विदर्भातील १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
गोसीखुर्द प्रकल्पासाठी २५ हजार ९७२ कोटींची तरतूद
22-Apr-2025
Total Views |
विदर्भातील १ लाख ९६ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार
- गोसीखुर्द प्रकल्पासाठी २५ हजार ९७२ कोटींची तरतूद
मुंबई : भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाच्या कामासाठी २५ हजार ९७२ कोटी ६९ लाख रुपयांच्या खर्चाच्या तरतूदीस मंगळवार, दि. २२ एप्रिल रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चौथी प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामुळे नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यातील १ लाख ९६ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.
गोसीखूर्द राष्ट्रीय प्रकल्प हा विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर यांच्याद्वारे राबविण्यात येत आहे. गोदावरी खोऱ्यातील वैनगंगा उपखोऱ्यात वैनगंगा नदीवर गौसीखुर्द (ता.पवनी) येथे हा बहुउद्देशीय प्रकल्प साकारण्यात येत आहे. सिंचन, पिण्यासाठी पाणी, औद्योगिक पाणी पुरवठा व मत्स्यव्यवसाय व जलविद्युत निर्मिती असा हा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. या प्रकल्पातून खुले कालवा वितरण, उपसा सिंचन व बंदिस्त नलिका वितरण या पद्धतीने नागपूर, चंद्रपूर व भंडारा जिल्ह्यांतील सिंचन क्षेत्राला लाभ होणार आहे. हा प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समाविष्ट आहे. पूर्व विदर्भातील हा मोठा व महत्वाचा राष्ट्रीय प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा यादृष्टीने या प्रकल्पाच्या खर्चास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता म्हणून मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.