आजच्या घडीला काँग्रेसने संविधानाचा आणि त्याच्याशी सर्व भारतीयांच्या जोडलेल्या भावनांचे जे राजकारण केले आहे, ते चिंताजनकच नव्हे तर, अपमानकारकदेखील ठरते. कारण, काँग्रेसकडे संविधानाचे रक्षणकर्ते असल्याचे दाखवण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न विचारायलाच हवा.
काँग्रेस पक्षाने दि. 25 एप्रिल रोजीपासून ‘संविधान वाचवा’ ही देशव्यापी मोहीम जाहीर केली आहे. या मोहिमेच्या वेळेचा विचार केल्यास, अनेक प्रश्न उपस्थित होतात. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांच्याविरोधात ‘ईडी’ने चार्जशीट दाखल झाल्यानंतर ही मोहीम जाहीर झाल्याने, तिच्या नैतिक आधारावरच संशय निर्माण होतो. आजच्या घडीला काँग्रेसने संविधानाचा आणि त्याच्याशी सर्व भारतीयांच्या जोडलेल्या भावनांचे जे राजकारण केले आहे, ते चिंताजनकच नव्हे तर, अपमानकारकदेखील ठरते. कारण, काँग्रेसकडे संविधानाचे रक्षणकर्ते असल्याचे दाखवण्याचा नैतिक अधिकार आहे का? हा प्रश्न विचारायलाच हवा.
इतिहासात डोकावले तर आणीबाणी, ‘अनुच्छेद 356’चा गैरवापर, तत्कालीन संस्थांच्या स्वायत्ततेवर झालेले आघात ही सर्व उदाहरणे आहेतच. तेव्हा ‘संविधान’ म्हणजे सत्ता रक्षणाचे साधन होते. मात्र, आज विरोधात असताना त्याच संविधानाचा आधार घेऊन स्वतःला पीडित म्हणून सादर करणे ही राजकीय सोय झाली आहे. या पार्श्वभूमीवर आणखी एक मुद्दा गंभीरतेने विचारात घ्यायला हवा. पश्चिम बंगालसारख्या राज्यात जेव्हा विशिष्ट समाजावर वारंवार अन्याय होतो, तेव्हा काँग्रेसला भूमिका घ्यावीशी वाटत नाही. हिंदूंवरील अन्यायाविरोधात काँग्रेस आंदोलन करत नाही, तेव्हा कुठे जाते संविधान प्रेम? याशिवाय, तपास यंत्रणांवरील अविश्वासाचा सूर हे काँग्रेसचे आणखी एक धोरणात्मक शस्त्रच झाले आहे. जेव्हा काँग्रेस पक्षावर कायदेशीर चौकशीची शक्यता निर्माण होते, तेव्हा ती ‘सूडाची कारवाई’ ठरवली जाते. पण, याच संस्था जेव्हा काँग्रेसच्या सत्ताकाळात कार्यरत होत्या, तेव्हा त्या योग्य वाटत होत्या. यापेक्षा दांभिकपणाचे दुसरे उदाहरण नसावे. ‘संविधान वाचवा’ ही घोषणा जर खर्या अर्थाने प्रामाणिक असती, तर काँग्रेसने प्रथम आपल्या इतिहासातील चुकांना प्रामाणिकपणे स्वीकारलेही असते. पण, सध्याच्या मोहिमेचा प्रवास पाहता, ही मोहीम गांधी कुटुंबाच्या प्रतिमारक्षणाचे राजकीय कवच वाटते. भारतीय जनतेने आजवर अनेक मोहिमा पाहिल्या, घोषणांचा अनुभव घेतला आणि नाट्यमय राजकारणापलीकडचा हेतू समजून घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला ‘संविधान वाचवा’ म्हणण्याचा अधिकार तेव्हाच लाभेल, जेव्हा ती संविधानाच्या नावाखाली ‘कुटुंब वाचवा’ ही भूमिका सोडेल.
राष्ट्रप्रथम
भाजपने ‘वक्फ सुधारणा विधेयका’संदर्भात जनजागृती मोहीम सुरू करण्याची घोषणा केली. या मोहिमेचा मुख्य उद्देश मुस्लीम समाजाला ‘वक्फ कायद्या’च्या सुधारणांबद्दल योग्य माहिती देण्याबरोबरच, विरोधकांच्या खोट्या आरोपांबाबत खुलासा करणे हा आहे. भाजप या मोहिमेद्वारे देशातील नागरिकांशी जबाबदारपणे संवाद साधणार आहे. ‘वक्फ सुधारणा विधेयका’चे वास्तविक उद्दिष्ट काय आहे आणि त्यावर विरोधकांनी केलेले आरोप किती भ्रामक आणि दिशाभूल करणारे आहेत, यावर सुस्पष्ट चर्चा आवश्यक आहे. ‘वक्फ सुधारणा विधेयक’ हे ‘वक्फ बोर्डां’मध्ये सुधारणा करण्यासाठी आणले गेले आहे. या सुधारणांचा मुख्य उद्देश ‘वक्फ’ संस्थांच्या पारदर्शकतेला प्रोत्साहन देणे, त्यांच्यातील भ्रष्टाचार रोखणे आणि मनमानी कारभाराला आवर घालणे हा आहे.
तथापि, काँग्रेस आणि इतर विरोधकांच्या दृष्टिकोनातून या सुधारणांना धर्मनिरपेक्षता तत्त्व विरोधी म्हणून रंगवले जात आहे. अनेक राजकीय पक्षांनी जनतेमध्ये भ्रम पसरवण्याचे, विविध समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याचे आणि खोट्या आरोपांच्या आधारे लोकभावना भडकवण्याचे काम केले आहे. यांनी आजवर मुस्लीम समाजाच्या हितासाठी काही केलेले नाही. याशिवाय, विरोधकांनी या विधेयकावर जे आरोप केले आहेत, ते काही प्रमाणात अशा परिस्थितीला जन्म देतात, ज्यामध्ये लोकांमध्ये वाद आणि संघर्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प. बंगालमधील हिंसाचार याचे जिवंत उदाहरण आहे. मुस्लीम समुदायाच्या हितासाठी बदल आणण्याचे भाजपचे ध्येय स्पष्ट आहे. यामध्ये तिहेरी तलाक असो अथवा मुस्लीम समाजासाठीच्या शिष्यवृत्ती योजना असो. आज आंतरराष्ट्रीय परिस्थितीकडे पाहिल्यास भारतासाठी असंख्य संधीची दारे उघडली आहेत. अनेक, उद्योजक गुंतवणुकीसाठी भारत हा आदर्श पर्याय म्हणून बघत आहेत. यासाठी भारतात सक्षम सरकारबरोबर शांतता राखणेदेखील काळाची गरज आहे. त्यादृष्टीने विचार केल्यास, भाजपची जनजागृती मोहीम ही शांततेत वृद्धी करण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न आहे. गेले एक दशक मोदी सरकारने ‘सबका साथ, सबका विकास’ आणि ‘सबका विश्वास’ या सूत्रावर काम केले आहे. त्याचाच आधार असलेली भाजपची जनसंवादाची भाजपच्या राष्ट्रप्रथम या भूमिकेचे मूर्तिमंत उदाहरण ठरेल.
कौस्तुभ वीरकर