‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ जेपीसीचा देशव्यापी दौरा, प्रारंभ महाराष्ट्रापासून
22-Apr-2025
Total Views | 14
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ जेपीसीचा देशव्यापी दौरा, प्रारंभ महाराष्ट्रापासून
नवी दिल्ली, 'एक राष्ट्र, एक निवडणूक' या विषयावरील संयुक्त संसदीय समितीचा (जेपीसी) देशातील सर्व राज्यांचा दौरा करणार आहे. त्याचा प्रारंभ १७ मे पासून महाराष्ट्र दौऱ्यापासून होईल, अशी माहिती जेपीसी अध्यक्ष आणि भाजप खासदार पी. पी. चौधरी यांनी मंगळवारी दिली आहे.
देशातील राज्यांना भेट देऊन त्यांचे मत ऐकले पाहिजे, म्हणूनच हा दौरा आयोजित केला जात आहे. १७-१८ मे रोजी प्रथम महाराष्ट्राचा दौरा केला जाईल, त्यानंतर १९ ते २१ मे दरम्यान उत्तराखंडचा दौरा केला जाईल. जूनमध्ये वेगवेगळ्या श्रेणींनुसार जम्मू आणि काश्मीर, चंदीगड (पंजाब आणि हरियाणा) यांचा दौरा केला जाईल. देशातील लोकांचे विचार जाणून घेण्यासाठी प्रत्येक घटकाशी चर्चा केली जाणार आहे, सर्वसामान्य नागरिक, खेळाडू असो किंवा इतर कोणीही असो. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतरच समिती आपला अहवाल तयार करणार आहे, असे खासदार पी. पी. चौधरी म्हणाले.
समितीचे कामकाज पारदर्शक असावे, यासाठी सर्वसहमतीने संकेतस्थळ तयार करण्यात आल्याची माहिती चौधरी यांनी दिली. ते पुढे म्हणाले, समितीने दोन प्रमुख बाबींवर निर्णय घेतले. जाहिरात सर्व भाषांमध्ये छापली जाईल जेणेकरून सर्व भागधारक त्यांचे मत देऊ शकतील. दुसरे म्हणजे, संकेतस्थळारही सर्व भागधारकांकडून सूचना मागविणे. संकेतस्थळास कोणत्याही तांत्रिक अडचणी येऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. लवकरच क्यूआर कोड सुविधेसह हे संकेतस्थळ लवकरच सुरू केले जाणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
दरम्यान, जेपीसीची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती हेमंत गुप्ता, जम्मू आणि काश्मीर उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती एसएन झा, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि २१ व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष डॉ. न्यायमूर्ती बीएस चौहान आणि राज्यसभा सदस्य व ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी जेपीसीसोबत संवाद साधला.