दुर्मीळ वाघाटीच्या सात पिल्लांचा आठवड्याभरात मृत्यू; बोरिवली नॅशनल पार्कच्या प्रजनन केंद्रातील गंभीर घटना
02-Apr-2025
Total Views | 223
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील 'वाघाटी प्रजनन केंद्रा'तील सात वाघाटींचा मृत्यू झाला आहे (rusty spotted cat kittens died). यामधील सहा पिल्लांचा मृत्यू हा संसर्गजन्य आजारामुळे झाला आहे (rusty spotted cat kittens died). २०१३ पासून राष्ट्रीय उद्यानात सुरू असणाऱ्या या दुर्मीळ मांजराच्या प्रजनन प्रकल्पात एकाही वाघाटीचे प्रजनन झाले नसले तरी, उपचारपद्धतींमधील अनियोजनामुळे प्रकल्पातील अनेक वाघाटींना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे का, याविषयी चौकशी होणे गरजेचे आहे.(rusty spotted cat kittens died)
मार्जार कुळात समावेश असणार्या वाघाटीला जंगलातील सर्वात लहान आकाराचे मांजर म्हणून ओळखले जाते. या प्रजातीच्या वाढीकरिता २०१३ पासून ‘नॅशनल पार्क प्रशासना’ने विशेष प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पांतर्गत वाघाटीचा पिंजराबंद प्रजननाचा प्रयत्न केला जात आहे. अशा पद्धतीचा देशातील हा पहिलाच आणि जगातील दुसरा प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी सुसज्ज असे पिंजरे तयार करण्यात आले आहेत. मात्र, गेल्या १२ वर्षांत या प्रकल्पात एकदाही वाघाटीचे यशस्वी प्रजनन झालेले नाही. उलटपक्षी राज्यातील विविध भागांतून या प्रकल्पासाठी पाठविण्यात आलेली वाघाटीची पिल्ले मृत्युमुखी पडली आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीस कोल्हापूरमध्ये सापडलेली वाघाटीची तीन पिल्ले राष्ट्रीय उद्यानातील या प्रजनन केंद्रात पाठविण्यात आली होती. आईसोबत पुनर्भेट अयशस्वी झाल्याने त्यांना या केंद्रात धाडण्यात आले होते. ही तीन पिल्ले मिळून केंद्रातील वाघाटीची संख्या ११ होती. त्यामधील दोन प्रौढ वाघाटी होत्या. मात्र, फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या ११ वाघाटीमधील सात वाघाटींचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्या सात वाघाटी या पिल्लू अवस्थेमधील होत्या.
राष्ट्रीय उद्यानातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यामधील सहा पिल्लांचा मृत्यू हा आठवड्याभरातच संसर्गजन्य आजारामुळे झाला, तर एका पिल्लाचा मृत्यू उंचावरून पडल्यामुळे झाला. सलग झालेल्या वाघाटीच्या मृत्युंमुळे उद्यानातील वन्यप्राणी उपचारांवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात वाघाटींचे लसीकरण आणि त्यांची शारीरिक तपासणी नियमितपणे होते का, याविषयी चौकशी करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने पशुवैद्यकीय अधिकारिपदासाठी जानेवारी महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, या जाहिराताला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. सध्या कार्यरत असलेले पशुवैद्यकीय अधिकारी हे पशुसंवर्धन विभागातून वर्षभराच्या प्रतिनियुक्तीवर याठिकाणी काम करत आहेत. ‘राज्य वन्यजीव मंडळा’ने 2019 साली दिलेल्या सूचनेनुसार राष्ट्रीय उद्यानाचा स्वतःचा स्वतंत्र निवासी पशुवैद्यकीय अधिकारी असणे आवश्यक आहे. यासंदर्भातील निर्णय ‘राज्य वन्यजीव मंडळा’ने तत्कालीन आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली घेतला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाकडे दुर्लक्ष करून अजूनही प्रतिनियुक्तीवरच पशुवैद्यकीय अधिकार्याच्या नेमणुकीचा खेळ वनविभाग संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाबत खेळत आहे. त्यामुळे या पदाची भरती मार्गी लावून राष्ट्रीय उद्यानामध्ये पूर्ण वेळ निवासी पशुवैद्यकीय अधिकारी नेमणे या प्राण्यांच्या आकस्मिक मृत्युमुळे गरजेचे झाले आहे.