मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून मुंबईत प्रतिपालिका सभागृह हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आदित्य ठाकरेंना या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले आहे. यासोबतच कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनादेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील रस्ते, आरोग्य यासह इतर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हा प्रतिपालिका सभागृह कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येत्या २६ एप्रिल रोजी सायंकाळी प्रतिसभागृह भरणार आहे. सध्या मुंबई महापालिकेचा कारभार प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येत असून लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जाते. याच अनुषंगाने हा प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे. यामध्ये प्रतिमहापौर देखील राहणार आहे.
दरम्यान, मनसेने मुंबईतील सर्वच राजकीय पक्षाच्या प्रमुखांना पत्र पाठवून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. यात मंत्री आशिष शेलार, उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे, शरद पवार गटाच्या राखी जाधव, खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर नेत्यांचा समावेश आहे.