मुंबई : ( no retirement rule after the age of 75 in BJP Chandrashekhar Bawankule ) “भाजपमध्ये ७५ वर्षे वयानंतर निवृत्तीचा कोणताही नियम नाही किंवा असा कुठलाही निर्णय झालेला नाही. भाजपच्या कोणत्याही अधिकृत धोरणातही असे म्हटलेले नाही. उबाठाचे नेते संजय राऊत यांचे विधान ही केवळ राजकीय स्टंटबाजी आहे,” असा हल्लाबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, दि. १ एप्रिल रोजी केले.
बावनकुळे म्हणाले की, “भारतीय लोकशाहीत पंतप्रधानांनी कधी निवृत्त व्हायचे, हे संजय राऊत यांच्यासारख्या सकाळच्या भोंग्यावर ठरत नाही, तर निवडणुकीतील जनादेशावर आणि लोकांच्या आशीर्वादावर ठरते. पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचा कार्यकाळ या देशातील जनता ठरवते, संजय राऊत किंवा विरोधकांना तो अधिकार नाही. २०४७ पर्यंत विकसित भारत करण्याचा संकल्प पंतप्रधान मोदींनी केला आहे.
हा संकल्प त्यांच्याच नेतृत्वात पूर्ण केला जाईल.” “भारतीय संविधानातही असा कोणताही ठराव किंवा नियम नाही. भाजपचे नेते अटलबिहारी वाजपेयी वयाच्या 79 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते, तर मोरारजी देसाई (83 वर्षे) आणि डॉ. मनमोहन सिंग तर वयाच्या 81 वर्षांपर्यंत पंतप्रधान होते. पण मानसिक संतुलन बिघडल्याने भाजपद्वेषाची कावीळ झालेल्या राऊतांना हे आठवणार नाही,” असा टोला बावनकुळे यांनी लगावला.