समुद्रांच्या लाटांसारख्या मानवी भावभावना या अत्यंत प्रवाही. कधी अगदी शांत, तर कधी रौद्र. म्हणूनच अशावेळी भावनिक नियमनाची प्रक्रिया संतुलित आयुष्यासाठी महत्त्वाची. तेव्हा, नेमके भावनिक नियमन म्हणजे काय? भावनिक नियमन आणि दमन यांत नेमका फरक काय? याविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख..
खाद्याच्या भावनिक स्थितीवर चांगल्या प्रकारे प्रभाव पाडण्याचे अनेक मार्ग असले, तरी भावनांचे नियमन म्हणजे बहुतेकदा तज्ज्ञ ज्याला ‘डाऊन रेग्युलेशन’ म्हणतात किंवा ‘भावनांची तीव्रता कमी करणे’ म्हणतात. शोक करणारी व्यक्ती काहीतरी आनंददायक प्रसंग आठवून आपले दुःख कमी करू शकते. चिंताग्रस्त व्यक्ती तिच्या चिंता निर्माण करणार्या विचारांपासून स्वतःचेलक्ष विचलित करून सकारात्मक गोष्टी आठवून भावनांचे चांगले नियोजन करू शकते.
भावनांचे नियमन म्हणजे ‘अप रेग्युलेशन’ किंवा एखाद्याच्या भावना वाढवणेदेखील असू शकते, जे एखाद्या अचानक धोक्यासाठी किंवा आव्हानासाठी आवश्यक चिंता (परीक्षेच्या वेळी) किंवा उत्साहाचा निरोगी डोस (ऊर्जा कमी होते तेव्हा) उपयुक्त ठरू शकते. भावनिक नियमन म्हणजे व्यक्ती त्यांच्या भावनिक अनुभवांना योग्य आणि अनुकूल पद्धतीने व्यवस्थापित करण्यासाठी आणि प्रतिसाद देण्यासाठी वापरत असलेल्या विविध प्रक्रिया. यामध्ये एखाद्याच्या भावनिक प्रतिसादांना वाढविण्यासाठी, जोपासण्यासाठी किंवा कमी करण्यासाठीच्या लागणार्या धोरणांचा समावेश आहे.
‘भावनिक नियमन’ म्हणजे आपल्या भावना ओळखणे, समजून घेणे आणि त्या योग्य पद्धतीने हाताळणे, म्हणजेच त्या भावना आपल्या वागणुकीवर, निर्णयांवर आणि नातेसंबंधांवर अनावश्यक किंवा नकारात्मक प्रभाव टाकणार नाहीत, याची काळजी घेणे. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात छोटे-मोठे भावनिक अनुभव येतात. हे अनुभव सकारात्मक असतील किंवा नकारात्मक. पण, त्यांना तोंड देण्यासाठी योग्य तंत्रे वापरणे म्हणजेच भावनिक नियमन.
या अशा मानसिक आणि वर्तनात्मक प्रक्रिया आहेत, ज्या व्यक्तीच्या भावनिक प्रतिक्रियांचे नियंत्रण ठेवण्यासाठी वापरल्या जातात. उदाहरणार्थ, आपण एखाद्या प्रसंगात खूप रागावलेलो असताना, तो राग लगेच व्यक्त करण्याऐवजी, शांत राहून योग्य शब्दांत आपला मुद्दा मांडतो, ही प्रक्रिया म्हणजे भावनिक नियमन. यामध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो.
1. भावना ओळखणे व स्वीकारणे
2. त्यांच्या तीव्रतेचे निरीक्षण करणे
3. त्या भावना कशा प्रकारे व्यक्त करायच्या, हे ठरवणे
4. योग्य प्रतिसाद देण्यासाठी मानसिकता बदलणे
5. ध्यानधारणा, श्वसनसाधना किंवा आत्मपरीक्षण यांसारख्या तंत्रांचा वापर करणे
भावनिक नियमन का महत्त्वाचे आहे?
भावनिक नियमन हे आपल्या मानसिक, सामाजिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. ज्या व्यक्तीला स्वतःच्याभावना समजून घेता येतात आणि त्या योग्य मार्गाने व्यक्त करता येतात, तिला इतरांशी संवाद साधणे, संबंध टिकवणे आणि आयुष्यातील संघर्षांना सामोरे जाणे, विधायकता वाढवणे अधिक सोपे जाते.
भावनांचे नियमन करण्यास सक्षम असणे, हे एक उत्तम कौशल्य आहे, याचा अर्थ असा की लोक मोठे होताना अनेकदा भावनिक नियमन शिकतात. काही लोकांना त्यांच्या भावनांचे नियमन करणे इतरांपेक्षा सोपे वाटू शकते. याच्या महत्त्वाच्या फायद्यांमध्ये, मानसिक शांतता आणि समाधानीपणा अनुभवता येतो. तणावासोबत प्रभावीरित्या सामना करण्याची क्षमता वाढते, नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा येतो व सहकार्य, आवेगावर नियंत्रण ठेवण्याची सवय होते, निर्णय घेण्याची गुणवत्ता सुधारते.
भावना दडपणे आणि नियमन यांमध्ये फरक
अनेकदा लोक भावना दडपण्याला भावनिक नियमन समजतात. पण, हे चुकीचे आहे. भावना दडपल्यास त्या आतून उग्र रूप घेतात व शेवटी मानसिक तणाव, चिंता किंवा शारीरिक आजारांचे कारण होऊ शकतात. भावनिक नियमन म्हणजे त्या भावनांचा अनुभव जरूर घेणे, त्या टाळणे नव्हे. पण, त्या भावना योग्य पद्धतीने समजून घेणे, त्यांचे विश्लेषण करणे, व्यक्त करणे आणि त्यांवर योग्य नियंत्रण ठेवणे. आपल्याला राग येतो ही नैसर्गिक गोष्ट आहे. राग येणे चुकीचे नाही. पण, तो राग कोणावर, कसा आणि कधी व्यक्त करायचा, हे ठरवणे हे भावनिक नियमन होय. एखाद्या अपयशानंतर आत्मविश्वास खचतो, पण त्या भावनेला समजून घेऊन पुढील प्रयत्नासाठी स्वतःला प्रेरित करणे, हेही भावनिक नियमनाचे उदाहरण आहे.
योग्य भावनिक नियमन नसल्यासकाय होऊ शकतं?
जर भावना ओळखल्या गेल्या नाहीत किंवा त्यांना योग्य प्रकारे प्रतिसाद दिला गेला नाही, तर याचा व्यक्तीच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत व्यक्ती अत्यधिक चिंता, भीती किंवा नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकते. यामुळे रागाचा अतिरेक, निराशा, चिंता-विकार यांसारख्या मानसिक समस्या उद्भवू शकतात. भावनांचे नियमन न झाल्यामुळे नातेसंबंधांत तणाव निर्माण होतो आणि संवादात अडथळे निर्माण होतात. याशिवाय, अशा भावनिक ताणामुळे डोकेदुखी, सततचा थकवा, झोप न लागणे यांसारख्या शारीरिक तक्रारीही दिसून येतात. म्हणून, भावना ओळखणे, स्वीकारणे आणि योग्य रितीने व्यक्त करणे, हे मानसिक आरोग्य टिकवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
भावनिक नियमनाची कौशल्ये शिकवता येतात का? होय, हे कौशल्य आहे; म्हणजेच ते जन्मतः मिळत नाही, तर अनुभव, मार्गदर्शन आणि सराव यांद्वारे विकसित करता येते. लहानपणापासूनच पालक, शिक्षक, किंवा इतर आदर्श व्यक्तींच्या उदाहरणातून मूल हे शिकत जाते की, एखाद्या परिस्थितीत कशी प्रतिक्रिया द्यायची. काही व्यक्तींना हे नैसर्गिकरित्या अधिक चांगले जमते, तर काहींना विशेष सरावाने ते शिकावे लागते.
भावनिक नियमन हे एक महत्त्वाचे जीवनकौशल्य आहे, जे प्रत्येक व्यक्तीने विकसित करणे आवश्यक आहे. आजच्या गतिमान आणि तणावपूर्ण जगात भावनिक समतोल राखणे हे अधिकच महत्त्वाचे ठरते. योग्य भावनिक नियमनामुळे आपण केवळ स्वतःच्या मानसिक आरोग्याचे रक्षण करू शकतो, असे नाही, तर आपल्या भोवतालच्या लोकांशीही चांगले संबंध राखू शकतो. त्यामुळे, हे कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा, हेच खरे आत्मविकासाचे टप्पे आहेत.
- डॉ. शुभांगी पारकर