शारीरिक संवेदना, वेग यांचे जेव्हा प्रकटीकरण होते, तेव्हा ते वेग शरीरातून बाहेर उत्सर्जित होणे गरजेचे असते. मागील पाच लेखांमधून विविध अधारणीय शारीरिक वेगांबद्दल आपण वाचले. या श्रृंखलेतील पुढील वेग म्हणजे छर्दि. याला बोली भाषेत उलटी असे म्हणतात. आज उलटी ही संवेदना उत्पन्न होण्याची कारणे व तो वेग रोखला, थांबविला, तर होणारे अपाय यांबद्दल विस्तर जाणून घेऊया...
छर्दि हा वेग, ही संवेदना जेव्हा उत्पन्न होते, त्यामागे शारीरिक किंवा मानसिक कारण (हेतू) असते. या हेतूचे निराकारण करण्यासाठी छर्दि या वेगाची संवेदना उत्पन्न होते. छर्दि काही वेळेस मळमळ याबरोबर उत्पन्न होते. व काही वेळेस मळमळीशिवाय.
काही अभद्र बघितले किंवा घाणेरडा वास आला, तर काही संवेदनशील व्यक्तींमध्ये मळमळ ही संवेदना उत्पन्न होते. भरल्या पोटी जर बघितले, वास घेतला, वर्णन ऐकले, तर छर्दि होऊ शकते. काही वेळेस मानसिक ताणामध्ये तोंडचे पाणी तर पळून जातेच, पण त्याचबरोबर मळमळही उत्पन्न होते. यातही अति जल (द्रव) प्यायले किंवा बळजबरी जेवले, तर उलटी होऊ शकते. काही औषधांचा दुष्परिणाम म्हणून उलटी होते. जसे केमोथेरपीच्या औषधांनी तीव्र मळमळ व उलटी होते. काही स्वाभाविक शारीरिक स्थितींमध्ये जसे गर्भिणीमध्ये (विशेषतः पहिल्या तीन महिन्यांमध्ये) तीव्र मळमळ व उलटी उत्पन्न होते. (पहिल्या तीन महिन्यांत) जसजशी गर्भाची वाढ होऊ लागते, गर्भ मातेच्या शरीरात स्थिर होतो, मळमळ-उलटी ही संवेदना शमते. काही वेळेस प्रवासाचा त्रास म्हणून मळमळ उलटी होते.
रस्त्याने प्रवास (बस, गाडी इ.) बोटीने (जलमार्गाने) जाताना याचा प्रामुख्याने त्रास होतो. क्वचितप्रसंगी विमानाने प्रवास करतेवेळीदेखील मळमळ, उलटी होते. शरीरात पित्त वाढले की, ते शरीराबाहेर उलटीवाटे निघते. पित्ताच्या विविध व्याधींमध्ये उलटी व मळमळ हे लक्षण असते. शिरःशूल यामध्ये क्वचित उलटीही होते. उलटी झाल्यावर डोके दुखण्याची तीव्रता कमी होते. काही वेळेस अन्न, पाणी बाधले, अति खाणे झाले, अजीर्ण झाले, तरीदेखील उलटी होते. विशिष्ट आहाराच्या वासाने मळमळ व उलटी उत्पन्न होते. एखाद्या आहारातील जिन्नसाची अॅलर्जी असली, तरीसुद्धा उलटी हे लक्षण उत्पन्न होऊ शकते. अन्न-पाणी (विशेषतः शिळे अन्न, दुषित पाणी) याने पोटात इन्फेक्शन होऊ शकते. यामध्ये बरेचदा जुलाबाबरोबर उलट्याही होतात.
पोटाच्या अन्य काही तक्रारींमध्ये अन्न वरवर येते.मध्ये अति खाल्ले नाही, तरी अन्न वरवर येते. जेवणाला उशीर झाला, तरी जेवल्यावर अन्न वरवर येते. यासाठी फक्त उलटी थांबविणे किंवा उलटी अडविणे हा उपाय नाही. ’ॠशीव’ व इतर पचनसंस्थेच्या तक्रारींची समूळ चिकित्सा करणे गरजेचे आहे. कारण, खाल्लेले अन्न पचले नाही, तर शरीराचे पोषण होणार नाही. मग त्या व्यक्तीला थकल्यासारखे, गळल्यासारखे वाटते, वजन कमी होऊ लागते. चिडचिड वाढते आणि कशातच उत्साह वाटत नाही.
याचबरोबर काही विशिष्ट आजार आहेत, त्यांच्या लक्षणांमध्ये उलटी हेदेखील एक लक्षण आहे. जसे किडनी स्टोन. किडनी स्टोनचा अटॅक आला की उलट्या होऊ शकतात. याचबरोबर अपेन्डिक्सच्या तीव्र पीडेमध्येदेखील उलटी होऊ शकते. पित्ताशयाच्या खड्यांच्या हिरीश’ मध्ये उलट्या होणे हे एक लक्षण असते. तसेच मेंदूच्या गाठी, ग्रंथी असल्यासही उलटी होऊ शकते.
काही व्यसनांचे अतिरेकी सेवन (जसे अति मद्यपान) याचेही परिणाम म्हणून उलटी होऊ शकते. या सगळ्या कारणांमुळे मळमळ व उलटी उत्पन्न होते. यातून असे लक्षात येईल की, मनुष्य शरीरात किंवा मानसिकतेमध्ये बदल, बिघाड झाला की, त्यातून उत्पन्न होणारे एक लक्षण म्हणजे उलटी होय. उलटी या माध्यमातून शरीरातील टाकाऊ घटक किंवा शरीर, मनाला अपाय करणारा घटक बाहेर टाकण्याची क्रिया केली जाते. हा वेग, ही संवेदना थांबवू नये. हा शारीरिक वेग आहे आणि त्याचे धारण करू नये. जर हा वेग थांबविला, तर विविध रोग उत्पन्न होऊ शकतात.
छर्दिवाटे शरीरातील अतिरिक्त पित्त प्रामुख्याने बाहेर निष्कासित केले जाते. याचबरोबर न पचलेले अन्न व कफही निघतो. जर छर्दि वेग रोकला, तर हे दुषित घटक (कफ आणि पित्त) शरीरात पुनः प्रवेशित होऊन सर्वांगावर खाज (तीव्र स्वरुपाची) उत्पन्न करतात. अंगावर पित्ताचे चट्टे तयार होतात, असे वारंवार झाले तर णीींळलरीळरचे तीव्र स्वरुप उत्पन्न होते. जेवढे क्रोनिक हे त्रास असतील, तेवढी अधिक तीव्र स्वरुपाची अधिक काळासाठी चिकित्सा करावी लागू शकते.
शरीरातील अनावश्यक घटक व दुषित घटक शरीरातून बहिष्कृत केले गेले नाहीत, तर अन्नवहन संस्थेची, पचनसंस्थेची विविध लक्षणे व व्याधी उत्पन्न होऊ शकतात. जसे अन्नातील इच्छा निघून जाणे, जेवावेसे न वाटणे (अरुचि), आहार बेचव वाटणे, अन्नसेवन केले नाही, तर आहाराने पोषण होणार नाही, मरगळ थकवा जाणवेलच, त्याचबरोबर प्रतिकारशक्ती कमी होऊन विविध व्याधी जडू शकतील. वजन कमी होणे, विविध आजारांमुळे इन्फेक्शनमुळे ताप येऊ शकतो. कारण, नसताना सतत मळमळ निर्माण होऊ शकते. पोषक घटकांच्या कमतरतेमुळे रक्ताल्पता (रपरशाळर) निर्माण होऊ शकते. याचबरोबर त्वचेच्या अगणित तक्रारी (त्वचारोग) उत्पन्न होऊ शकतात. ज्या स्रावी (वाहणार्या) स्वरुपाच्या व चिघळणार्या जखमांच्या स्वरुपाच्या असू शकतात. अजीर्ण अपात्रित अन्नघटक यांच्यामुळे त्वचेच्या तक्रारी (आधीच्या असतील त्या) त्यांची तीव्रता वाढते, ते अधिक पसरते आणि चिघळते.
यामध्ये चेहर्यावर पुरळ इत्यादीही उत्पन्न होऊ शकते. सर्वांगावर किंवा विशिष्ट भागी सूज उत्पन्न होऊ शकते. शरीरात कडकपणा, जडत्व निर्माण होऊ शकते. याचबरोबर चटकन निर्माण होऊन पसरणार्या त्वचेच्या तक्रारी, जसे विसर्प, ज्यात खाज व साज दोन्ही ही तीव्र स्वरुपाचे असते, अशा व्याधी उत्पन्न होऊ शकतात हे सगळे बघितल्यावर असे लक्षात येईल की, शरीरातून जे टाकाऊ घटक आहेत, ते शरीराबाहेर वेळच्या वेळी निष्कासित करणे अत्यंत गरजेचे आहे. असे न केल्यास, विविध आजारांचे ते कारण निमित्त ठरते. (क्रमश:)
- वैद्य कीर्ती देव
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मॅटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)