मुंबई : धर्म विचारून गोळीबार करणे हे अतिशय निंदनीय असून समाजाला विभाजित करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याबाबत त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ही अतिशय चीड आणणारी परिस्थिती आहे. धर्म विचारून गोळीबार करणे हे अतिशय निंदनीय आहे. समाजाला विभाजित करण्याचा हा प्रयत्न असून देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परंतू, पंतप्रधान नरेंद्र मोदी या घटनेच्या मास्टरमाईंड शोधून काढतील आणि त्याच्यावर कडक कारवाई करतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की, "काश्मीरमध्ये झालेल्या घटनेत महाराष्ट्रातील ६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांचे पार्थिव महाराष्ट्रात येणार आहेत. यातील चार पार्थिव दोन वेगवेगळ्या विमानाने मुंबईत येतील. तर दोन पार्थिव पुण्यात येणार आहेत. मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा हे दोन मंत्री विमानतळावर व्यवस्था पाहत आहेत. तर पुण्यात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ हे स्वत: लक्ष घालत आहेत. तसेच माधुरीताई मिसाळ यासुद्धा विमानतळावर उपस्थित राहतील. याव्यतिरिक्त आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरला पोहोचत आहेत. तसेच ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याशी संपर्क साधला त्यांच्या व्यवस्था केल्या आहेत. त्यांनादेखील विमानाने परत आणणार आहोत," असे त्यांनी सांगितले.
हे वाचलंत का? - वसुंधरेच्या रक्षणासाठी सर्वानी एकत्रितपणे पुढाकार घ्यावा! मंत्री पंकजा मुंडे यांचे आवाहन
मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत
"आपले सगळे पर्यटक सुरक्षित असून त्यांना परत आणण्यासाठी आवश्यक त्या सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरु आहे. जम्मू काश्मीरचे प्रशासनही सहयोग करत आहेत. जखमींवर योग्य प्रकारे उपचार सुरु असून डॉक्टरांनी संमती दिल्यानंतर त्यांना परत आणण्याची व्यवस्था करण्यात येईल. या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांना ५ लाख रुपये मदत देण्यात येणार आहे. आपल्या राज्यातील पर्यटकांना सुरक्षितपणे परत आणणे हे आमचे प्राधान्य आहे," असेही ते यावेळी म्हणाले.