धर्म विचारला आणि नंतर गोळ्या घातल्या...

    22-Apr-2025
Total Views |

- पहलगाममध्ये पाकपुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांचा हल्ला, पर्यटकांचा बळी

- एकही दहशतवादी वाचणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पहलगाममध्ये, उच्चस्तरीय बैठका सुरू

नवी दिल्ली, दि. २२ : विशेष प्रतिनिधी जम्मू – काश्मीरमधील प्रमुख पर्यटन
केंद्र असलेल्या पहलगाममध्ये मंगळवारी सायंकाळी पाकपुरस्कृत इस्लामी
दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी प्रथम धर्म विचारला आणि त्यानंतर
गोळीबार केला, असे हल्ल्याच्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. हल्ल्यात
जवळपास २६ पर्यटकांचा बळी गेल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून अनेक पर्यटक
जखमी झाले आहेत.

जम्मू आणि काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाममध्ये मंगळवारी पोलिसांच्या
गणवेशातील दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला. अधिकाऱ्यांनी
सांगितले की हा हल्ला बैसरन खोऱ्यात झाला, जेथे फक्त पायी किंवा खेचरांनी
पोहोचता येते. मंगळवारी सकाळी पर्यटकांचा एक गट तिथे भेट देण्यासाठी गेला
होता, याच गटावर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये काही पर्यटकांचा बळी
गेला असून अनेक पर्यटक जखमी झाले आहेत. पाकिस्तानची दहशतवादी संघटना लष्कर ए
तोयबाच्या टीआरएफने या हल्ल्याची जबाबदारी घेतल्याचे समजते. धक्कादायक म्हणजे
दहशतवाद्यांनी पर्यटकांना प्रथम त्यांचा धर्म विचारला आणि हिंदू असल्याचे
समजल्यावर वेचून प्रामुख्याने पुरुषांवरच गोळीबार करण्यात आल्याचे
प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे.

हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तातडीने श्रीनगरला पोहोचले. येथे
त्यांनी उपराज्यपाल मनोज सिन्हा, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि सुरक्षा
दलांच्या अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी केंद्रीय
गृहमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक ते निर्देश जारी केले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पहलगाम येथे जाण्यापूर्वी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनाही घटनेची सविस्तर माहिती दिली. त्याचप्रमाणे या भ्याड
दहशतवादी कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि गुन्हेगारांवर कठोर
कारवाई करू, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्र्यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे दिली आहे.

दहशतवाद्यांना सोडणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडले जाणार नाही. त्यांचा हिंसक अजेंडा
कधीही यशस्वी होणार नाही. दहशतवादाविरुद्ध लढण्याचा आमचा निर्धार अढळ आहे आणि
तो आणखी मजबूत होईल, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्याप्रती आपण
संवेदना व्यक्त करतो. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी आपण प्रार्थना करत
आहोत, असेही पंतप्रधानांनी म्हटले आहे.

हे हिंदू दिसत आहेत, यांना मारा...

पाकपुरस्कृत इस्लामी दहशतवाद्यांनी धर्म विचारून हल्ला केला, असे
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. एका व्हिडीओमध्ये एक महिला परिस्थिती सांगत
असून त्यामध्ये “मी आणि माझे पती येथे बसून भेळ खात होतो. दरम्यान, दहशतवादी
आले आणि म्हणाले की तो मुस्लिम दिसत नाही, त्याला मारून टाका आणि त्यांनी
माझ्या पतीला गोळ्या घातल्या” असे संबंधित महिलेने सांगितले आहे.

---------------------------

अमानवी हल्ल्याचा निषेध – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला दहशतवादी हल्ला
धक्कादायक आणि वेदनादायक आहे. हे एक भयानक आणि अमानवी कृत्य आहे, ज्याचा
स्पष्टपणे निषेध केला पाहिजे. निष्पाप नागरिकांवर आमि पर्यटकांवर हल्ला करणे
अत्यंत भयावह आणि अक्षम्य आहे. ज्या कुटुंबांनी आपले प्रियजन गमावले आहेत
त्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना.

---------------------------

संरक्षण मंत्र्यांची लष्करप्रमुखांशी चर्चा

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी
यांच्याशी चर्चा केली आहे. त्याचप्रमाणे या भ्याड हल्ल्याचा निषेध करून
दहशतवाद्यांना सोडणार नसल्याचीही खात्री त्यांनी दिली आहे.

---------------------------

दहशतवाद्यांना मोठी किंमत मोजावी लागणार – मनोज सिन्हा, उपराज्यपाल – जम्मू
काश्मीर

दहशतवाद्यांना निष्क्रिय करण्यासाठी दहशतवादविरोधी मोहीम सुरू करण्यात आली
आहे. संपूर्ण देश संतप्त आहे आणि आपल्या सैन्याचे रक्त खवळले आहे. मी देशाला
खात्री देऊ इच्छितो की पहलगाम हल्ल्यातील गुन्हेगारांना त्यांच्या घृणास्पद
कृत्याची खूप मोठी किंमत मोजावी लागेल.

---------------------------

हल्ला धक्कादायक – ओमर अब्दुल्ला, मुख्यमंत्री – जम्मू काश्मीर

काश्मीरमध्ये आलेल्या पर्यटकांवर झालेला हा हल्ला अतिशय धक्कादायक आहे. या
हल्ल्याचा निषेध करण्यासाठी शब्द नाहीत. मृतांच्या कुटुंबियांप्रती आपण
सहानुभूती व्यक्त करतो.

---------------------------

सरकारने कठोर कारवाई करावी – दत्तात्रेय होसबळे, सरकार्यवाह, राष्ट्रीय
स्वयंसेवक संघ

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेला क्रूर दहशतवादी हल्ला
अत्यंत निषेधार्ह आणि दुःखद आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या सर्वांना आम्ही
श्रद्धांजली अर्पण करतो आणि जखमींनी लवकर बरे होण्याची कामना करतो. हा हल्ला
देशाच्या एकता आणि अखंडतेवर हल्ला करण्याचा प्रयत्न आहे. सर्व राजकीय पक्ष आणि
संघटनांनी सर्व मतभेदांच्या पलीकडे जाऊन याचा निषेध केला पाहिजे. सरकारने सर्व
पीडितांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी आवश्यक व्यवस्था करावी.
आणि या हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्यांना शिक्षा करण्यासाठी सरकारने लवकरच
योग्य ती पावले उचलावीत.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121