व्यापारयुद्धाच्या छायेतील नामी संधी

    20-Apr-2025
Total Views | 20
us china trade war


अमेरिकेने डोनाल्ड ट्रम्प यांच्या दुसर्‍या कार्यकाळामध्ये व्यापारयुद्धाचा शंखनाद केला. याचा त्रास जगातील अनेक देशांना सहन करावा लागणार अशी शक्याता निर्माण झाली असताना, ट्रम्प यांनी धोरणीपणे फक्त चीनला वगळत इतर देशांना मात्र 90 दिवसांची सूट दिली. यामुळे बायडन यांच्या काळात जगाच्या सत्ताकेंद्रापासून काहीसे दूर गेलेल्या अमेरिकेला, पुन्हा एकदा जगाच्या केंद्रस्थानी आणण्यात ट्रम्प यशस्वी ठरले. मात्र, यासाठी चीनला मोठी किंमत मोजावी लागत आहे. त्यामुळे चीनच्या व्यापारी महत्त्वाकांक्षेला लगाम लागत असताना, भारताला एक पुरवठा साखळीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावण्याची नामी संधी निर्माण झाली आहे.

अमेरिकेने जगातील अनेक देशांतील वस्तूंच्या आयातीवर कर लादून, व्यापारयुद्धाची सुरुवात केली. आज अमेरिकेच्या या निर्णयाचे वेगवेगळ्या प्रकारे विश्लेषण केले जात आहे. सध्या या व्यापार युद्धाचा निशाणा चीन आहे. या लेखामध्ये या व्यापार युद्धाचा चीनवर काय परिणाम होईल? याचे आपण विश्लेषण करू.

चीन भारताचा नंबर एकचा शत्रू आहे आणि येणार्‍या काळामध्ये, तो भारताला वेगवेगळ्या पद्धतीने त्रास देऊन भारताची आर्थिक प्रगतीत अडसर निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. अमेरिका-चीन आर्थिक युद्धात जर चिनी अर्थव्यवस्थेची हानी झाली, तर त्यांचा आर्थिक प्रगतीचा दर कमी होईल व येणार्‍या काळामध्ये, भारताला चिनी आव्हानांचा सामना करणे अधिक सोपे होईल. कारण, चीनची आर्थिक शक्ती वाढली की ते तेवढेच स्वत:ची लष्करी ताकद वाढवून शेजारी राष्ट्रांना त्रास देतात.




निर्यात किंमत नियंत्रणासाठी साम-दंड-भेदचा वापर


चीनने आपली निर्यात किंमत स्वस्त ठेवण्यासाठी, कृत्रिमरित्या आपल्या चलनाचे अवमूल्यन केले आहे. यामुळे इतर देश चिनी बनावटीच्या मालाशी स्पर्धा करूच शकत नाहीत. तसेच एखाद्या देशातील आयातशुल्क टाळण्यासाठी, प्रत्यक्ष निर्यातीपेक्षा कमी निर्यात केल्याचे चीन दाखवतो. तसेच, करचोरीसाठी नफा लपवून ‘अकाऊंटिंग फ्रॉड’ करण्याचे उद्योगही चीन सर्रास करतो.

भारतातील कर टाळण्याकरिता बांगलादेश, नेपाळमधून तस्करी करत भारतात प्रवेश करण्याचेही मार्ग चीनने अवलंबले आहेत. मालाच्या बनावटीची चिनी ओळख लपविण्यासाठी, दक्षिण आशियाई देशांमधून चिनी उत्पादने पाठवणे, स्थानिक उद्योग बंद पाडण्यासाठी स्वस्त वस्तू मोठ्या प्रमाणात डम्प करणे, मानसिक युद्धाचा वापर करून चिनी आयातीशिवाय पर्यायच नसल्याचा भ्रम भारतीय उद्योगजगताच्या मनात निर्माण करणे, स्वस्त आयातीमुळे भारतीय आयातदारांना चिनी माल खरेदी करण्यास भाग पाडणे, भारतीय उदारमतवादी कायद्याला आव्हान देण्यासाठी भारतीय स्वयंसेवी संस्थांचा वापर करणे, वेदांता या तांबे उत्पादन करणार्‍या तथाकथित प्रदूषणकारी उद्योगांना थांबवणे आणि त्यांची जागा चिनी आयातीने घेणे, हे चीनच्या व्यापारी नितीचे उत्तम उदाहरणच ठरेल. चिनी प्रभावाखालील असलेल्या भारतीय माध्यमांची चीन कायमच प्रशंसा करतो तर, भारताला चीनसोबत सहकार्य करण्याचा पोक्त सल्लाही चीन देतो, हे सारे त्याच्या व्यापारी कुटनीतीचे मार्ग आहेत.




चीन-अमेरिका : वाढती व्यापारी तूट

डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या व्यापार युद्धाचे एक कारण असे होते की, चीन आणि अमेरिकेमधील व्यापाराची तफावत फारच जास्त आहे. कारण, चीनला फक्त अमेरिकेची आणि जगाची बाजारपेठ पाहिजे. जगातील दोन मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये सध्या व्यापारयुद्ध असूनही, अमेरिका आणि चीनमधील व्यापार लक्षणीय आहे.

2024 मध्ये चीनसोबत असलेला अमेरिकेचा एकूण व्यापार 582.4 अब्जपर्यंत पोहोचला असून, चीनला होणारी निर्यात 143.5 अब्जपर्यंत घसरली, तर आयात 438.9 अब्जपर्यंत वाढली आहे. परिणामी, चीनसोबत अमेरिकेची व्यापारी तूट 295.4 अब्जपर्यंत वाढली आहे.


मात्र, आता चीनवरील आयात शुल्काचा परिणाम भयानक आहे. चिनी वस्तूंवरील अमेरिकेने लादलेले आयात शुल्क आता 145 टक्के आहे, ज्यामुळे कंपन्यांना शिपमेंट थांबवावी लागेल किंवा पुरवठा साखळी बदलावी लागेल. फुटवेअर निर्माता ‘हायलाईन युनायटेड’ने, 60 हजार आयात शुल्क देण्याऐवजी चीनला शूजचा एक कंटेनरच परत केला, जो सामान्य किमतीपेक्षा दहापट जास्त आहे.


जिनपिंग दबावापुढे झुकत नाही

अमेरिका आणि चीनमधील व्यापारयुद्ध तीव्र होत आहे. अमेरिकेने 245 टक्के कर लादल्यानंतर, चीनने 125 टक्के कर लादला आहे. अमेरिकेने लादलेल्या कोणत्याही अतिरिक्त शुल्काला आता ते प्रतिसाद देणार नाही. अमेरिकेने लादलेले असामान्य शुल्क, आंतरराष्ट्रीय आणि आर्थिक व्यापार नियमांचे गंभीर उल्लंघन करते, असे चीनने म्हटले आहे. मात्र ‘वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन’ ही चीनने विकत घेतलेली युनायटेड नेशन्सची संस्था आहे, जी चिनी प्रभावाखाली आहे आणि जगाचे नुकसान करत आहे.

चीनवर 245 टक्के कर लादण्याचा अर्थ असा आहे की, चीनमध्ये बनवलेले 100 डॉलर्सचे उत्पादन, आता अमेरिकेत पोहोचल्यावर 245 डॉलर्सचे होईल. अमेरिका चीनकडून, 440 अब्ज डॉलर्सची आयात करते. अमेरिकेत चिनी वस्तू महाग झाल्यामुळे, त्यांची विक्री कमी होईल. मात्र, आता चीन वगळता सर्व देशांवर 90 दिवसांसाठी अमेरिकेकडून दहा टक्के बेसिक आयात शुल्क लादण्यात आले आहे.

अमेरिकेच्या या निर्णयामुळे चीनमधून उत्पादने आयात करणार्‍या अमेरिकेच्या कंपन्यांसाठी चीनला पर्याय शोधणे एक मोठे आव्हान झाले आहे, हीच भारताकरिता संधी आहे.


अमेरिकेला आतून पोकळ करणारे फेंटानिल

चीनने अमेरिकेविरुद्ध चालवलेले ‘ड्रग्ज-नार्को टेरेरिझम’सुद्धा, व्यापारयुद्धाचे एक कारण आहे. फेंटानिल ड्रग हेरॉईनपेक्षा 50 पट जास्त आणि मॉर्फिनपेक्षा 100 पट जास्त शक्तिशाली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणतात की, “हे ड्रग चीनमध्ये तयार केले जाते आणि तेथून ते, मेक्सिको आणि कॅनडामार्गे अमेरिकेत पाठवले जाते.”2024 साली फेंटानिलच्या अतिसेवनामुळे, 70 हजारांहून अधिक अमेरिकन लोकांचा मृत्यू झाला. हे ड्रग अमेरिकेला आतून पोकळ करत असून, हे चीनचेच षड्यंत्र आहे.



व्यापारयुद्धाची वेळ चीनकरिता अत्यंत गैरसोयीची

व्यापारयुद्धाची वेळ चीनकरिता अत्यंत गैरसोयीची आहे. कारण, सध्या चीनची अर्थव्यवस्था पाच टक्क्यांनीसुद्धा वाढत नाही. त्याची खरी वाढ ही अडीच ते तीन टक्के इतकी कमी असावी.

चीन सरकारचे कर्जही खूप वाढलेले आहे. बाहेरचे जग, आयात शुल्क वाढल्यामुळे चिनी वस्तू घ्यायला तयार नाही. मात्र, चीनने जागतिक बाजारपेठांमध्ये आणि जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये प्रचंड घुसखोरी करून, एक चक्रव्यूहासारखी परिस्थिती निर्माण केली आहे. म्हणजेच चीनने वेगवेगळ्या देशात जिथे स्वस्त कच्च्या मालाचा पुरवठा स्वस्तात होऊ शकतो, अशा जागा किंवा खाणींवर ताबा मिळवला आहे. जगात 50 ते 55 टक्के वस्तू निर्माण करणे, हे चीनमध्ये होत आहे. चीनने आपली वस्तू उत्पादन क्षमता एवढी वाढवली आहे की, कुठलाही देश त्यांच्याशी वस्तू उत्पादित क्षेत्रामध्ये शर्यत करू शकत नाही. कारण एवढ्या कमी किमतीमध्ये उत्पादन निर्माण करणे, कुठल्याही देशाला अशक्य आहे.

मात्र आता चीनमध्ये मंदी येण्याची शक्यता निर्माण झालेली असून, चीनचे ‘रिअल इस्टेट सेक्टर’ हे मंदीकडे वाटचाल करत आहे.
चीनमधील 60 ते 65 टक्के घरे ही मॉरगेज या पद्धतीमध्ये गेली आहे. यामुळे घराच्या किमती गेल्या 20 महिन्यांपासून, कमी होत असल्याने, घरामध्ये गुंतवणूक केलेल्यांचे मोठेच नुकसान झालेले आहे. यामुळे सामान्य चिनी माणसाची खर्च करून, चिनी अर्थव्यवस्थेला मदत करण्याची क्षमता अत्यंत कमी झालेली आहे. कॉर्पोरेट वर्ल्ड किंवा व्यापार क्षेत्रामध्ये, कर्जबाजारी ही 123 ते 172 टक्के एवढी झाली आहे.

चिनी अर्थव्यवस्था, आता त्यांनीच घेतलेल्या कर्जाच्या सापळ्यामध्ये अडकत चालली आहे. या कर्जसापळ्यातून चीनच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढणे, चीनी नागरिकांना शक्य आहे ना चीनच्या व्यापार जगताला.

दरम्यान, चीनमध्ये वर्षानुवर्षे औद्योगिक गुंतवणुकीमुळे, उत्पादनाची मोठ्या प्रमाणात क्षमता निर्माण झाली. विशेषतः इलेक्ट्रिक वाहने, सौर पॅनेल, स्टील आणि सेमीकंडक्टर यांसारख्या क्षेत्रात चीनची शक्ती वाढली आहे. आता उत्पादन केवळ देशांतर्गत गरजांपेक्षाच नव्हे, तर जागतिक मागणीपेक्षाही जास्त आहे. चीनमधील कारखाने सुरु आहेत कारण, ते बंद केल्याने टाळेबंदी आणि सामाजिक समस्या निर्माण होतील.



युद्धामुळे चीनचे प्रचंड नुकसान होणार

चीनकडे सुमारे 600 अब्ज पौंड (सुमारे 760 अब्ज) अमेरिकन सरकारी रोखे आहेत. याचा अर्थ असा की, चीनकडे अमेरिकन अर्थव्यवस्थेवर प्रभाव पाडण्याची मोठी शक्ती आहे. चीन-अमेरिका व्यापार युद्ध दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. या युद्धामध्ये कोण जिंकेल, हे सांगणे सोपे नाही. चीनची आर्थिक क्षमता प्रचंड आहे. मात्र, एवढे नक्की की, अमेरिकेशी सुरू केलेल्या युद्धामुळे चीनचे प्रचंड नुकसान होणार आहे आणि ही भारताकरिता मोठी संधी आहे. चीन निर्यात करीत असलेल्या वस्तूंचा पुरवठा, आपण जर चीनपेक्षा कमी किमतीत जगाला केल्यास, आपण जगामध्ये एक उत्पादन करणारा देश म्हणून महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे, भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेगही वाढू शकतो. असे झाल्यास येणार्‍या नजिकच्या भविष्यामध्ये आपण आर्थिकदृष्ट्या चीनची बरोबरी करू शकतो किंवा त्यांच्या पुढेसुद्ध जाऊ शकतो. त्यामुळे या आलेल्या संधीचा आपण पुरेपूर वापर करायला पाहिजे.

(नि.) ब्रि. हेमंत महाजन
अग्रलेख
जरुर वाचा
रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

रशिया केंद्रित तटस्थता आणि स्वनेतृत्वाखालील महासत्ता

पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवादाच्या मुद्द्यावर जग भारताच्या बाजूने आहे, असा आभास निर्माण झाला. परंतु, ‘ऑपरेशन सिंदूर’ला सुरुवात झाल्यावर जेव्हा युद्धाचा प्रसंग आला, तेव्हा भारत-पाकिस्तानला एकाच तराजूतून मोजणारी परिस्थिती फारशी बदललेली नाही, असे आपल्या लक्षात आले. भारताच्या दृष्टीने हा पहिलाच अनुभव नव्हता. परंतु, गेल्या काही वर्षांत भारताचा आंतरराष्ट्रीय प्रभाव वाढत आहे, असे आपण समजत होतो. तो आपला भ्रम होता व भारत आहे त्या स्थितीवरच पुन्हा परतला आहे, असे एखाद्याला वाटू शकते. परंतु ही वस्तुस्थ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121