मुंबई (विशेष प्रतिनिधी) - पिंजोर येथील जटायू संवर्धन प्रजनन केंद्रामध्ये जन्मास आलेली ३४ गिधाडे महाराष्ट्रात पाठविण्यात आली आहेत (Vultures shifted from Pinjore to Maharashtra). यामध्ये लांब चोचीच्या आणि पांढऱ्या पुठ्ठ्याच्या गिधाडांचा समावेश आहे (Vultures shifted from Pinjore to Maharashtra). वन विभागाच्या मदतीने 'बाॅम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी'कडून (बीएनएचएस) राज्यात गिधाड संवर्धन प्रकल्प सुरू असून याअंतर्गत प्रजनन केंद्रात पैदास झालेल्या गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत आहे. (Vultures shifted from Pinjore to Maharashtra)
देशातून नामशेष होण्याच्या वाटेवर असणाऱ्या गिधाडांच्या संवर्धनासाठी 'बीएनएचएस' गेल्या कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. याअंतर्गत हरिणायातील पिंजोर येथे 'बीएनएचएस'ने गिधाड प्रजनन केंद्र उभारले आहे. या केंद्रात प्रजनन करण्यात आलेली एकूण २० गिधाडे ही २०२४ मध्ये ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात आली होती. प्रजनन केंद्रात पैदास करण्यात आलेली गिधाडे नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर त्यातील निम्याहून अधिक गिधाडांचा मृत्यू अटल असतो. मात्र, कालांतराने मृत्यूचे प्रमाण कमी होते. याच धर्तीवर पहिल्या टप्प्यात पिंजोरीवरुन महाराष्ट्रात आणण्यात आलेली काही गिधाडे नैसर्गिक अधिवासात सोडल्यानंतर मृत पावली. त्यानंतर आता दुसऱ्या टप्यात पिंजोरहून ३४ गिधाडे २२ एप्रिल रोजी महाराष्ट्रात पाठविण्यात आली आहेत. राज्यात पाठविण्यात आलेली गिधाडे ही २ ते ६ वर्षांची असून आरोग्य तपासणीनंतर जंगलात सोडण्यासाठी सक्षम असलेल्या गिधाडांची निवड करण्यात आली आहे. प्रवासादरम्यान ताण कमी करण्यासाठी आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक गिधाड स्वतंत्र लाकडी बॉक्समध्ये ठेवून तीन वातानुकूलित टेम्पो ट्रॅव्हलर्समधून आणण्यात आले आहे. वाहतुकीपूर्वी, मानक प्रोटोकॉलनुसार पक्ष्यांना दोन दिवसांपूर्वी खायला देण्यात आले होते.
महाराष्ट्रात आणण्यात आलेल्या ३४ गिधाडांपैकी २० गिधाडे ही लांब चोचीच्या प्रजातीची असून १४ गिधाडे ही पांढऱ्या पुठ्ठ्याची आहेत. या गिधाडांना मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि पेंच व्याघ्र प्रकल्पात पाठविण्यात येईल. याठिकाणी प्री-रिलीज एव्हीअरी तयार करण्यात आल्या असून नैसर्गिक अधिवासात सोडण्यापूर्वी त्यांना याठिकाणी ठेवण्यात येईल. त्यानंतर सॅटेलाईट टॅग लावून गिधाडांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येईल. 'बीएनएचएस'ने पिंजोर येथे हरियाणा सरकार, भोपाळ येथे मध्य प्रदेश सरकार, राजाभटखावा येथे पश्चिम बंगाल सरकार आणि राणी, गुवाहाटी येथे आसाम सरकार यांच्या सहयोगाने चार जटायू संवर्धन प्रजनन केंद्रे स्थापन केली आहेत. या संवर्धन प्रजनन कार्यक्रमाद्वारे, बीएनएचएसने २००४ पासून ७०० हून अधिक गिधाडांचे प्रजनन केले आहे. त्यानंतर आता ही गिधाडे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येत आहेत.