‘ऑपरेशन ब्रह्म’च्या निमित्ताने...

    02-Apr-2025   
Total Views | 9

india launches operation brahma to provide humanitarian aid and assistance to quake hit myanmar
 
म्यानमारमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाने केवळ बँकॉकच नव्हे, तर संपूर्ण जग हादरले असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण, भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर झालेली नासधूस ही मनाला चटका लावून जाणारी होती. इमारती कोसळल्या, रस्ते उद्ध्वस्त झाले, हजारो लोक मृत्यू पावले. ज्या भारताकडे एकेकाळी जग दुर्लक्ष करत होते, तोच भारत आज म्यानमारच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. भारताने म्यानमारच्या मदतीसाठी ‘ऑपरेशन ब्रह्म’ सुरू केले आहे. ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत भारतीय लष्कराची एकूण पाच विमाने तैनात करण्यात आली आहेत. हवाई दलच नव्हे, तर नौदलाची जहाजेही मदत साहित्य घेऊन रवाना झाल्याची माहिती आहे. भारताने आतापर्यंत विमाने, जहाजांद्वारे एकूण १३७ टन मदत म्यानमारला पाठवली आहे.
 
वास्तविक एखाद्या देशात कुठली आपत्ती आली की, अशा संकटप्रसंगी भारत देश त्यास मदत करण्याकरिता कायम अग्रेसर असतो. २०१५ साली जेव्हा नेपाळमध्ये भूकंप आला होता, तेव्हा ‘ऑपरेशन राहत’ अंतर्गत भारताने नेपाळला मदत केली होती. २०१० सालामधील हैती भूकंपावेळी भारताने ‘ऑपरेशन मैत्री’ चालवले होते. अलीकडेच २०२३ साली तुर्कीये-सीरियात आलेल्या भूकंपादरम्यान ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत भारताने मोठी मदत केली होती. त्याचप्रमाणे, म्यानमारमधील भूकंपग्रस्तांना मदतीसाठी ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत मदत सुरू आहे.
 
म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपात आतापर्यंत २ हजार, ७१९ लोकं दगावली. ७.७ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपानंतर ४ हजार, ५२१ लोकं जखमी झाले, तर ४४१ अद्याप बेपत्ता आहेत. मांडले आणि नेपीता याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. भारताप्रमाणेच इतर देशांकडून मदत पाठवण्यात आली असली, तरी शहरांतील विमानतळांचे भूकंपामुळे नुकसान झाले असल्याने विमाने उतरवण्यात अडथळे येत आहेत. असे असले, तरी मदतकार्य थांबलेले नाही, कुठल्या ना कुठल्या मार्गे मदत पोहोचतच आहे.
 
‘ऑपरेशन ब्रह्म’ असे नाव का? तर ब्रह्मदेव ही सृष्टीची देवता आहे. ते सृष्टीचे निर्माता आहेत. एका भूकंपामुळे म्यानमारची झालेली अवस्था सुधारण्यासाठी, म्हणजेच पुन्हा सर्व गोष्टी पूर्ववत करण्यासाठी मदतीचा हात पुढे करणे, हे ईश्वरीय कार्यच आहे. म्हणून यास ‘ऑपरेशन ब्रह्म’ नाव देण्यात आले असावे. आपत्तीजनक घटनेनंतर दुःख कमी करणे आणि पुनर्प्राप्तीच्या प्रयत्नांना पाठिंबा देणे, हे एकंदर या कार्याचे उद्दिष्ट आहे. हे नाव तत्काळ मदत पुरवण्यासाठी आणि बाधित प्रदेशांमध्ये दीर्घकालीन पुनर्प्राप्ती आणि पुनर्बांधणीला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्राची वचनबद्धता दर्शवते. तसेच, हे कार्य भारताच्या ‘नेबरहुड फर्स्ट धोरणा’बाबतची वचनबद्धता अधोरेखित करते. त्याचबरोबर ‘वसुधैव कुटुम्बकम्’ ही भारतीय नीतिमत्ता प्रतिबिंबित करते.
 
‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत, १५ टन मदत सामग्री घेऊन एक विमान नुकतेच यांगूनला पोहोचले. तेव्हा म्यानमारमधील भारतीय राजदूत मदत सामग्री घेण्यासाठी उपस्थित होते, त्यानंतर हे विमान म्यानमारला रवाना झाले. भारताने ‘ऑपरेशन ब्रह्म’मध्ये हवाई दलाच्या दोन ‘सी-१७ ग्लोबमास्टर’ आणि तीन ‘सी-१३०जे हरक्यूलिस’ तैनात केले आहेत. इतकेच नव्हे, तर भारताने ११८ सदस्यांची एक टीमदेखील पाठवली आहे, जी म्यानमारमध्ये ६० खाटांचे तात्पुरते रुग्णालय स्थापन करेल. ‘ऑपरेशन ब्रह्म’ अंतर्गत, फेडरल डिझास्टर आकस्मिक दलाचे कर्मचारी शेजारील देशाला मदत करण्यासाठी प्रबलित काँक्रीट कटर, ड्रिल मशीन, हॅमर, प्लाझ्मा कटिंग मशीन इत्यादी भूकंप बचाव उपकरणांसह तैनात केले जात आहेत.
 
भारताकडून अशा प्रकारे होणार्‍या मदत कार्यामधून इतर राष्ट्रांविषयी असलेला भारताचा आपलेपणा यातून दिसून येतो. ही शिकवण भारताने आपल्या पूर्वजांकडून घेतली असावी यात शंका नाही. कारण, आपल्या पूर्वजांनी अध्यात्माच्या आधारावर भौतिक जीवन सुखकर करणारा शाश्वत सनातन धर्म आत्मसात केला. त्यातील आपलेपणा हाच विश्वाचा आधार आहे. त्याच मार्गावर आजचा भारत चालतो आहे. जगाच्या विकासासाठी हिंदू एकता महत्त्वाची आहे. कारण, ती लोककल्याणासाठी आहे. फक्त भारतानेच नव्हे, तर भारताबरोबर इतर देशांनीसुद्धा आपल्या मित्रराष्ट्रावर असे संकट आल्यास त्याच्या पाठीशी उभे राहून, त्याला योग्य ती मदत करणे महत्त्वाचे आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121