अष्टांगयोगापैकी पहिल्या चार अंगांचे संक्षिप्त वर्णन आपण मागील लेखात बघितले. आता पुढील चार अंगांची उजळणी करू.
पाचवे अंग प्रत्याहार म्हणजे त्यागणे. ऐहिक जीवनाविषयीच्या इच्छा, आकांक्षा, वासना यांबद्दल मानसिकरित्या त्याग साधणे. या सर्व इच्छा-आकांक्षांमध्ये खाण्याची इच्छा त्यागणे अत्यंत अवघड आहे. समर्थ रामदास स्वामींसारख्या जप-यज्ञ करणार्या योग्याला खिरीची वासना मारायला आकंठ खीर खाऊन तिची ओकारी करून परत परत खावी लागली. तसेच कवराच्या भाजी भाकरीसाठी पक्वांन्नांनी भरलेली ताटे दूर लोटून दिवसाच्या तिसर्या प्रहरापर्यंत उपवासी राहणारे शेगांवचे महान योगी श्री गजानन महाराज किंवा भर पंक्तीत वाढलेल्या ताटाला स्पर्श न करता, न जेवता उठून जाणारे ‘मनशक्ती लोणावळा’चे स्वामी विज्ञानानंद ज्यांनी आपले उर्वरित आयुष्य समाजाच्या भल्यासाठी खर्च केले, तिथे तुमच्या आमच्यासारख्या साधारण योगसाधकाची काय गत? त्यासाठी सोपा मार्ग प्रत्येक विषयाचा, गोष्टीचा, पदार्थांचा तुलनात्मक अभ्यास करून त्यांतील फायदे व तोटे लक्षात घेऊन त्याप्रमाणे नम्रपणे स्वीकार किंवा अस्वीकार करण्याचा सराव करावा व मर्यादित उपभोग घेण्याची सवय ठेवावी.
इंद्रियांद्वारे उत्पन्न होणार्या विषयवासना पूर्णपणे मारून टाकण्याचा प्रयत्न केल्यास ते तेवढ्याच वेगाने परत उफाळतात. त्यापेक्षा कमीत कमी समाधान मानण्याची सवय केल्यास हळूहळू इंद्रियदमन करण्याची कला साधते. मधुमेहामध्ये प्रत्याहार रोजच्या रोज करावा लागतो. त्यासाठी मधुमेह हा अपकार नसून उपकार ठरतो. तिथे प्रत्याहार हा मन मारून करावाच लागतो. मर्यादेत समाधान मानायची सवय करावी लागते.
त्यासाठी ध्यानाच्या दुसर्या पायरीचा - काहीही न करण्याच्या कलेचा - अतिशय चांगला उपयोग होतो, जिथे मन अनासक्त होऊन आवश्यकतेपेक्षा जास्त कुठेच गुंतत नाही. पण, प्रश्न असा येतो की, हे सर्व कशासाठी करायचे, तर शक्तिसंचय करण्यासाठी. मनाच्या शक्तीचा होत असलेला व्यर्थ र्हास थांबवून ती शक्ती आध्यात्मिक मार्गाकडे लावणे, हा हेतू असतो. साधे उदाहरण म्हणजे, पोथ्या, पुराणे, वेद, गीता, दासबोध, एकनाथी भागवत, ज्ञानेश्वरी हे म्हातारपणी वाचू, असे म्हणून तारुण्यातील शक्ती ऐहिक गोष्टींकडे उधळणार्याला आयुष्यात काहीही साधत नाही. कारण, म्हातारपणी शरीराचे एक एक गात्र शिथील होत जाते. साधे वाचण्याचे कर्मपण डोळे अधू झाल्यामुळे जास्त वेळ साधत नाही, मग बाकीचं तर विसरूनच जा.
धारणा : योगाचे सहावे अंग. आपल्या मनाला सारखे काही ना काही वैचारिक खाद्य लागते, नव्हे ते द्यावे लागते. त्या खाद्याचे दोन प्रकार पडतात. एक बाहेरील खाद्य. जे वाचन, मनन, चिंतन, श्रवण करून मिळते. दुसरे ते आंतरिक खाद्य. म्हणजे ‘मी कोण’ या प्रश्नाचे उत्तर. ते खरे असावे लागते, वास्तव असावे लागते. न बदलणारे, नष्ट न होणारे, प्रत्यक्ष प्राकृतिक दृष्टीने अगोचर न होणारे, मनश्चक्षुला अगोचर होणारे, ध्यानात अनुभवाला येणारे, दृश्य सृष्टीच्या पलीकडले, तपोनिष्ठ साधकांनी अनुभवलेले,
कल्पनेपलीकडले असावे लागते. त्यासाठी योगसाधकाने स्वतःच्या मनावर म्हणजे हृदयावर हात ठेवून स्वतःला प्रश्न विचारावा ‘मी कोण?’ आपण असा वाक्प्रचार करतो, ‘हा हात माझा आहे, हे डोकं माझं आहे, हे शरीर माझं आहे, ती वस्तू माझी आहे.’ याचा अर्थ हात म्हणजे मी नव्हे! डोकं म्हणजे मी नव्हे! शरीर म्हणजे मी नव्हे! वस्तू म्हणजे मी नव्हे! मग हा ‘माझं, माझं...’ म्हणणारा कोण? उत्तर भगवंतांनी गीतेत दिलेले आहे, ते असे,
ममैवांशो जीवलोके
जीवभूतः सनातनः।
मनः षष्ठानीन्द्रियाणि
प्रकृतिस्थानि कर्षति॥
(श्रीमद्भगवद्गीता
अ15 श्लोक 7)
अर्थ: या देहात असणारा हा सनातन जीवात्मा माझाच अंश आहे आणि तोच प्रकृतीत स्थित मनाला आणि पाचही इंद्रियांना आकर्षित करतो.
याचा अर्थ, मी म्हणजे भगवंताचा अंश स्वयंपूर्ण आत्मा हा संकल्प मनाला देणे व तो मनात धारण करणे, म्हणजे खरी धारणा आणि त्यांचे आकलन होण्यासाठी जे करावे लागते, त्याचे नाव ध्यान. ते योगाचे सातवे अंग. शब्दमर्यादेचे बंधन असल्याकारणाने ते आपण पुढील लेखात बघू. (क्रमशः)
- गजानन जोग
(लेखक योगोपचारतज्ज्ञ, समुपदेशक आहेत.)