मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीसाठी एक अभिमानाची बातमी आहे. फ्रान्समधील जगप्रसिद्ध कान्स आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने 'स्थळ', 'स्नो फ्लॉवर' आणि 'खालिद का शिवाजी' हे तीन चित्रपट अधिकृत निवडीस पात्र ठरले आहेत, तर 'जुनं फर्निचर' या चित्रपटाची खास निवड करण्यात आली आहे. या उल्लेखनीय घोषणेची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी दादर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
यंदाचा कान्स चित्रपट महोत्सव १४ ते २२ मे या कालावधीत रंगणार असून, मराठी चित्रपटांचा हा जागतिक मंचावरील सन्मान नक्कीच कौतुकास्पद आहे. 2016 पासून महामंडळाच्या पुढाकारातून मराठी चित्रपट कान्स महोत्सवातील फिल्म मार्केटमध्ये सातत्याने सादर केले जात आहेत. यंदाच्या निवडीसाठी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक आदित्य सरपोतदार, निखिल महाजन, समीक्षक गणेश मतकरी, लेखिका इरावती कर्णिक आणि अपूर्वा शालिग्राम यांच्या परीक्षण समितीने चित्रपटांची काटेकोर निवड केली.
'स्थळ' ग्रामीण भागातील पारंपरिक लग्नसंस्थेवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट, पितृसत्ताक मानसिकता, रंगभेद आणि सामाजिक रूढींवर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. नंदिनी चिकटे मुख्य भूमिकेत असून, जयंत सोमलकर दिग्दर्शक आहेत. सचिन पिळगांवकर या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत.
'स्नो फ्लॉवर' रशियन सायबेरिया आणि कोकणच्या पार्श्वभूमीवर घडणारी ही कथा दोन वेगळ्या संस्कृतींचा अद्वितीय संगम साकारते. गजेंद्र अहिरे यांच्या दिग्दर्शनात तयार झालेल्या या चित्रपटात विठ्ठल अहिरे, छाया कदम, वैभव मांगले आणि सरफराज आलम सफू यांची महत्त्वाची भूमिका आहे.
'खालिद का शिवाजी' एका मुस्लिम मुलाच्या नजरेतून छत्रपती शिवाजी महाराजांचा शोध घेत असलेली ही कथा, समतेचा संदेश देत आजच्या सामाजिक वास्तवावर भाष्य करते. दिग्दर्शक राज मोरे यांनी ही कथा प्रेक्षकांसमोर आणली आहे.
'जुनं फर्निचर' महेश मांजरेकर यांच्या दिग्दर्शनातील हा चित्रपट वृद्धांच्या एकाकी जीवनावर भाष्य करतो. वृद्धापकाळात त्यांच्या मुलांकडून होणारी उपेक्षा, भावनिक संघर्ष या विषयावर ही भावस्पर्शी मांडणी आहे. महेश मांजरेकर, भूषण प्रधान, मेधा मांजरेकर, समीर धर्माधिकारी, गिरीश ओक, अनुषा दांडेकर, विजय निकम, शरद पोंक्षे यांचा प्रभावी अभिनय या चित्रपटाला अधिक गहिरं करतं.
या निवडीमुळे मराठी सिनेमा अधिक व्यापक पातळीवर पोहोचण्याची संधी मिळणार असून, आंतरराष्ट्रीय चित्रपटप्रेमींच्या मनात मराठी सिनेमा घर करणार, याबद्दल शंका नाही!
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.