मुंबई : (Pope Francis Death) रोमन कॅथोलिक चर्चचे पहिले लॅटिन अमेरिकन पोप फ्रान्सिस यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. कासा सँटा मार्टा या व्हॅटिकनमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची माहिती देताना व्हॅटिकनकडून एक व्हिडीओ संदेश देण्यात आला आहे, ज्यात म्हटले आहे की, 'सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी पोप फ्रान्सिस यांचे निधन झाले. त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य रोम येथील चर्चच्या सेवेसाठी वेचले. पोप फ्रान्सिस यांनी आपल्याला जीवनमूल्ये शिकवली. तसेच धैर्य आणि प्रेमाचा संदेश दिला आहे.'
कार्डिनल जॉर्ज मारियो बर्गोग्लिओ यांची २०१३ मध्ये बेनेडिक्ट सोळावे यांचे उत्तराधिकारी म्हणून निवड झाली होती. त्यांना पोप फ्रान्सिस म्हटले जाते. वयाच्या ७६ वर्षी त्यांची २६६ व्या पोपपदी निवड झाली होती. त्यांच्या निवडीमुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. पोपपदी येणारे पहिले गैर- युरोपीय पोप होते. पोप फ्रान्सिस हे रोमन कॅथलिक चर्चचे नेतृत्व करणारे पहिले लॅटिन अमेरिकन आणि पहिले जेसुइट होते.
पोप फ्रान्सिस यांच्यावर गेल्या बऱ्याच काळापासून उपचार सुरु होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये न्यूमोनियाचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली होती. फेब्रुवारी महिन्यात रोम येथील जेमेली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यावेळी त्यांची प्रकृती आधी ढासळली होती पण नंतर हळूहळू त्यांची प्रकृती सुधारली आणि त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत असलेल्या पोप फ्रान्सिस यांची आज सकाळी ७ वाजून ३५ मिनिटांनी प्राणज्योत मालवली. आदल्या दिवशी म्हणजेच रविवारी २० एप्रिलला पोप फ्रान्सिस यांनी त्यांच्या ईस्टर संडेच्या निमित्ताने केलेल्या भाषणातून विचार, स्वातंत्र्य आणि सहिष्णुतेचे आवाहन केले होते.बॅसिलिकाच्या बाल्कनीतून अंदाजे ३५,००० हून अधिक उपस्थित असलेल्या जनसमुदायाला ईस्टरच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\