हास्याचा कल्लोळ उडवणारा दिग्गज अभिनेते अशोक सराफ यांचा "अशी ही जमवा जमवी" चा मजेदार ट्रेलर पाहिलात का?

    02-Apr-2025   
Total Views | 14

have you seen the hilarious trailer of ashi hi jamwa jamvi that will make you laugh out loud

मुंबई : प्रेमाला आणि मैत्रीला वयाची मर्यादा नसते. सहवासाची इच्छा सार्वत्रिक आहे आणि तिचा शोध जीवनाच्या कोणत्याही विशिष्ट टप्प्यापुरता मर्यादित नाही. अशीच एका नव्या प्रेमाची नवी परिभाषा आपल्याला मोठ्या पद्यावर अनुभवायला मिळणार आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि लोकेश गुप्ते दिग्दर्शित बहुप्रतिक्षित असा "अशी ही जमवा जमवी" या सिनेमाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आलाय. ह्या धमाल सिनेमात अनेक वर्षांनी दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांची जोडी रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहे.

ट्रेलर मध्ये अशोक सराफ आणि वंदना गुप्ते ह्या दोघांची कमाल जुगलबंदी पहायला मिळते. सिनेमातील कथा जरा हटके आहे त्यामुळे सिनेमाचा उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर खास ठरतोय. ट्रेलर पाहून अंदाज येतो कि मनोरंजना बरोबरच हा एक कौटुंबिक चित्रपट सुद्धा आहे. नातेसंबंध कसे जुळतात आणि त्यांचा प्रवास कसा फुलत जातो, हे अतिशय रंजकतेने दाखवण्याचा प्रयत्न या सिनेमामध्ये केला गेलाय.

थोडी खट्याळ, थोडी गोंडस, थोडी हळवी अशी चित्रपटाची कथा आहे. अशोक सराफ आणि वंदना गुप्ते या दिग्गज कलाकारांसोबत सिनेमात ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, मिलिंद फाटक, सुलेखा तळवलकर, पुष्कराज चिरपुटकर अशा लोकप्रिय कलाकारांची फौज आहे. वेगवेगळ्या वयोगटाची ही कथा आहे. त्यामुळे त्यांच्या नात्यातील निरागसता, संभ्रम, घालमेल, विश्वास अशा अनेक भावना यात पाहायला मिळतील.

कथा नक्की काय आहे आणि ती कोणत्या वळणावर जाणार? अशोक सराफ आणि वंदना गुप्ते पकडले जातील का? जमवा जमवी कशा प्रकारे होणार आहे हे पाहणं औस्त्युक्याचं ठरणार आहे. भारतीय सिनेसृष्टीत मोलाचे योगदान देणारे चित्रपती व्ही. शंताराम यांचे नातू आणि किरण व्ही. शांताराम यांचे चिरंजीव, राहुल शांताराम यांनी मनोरंजन विश्वात सिनेप्रेमींसाठी काहीतरी नवीन घेऊन येण्याचे उद्दिष्ट ठेवत ‘राजकमल एंटरटेनमेंट’ ही नवीन कंपनी सुरू केलेली आहे. सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते ह्यांनी केलं आहे. "अशी ही जमवा जमवी" हा सिनेमा १० एप्रिल २०२५ रोजी आपल्या जवळच्या सिनेमागृहात भेटीला येणार आहे !




अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121