मुंबई : राहुल गांधी देशविरोधी परकीय शक्तींच्या हातातले खेळणे बनून परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत आणि ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे, अशी टीका भाजपने केली आहे. राहुल गांधी अमेरिकेत जाऊन महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकांवर भाष्य केले होते.
"राहुल गांधींनी आयुष्यातील अनेक वर्षे काँग्रेसच्या सत्ताकाळात एखाद्या राजकुमाराप्रमाणे सत्ता उपभोगली आहेत. त्यामुळे त्यांची एकाधिकारशाही वृत्ती झाली आहे, त्यामुळेच त्यांना जनतेने लोकशाहीच्या मार्गाने दिलेले जनमत मान्य नाही. भारताची लोकशाही जगातील सर्वात मोठी आणि सुदृढ अशी लोकशाही आहे. त्याचा आदर राहुल गांधींनी करायला हवा. परंतू, ते तसे न करता देशविरोधी परकीय शक्तींच्या हातातलं खेळणं बनून परदेशात जाऊन भारताची बदनामी करत आहेत. ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे," असे भाजपने म्हटले आहे.
"राहुल गांधींना कुठल्या गोष्टींवर आक्षेप असेल तर त्यांनी भारतीय न्यायव्यवस्थेत दाद मागायला हवी, पण ते तसे करणार नाहीत. कारण राहुल गांधींना देशाविरोधी खोटं बोलून भारताची बदनामी करायची आहे आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून बुद्धीभेद करत दिशाभूल करायची आहे," अशी टीकाही भाजपकडून करण्यात आली आहे.