मूूंबई, वृक्षांची खिळे ठोकून हानी करणा-यांवर तसेच वृक्षांवर विद्युत रोषणाई करून त्यांना इजा पोहचविणा-या व्यक्ती – संस्था यांना अशा प्रकारचे पर्यावरण विरोधी कृत्य न करण्याबाबत नवी मुंबई महानगरपालिका वृक्ष प्राधिकरणाच्या वतीने वारंवार जाहीर आवाहन करण्यात येत असते व रोजीही आवाहन करण्यात आले होते.
तथापि याची दखल न घेता तुर्भे, सेक्टर 18 येथील नानुमल हॉटेल व तुर्भे, सेक्टर 19 येथील हॉटेल देवीप्रसाद यांच्या माध्यमातून त्यांच्या हॉटेल बाहेरील झाडांवर विद्युत रोषणाई केली असल्याचे आढळून आल्याने तुर्भे विभाग कार्यालयाच्या भरारी पथकाने तुर्भे विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी श्री. सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली, उद्यान विभाग परिमंडळ 1 चे उपआयुक्त श्री.किसनराव पलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली, या दोन्ही हॉटेल मालकांकडून प्रत्येकी रू. 10 हजार याप्रमाणे एकूण रु. 20 हजार दंडात्मक रक्कम वसूली केलेली आहे.
नमुंमपा वृक्ष प्राधिकरणाचा दि. 27 जानेवारी 2025 रोजीचा ठराव क्र.7461 अन्वये वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे व वृक्षास इजा पोहचविणाऱ्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांचेवर दंडात्मक कारवाई करणेबाबत निर्णय घेण्यात आला असून अशा नागरिक / संस्था / व्यावसायिक यांचेकडून प्रतिवृक्ष रुपये 10,000/- इतका दंड आकारणेबाबत सहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी यांचेमार्फत कारवाई करण्यात येत असते. त्यानुसार सदरची धडक कारवाई करण्यात आलेली आहे.
यापुढील काळात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आठही विभागीय कार्यक्षेत्रात विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तरी नागरिकांनी / व्यावसायिकांनी झाडांवर खिळे ठोकणे व विद्युत रोषणाई करणे अशा प्रकारे वृक्षांना हानी पोहचविणारे कृत्य करू नये व दंडात्मक कटू कारवाईला सामोरे जावे लागणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.