासाठी किती संवेदनशील आहेत, हे त्यांचे सामाजिक कार्य समजून घेतल्यावर लक्षात येते. भीमाबाई जोंधळे आपल्या उपाहारगृहामध्ये येणार्या ग्राहकांना म्हणतात, “आता जेवण करा आणि जमेल तेव्हा पैसे द्या!” ‘कोरोना’ महामारीच्या वेळेस घराच्या ओढीने महामार्गावरुन परराज्यातील कामगारांचे लोंढे त्यांच्या राज्यांकडे मार्गस्थ झाले होते. यावेळी असंख्य कामगारांची भीमाबाईंनी जेवणाची सोय करुन अन्नदान केले. देशाचे माजी राष्ट्रपती आणि ‘भारताचे मिसाईल मॅन’ अशी ओळख असणारे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस आपण ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करतो. या दिवशी आजीबाई आपल्या उपाहारगृहामध्ये आलेल्या प्रत्येक ग्राहकाला मोफत पुस्तक भेट देऊन अभिनव पद्धतीने ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करतात.
वेगवेगळ्या शाळांना पुस्तके भेट देत आजी पुस्तक वाचणार्यांची नवी पिढी घडवत आहेत. कालांतराने भीमाबाई जोंधळे यांच्या या वाचन चळवळीची दखल समाजमाध्यमांवर घेतली गेली. बघता बघता मुलाखती, प्रसिद्धी, पुरस्कारांचा पाऊसच सुरू झाला. भीमाबाई जोंधळे यांच्या या कार्याचा यथोचित सन्मान होऊ लागला. एकेकाळी परिस्थितीशी दोन हात करणार्या या माऊलीच्या पदरात अखेर समृद्धीचे दान ईश्वराने टाकले. केवळ महाराष्ट्र आणि भारतच नव्हे, तर सातासमुद्रापार आजीबाईंच्या कार्याची दखल घेतली गेली. अखेर दि. 27 फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या निमित्ताने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते ‘मराठी भाषा संवर्धक पुरस्कारा’ने त्यांना गौरविण्यात आले.
भीमाबाई जोंधळे यांनी आता वयाच्या 75व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुरस्कार, सन्मान-सोहळे हा सगळा व्याप असूनसुद्धा रोज सकाळी त्या आपल्या उपाहारगृहामध्ये येतात. पुस्तकांच्या सहवासानेच त्यांच्या दिवसाची सुरुवात होते. वयोमानापरत्वे त्यांच्या चेहर्यावर सुरकुत्या असल्या, तरीसुद्धा थकवा अजिबात दिसत नाही. लोकांसोबत संवाद साधण्याची, काम करण्याची त्यांची ऊर्जा तरुणांनासुद्धा लाजवणारी. साने गुरुजी हे भीमाबाईंचे आवडते लेखक. पाचवीत शिकलेल्या कविता आजसुद्धा त्यांच्या अगदी मुखोद्गत आहेत. आजतागायत आजींच्या उपाहारगृहाला अनेकांनी भेट दिली. समाजमनाला जागृत करणार्या आजींची ही पुस्तकांची चळवळ अशीच बहरत राहो, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा.