मुंबई : सलमान खाननंतर आता छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता अभिनव शुक्ला बिश्नोई गँगच्या रडारवर आल्याचं दिसत आहे. रुबीना दिलैकचा पती असलेल्या अभिनवला, 'एके-४७ घेऊन तुझ्या घरी येईन,' अशा आशयाचा मेसेज मिळाला आहे. धमकी देणाऱ्याने स्वत:ची ओळख लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य म्हणून करून दिली आहे आणि त्याने आसिम रियाजचंही नाव या धमकीत घेतलं आहे.
इंस्टाग्रामवर 'अंकुश गुप्ता' नावाच्या युजरने अभिनवला धमकीचा मेसेज पाठवला. "मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस आहे. तुझा पत्ता मला माहीत आहे. सलमानच्या घरी जसा गोळीबार केला, तसाच तुझ्या घरी करीन. तुझ्या घरच्यांना आणि सुरक्षारक्षकांनाही सोडणार नाही. १५ लोकांसह मुंबईत येईन," असा मजकूर त्या संदेशात होता.
धमकीत आणखी काय म्हटलं?
संदेशात पुढे असंही लिहिलं होतं, "तू किती वाजता शुटिंगला जातोस हेही माहीत आहे. तुला शेवटची चेतावणी देतोय. आसिमविषयी पुन्हा काही बोलण्याआधी तुझं नाव बातम्यांमध्ये झळकलेलं असेल. लॉरेन्स बिश्नोई जिंदाबाद. बिश्नोई भाई आसिमच्या पाठीशी आहे."
वादातून पेटलेली ही परिस्थिती
'बॅटलग्राऊंड’ या शोच्या चित्रीकरणादरम्यान आसिम रियाज आणि अभिषेक मल्हान यांच्यात वाद झाला होता. झगडा मिटवण्यासाठी पुढे आलेल्या रुबीनावर आसिम भडकला होता. त्यानंतर अभिनवने आसिमच्या वागणुकीवर टीका करत, "वर्तणुकीचं सौजन्य ही खरी फिटनेसची ओळख असते," असं वक्तव्य केलं होतं. हे विधान वादग्रस्त ठरत गेलं आणि अखेर त्याच्याविरुद्ध जीवे मारण्याची धमकीपर्यंत प्रकरण पोहोचलं.
अभिनवची प्रतिक्रिया
या प्रकरणावर अभिनवने एक्स (माजी ट्विटर) वर प्रतिक्रिया दिली आहे. "माझ्या कुटुंबाला ठार मारण्याची धमकी दिली जात आहे," असं त्याने लिहिलं असून, पंजाब पोलिसांना टॅग करत धमकी देणारा मोहाली किंवा चंदीगडमधला असावा, असं त्याने नमूद केलं आहे आणि तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.