मुंबई विमानतळालगतच्या चांदिवली येथील झोपडपट्टीत वास्तव्यास राहणार्या लोकांच्या राहणीमानात सुधारणा व्हावी, या हेतूने झोपडपट्टी चळवळ सुरू करणार्या घनश्याम भपकार यांच्याविषयी...
बईसारख्या महानगरात जेव्हा झगमगाट, उंचच उंच इमारती आणि विकासाचे प्रकल्प दिसतात, तेव्हा त्यामागे असलेले झोपडपट्टीतील वास्तव बर्याचदा झाकोळलेले राहते. परंतु, हाच चेहरा समोर आणण्याचे आणि त्याच्या हक्कांसाठी लढण्याचे काम घनश्याम भापकर यांच्यासारखे कार्यकर्ते करतात. झोपडपट्टी चळवळीचे अध्यक्ष असलेले घनश्याम भापकर यांनी केवळ आंदोलन, उपोषण किंवा घोषणांनी नव्हे, तर स्वतःच्या अनुभवातून निर्माण झालेल्या चळवळीतून, हजारो झोपडीधारकांना हक्काचे घर मिळवून देण्याचा संघर्ष केला आहे.
घनश्याम भापकर यांचे बालपण, कुर्ला-अंधेरी मार्गाजवळील क्रांतीनगर आणि संदेशनगर विमानतळालगत असलेल्या झोपड्यांमध्ये गेले. केवळ आठ बाय दहा फुटांचे घर, त्यात आईवडील आणि दोन भावंडे अशा लहान जागेत त्यांचे आयुष्य घडत होते. आईचे स्वयंपाकघर, घरातील विश्रांतीसाठी असलेली जागा आणि अभ्यासासाठीचा कोपरा या सर्व गरजा, त्या छोट्याशा घरात भागवाव्या लागत होत्या. त्यांचे वडील जागेअभावी रात्री मुद्दामच उशिरा घरी येत. ही परिस्थितीच त्यांना अनेक गोष्टी शिकवून गेली. घर चालवण्यासाठी संपूर्ण कुटुंब हातभार लावत होते. कोणी धागा कापण्याचे काम करत होते, कोणी औषधांची पत्रके दुमडण्याचे करत होते. एवढे असूनही त्यांनी आपल्या शालेय शिक्षणापर्यंतचा अभ्यास, स्मशानभूमीत बसून पूर्ण केला. या सार्या अडचणी त्यांना लहानपणी जास्त जाणवल्या नाहीत. पण, वय वाढल्यानंतर त्यांना जाणवले की, या अडचणींमुळे आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या संधी त्यांनी गमावल्या गेल्या.
हीच जाणीव घनश्याम यांच्या झोपडपट्टी चळवळीची सुरुवात ठरली. त्यांनी स्वतःच्या मनाशी ठरवले की, आपल्या पाठीमागे येणार्या नव्या पिढ्यांनी ही अडचण पुन्हा अनुभवू नये. ही तळमळ त्यांनी कृतीत उतरवली आणि झोपडपट्टीतील लोकांच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ त्यांनी सुरू केली. विशेष म्हणजे, या लढ्यात त्यांना स्थानिकांचा भरघोस पाठिंबा मिळाला. शासनाच्या योजनांचा अभ्यास करून, कायद्यातील तरतुदी समजून घेऊन, त्यांनी झोपडपट्टी पुनर्वसनाच्या प्रक्रियेत पाठपुरावा करून गती आणण्याचे काम केले.
विमानतळ प्राधिकरणाच्या हद्दीत येणार्या संदेशनगर आणि क्रांतीनगर परिसरातील प्रकल्प,गेल्या 50 वर्षांपासून रखडले होते. या विरोधात भापकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलने, उपोषणे, रस्ता रोको, जेलभरो अशा अनेक संघर्षात्मक मार्गांनी आवाज उठवण्यात आला. या संघर्षमयी प्रयत्नांतून आज सुमारे दोन हजार झोपडीधारकांना, ‘वन बीएचके’ घरं मिळाली आहेत. हा आकडा केवळ यशाचे प्रतीक नाही, तर एका सक्रीय चळवळीचा परिणाम आहे.
आजही भापकर यांचे प्रयत्न थांबलेले नाहीत. कुर्ला पश्चिममधील बैलबाजार परिसर हा मोठ्या झोपडपट्टीसह विमान प्राधिकरण क्षेत्रात येतो. या भागात त्यांनी ही चळवळ सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या पुनर्वसन योजनांमध्ये असलेल्या त्रुटींवर, घनश्याम हे सातत्याने काम करत आहेत. त्यांच्या मते, योजनांमध्ये समाविष्ट असलेली प्रक्रिया अत्यंत गुंतागुंतीची असून, त्यात अधिक पारदर्शकता व वेग आवश्यक आहे.
भापकर यांचे स्पष्ट मत आहे की, पुनर्वसन केवळ घर मिळवण्यासाठी नसून ते शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. पुनर्वसित झाल्यावर मुलांना अभ्यासासाठी जागा मिळते, मुलींच्या सुरक्षेचे प्रमाण वाढते आणि एकूणच कुटुंब आर्थिकदृष्ट्या सक्षम होते. त्यामुळे झोपड्यांमधील पिढ्या केवळ जगण्यासाठी नव्हे, तर स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी पुढे येतात.
भापकर यांना विश्वास आहे की, व्यसनमुक्त, सशक्त आणि सुशिक्षित नागरिक हीच आपल्या देशासाठी खरी संपत्ती आहे. म्हणूनच झोपडपट्टीतील प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे, ही त्यांची धडपड आजही तितक्याच ताकदीने सुरू आहे. त्यांनी सुरू केलेली ही झोपडपट्टी चळवळ केवळ सामाजिक नाही, तर मानवी हक्कांची लढाई आहे.
या चळवळीला केवळ स्थानिकांचा पाठिंबा नाही, तर अनेक वर्षांच्या अनुभवाचा आणि भावनिक बळाचा आधारही आहे. झोपडपट्टीतून आलेल्या मुलांनी स्वतःचे भवितव्य घडवावे आणि समाजाचेही परिवर्तन व्हावे, यासाठीचा भापकर यांचा लढा थांबलेला नाही. झोपडपट्टीत राहणार्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी चालू असलेल्या संघर्षाची ही कहाणी केवळ फक्त प्रेरणादायीच नाही, तर समाजासाठी आवश्यक दिशादर्शकही ठरते. अशा भापकर यांच्या चळवळीला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
- सागर देवरेे