लॉस एंजेलिस : हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते वॅल किल्मर यांचे वयाच्या ६५व्या वर्षी निधन झाले. 'टॉप गन' आणि 'बॅटमॅन फॉरएव्हर' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारणारे किल्मर लॉस एंजेलिसमध्ये मंगळवारी न्यूमोनियामुळे निधन पावले, अशी माहिती त्यांच्या मुलीने, मर्सिडीज किल्मरने दिली. २०१४ मध्ये त्यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते, मात्र त्यानंतर ते बरे झाले होते. परंतु, ट्रॅकिओटोमी शस्त्रक्रियेमुळे त्यांचा आवाज पूर्णपणे बदलला आणि त्यांचा अभिनय प्रवासही मर्यादित झाला. तरीही, २०२२ मध्ये आलेल्या 'टॉप गन: मॅव्हरिक' या चित्रपटात त्यांनी पुन्हा एकदा 'आइसमॅन' ही भूमिका साकारली होती.
अभिनेते व दिग्दर्शकांकडून श्रद्धांजली
'हीट' चित्रपटाचे दिग्दर्शक मायकेल मॅन यांनी श्रद्धांजली वाहताना म्हटले, ''हीट चित्रपटात वॅलसोबत काम करताना त्याच्या अभिनयातील अष्टपैलुत्व पाहून मी नेहमीच अचंबित व्हायचो. इतक्या वर्षांपासून त्याने आजाराशी लढा दिला, हे खूप दुःखद आहे.''
अभिनेता जोश गॅड यांनी पोस्ट करत म्हटले, ''आर.आय.पी. वॅल किल्मर. माझ्या लहानपणीच्या अनेक आठवणी तुझ्या चित्रपटांनी तयार केल्या. तू खरंच एक आयकॉन होतास.''
अभिनेता जोश ब्रोलिन यांनी देखील भावनिक पोस्टमध्ये लिहिले, ''तू हुशार, आव्हानात्मक, धाडसी आणि सर्जनशील होता. अशा लोकांची संख्या आता फारच कमी आहे.''
वॅल किल्मर: अभिनयाचा प्रवास
३१ डिसेंबर १९५९ रोजी जन्मलेले वॅल एडवर्ड किल्मर हे लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राकडे आकर्षित होते. न्यूयॉर्कच्या ज्युलियार्ड स्कूलमध्ये प्रवेश घेणारे ते सर्वात कमी वयाचे विद्यार्थी होते. त्यांचा अभिनय कारकीर्दीचा प्रारंभ 'टॉप सीक्रेट' (१९८४) आणि 'रिअल जीनियस' (१९८५) या विनोदी चित्रपटांमधून झाला. त्यानंतर १९८६ मध्ये 'टॉप गन' या सुपरहिट चित्रपटात त्यांनी 'आइसमॅन' ही भूमिका साकारली आणि जगभर प्रसिद्ध झाले. 'द डोअर्स' (१९९१) या चित्रपटात त्यांनी प्रसिद्ध गायक जिम मॉरिसन यांची भूमिका साकारली. 'टूम्बस्टोन' आणि 'हीट' हे चित्रपटही गाजले. १९९५ मध्ये 'बॅटमॅन फॉरएव्हर' चित्रपटात त्यांनी बॅटमॅनची भूमिका केली, मात्र पुढील चित्रपटातून त्यांनी माघार घेतली.
किल्मर हे केवळ अभिनेता नव्हे, तर कलाकार आणि चित्रकारही होते. त्यांनी अनेक चित्रपटांवर आधारित चित्रकला साकारली. २०२१ मध्ये ‘वाल’ हा डॉक्युमेंटरी चित्रपट प्रदर्शित झाला, ज्यात त्यांच्या जीवनातील चढ-उतार दर्शवण्यात आले होते.
'टॉप गन: मॅव्हरिक'मध्ये टॉम क्रूझसोबत शेवटचा अभिनय केला. क्रूझ म्हणाले होते, "वॅल हा एक जबरदस्त अभिनेता होता. त्याने पुन्हा 'आइसमॅन'ची भूमिका स्वीकारली, आणि तो लगेचच त्यात रमून गेला.''
वॅल किल्मर यांच्या निधनाने हॉलिवूडने एक अष्टपैलू अभिनेता गमावला आहे.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.