यापूर्वीच्या लेखांतून भारतातील खगोलशास्त्र, गणितशास्त्र आणि एकूणच वैज्ञानिक प्रगतीचा आपण आढावा घेतला. पण, परकीय आक्रमणांच्या पलीकडेही भारतीय विज्ञान परंपरा विस्मृतीत जाण्यामागे अनेक कारणे आहेत. आजच्या लेखातून या विज्ञान परंपरेच्या विस्मृतीच्या कारणांचा केलेला हा उहापोह...
भारतातील वैज्ञानिक प्रगतीचा इतिहास पाहिल्यास आपण त्याचे तीन भाग पाडू शकतो. पहिला अतिप्राचीन काळापासून साधारण इसवी सनाच्या बाराव्या शतकापर्यंतचा काळ. या काळाविषयीची माहिती आपल्याला त्रोटक अशा हस्तलिखित ग्रंथांमधून मिळते. या कालखंडातील ग्रंथांवर त्याचकाळात लिहिलेल्या टीका काही प्रमाणात उपलब्ध आहेत. परंतु, पद्यरूपात बर्याचशा ग्रंथांची रचना असल्याने त्यातील सर्वच सूत्रांची उकल योग्य प्रकारे झाली आहे, असे म्हणता येत नाही. दुसरा भाग म्हणजे, बाराव्या शतकापासून विसाव्या शतकापर्यंतचा काळ; या सर्व परंपरा एका व्यवस्थेअंतर्गत पद्धतशीरपणे नष्ट होण्याचा. सततच्या परकीय आक्रमणांशी झुंजणार्या समाजाकडून अतिशय उच्च दर्जाच्या ज्ञानपरंपरांची जोपासना होऊ न शकल्याने क्रमाक्रमाने या परंपरा नष्ट होत गेल्या आणि त्याचबरोबर सामाजिक विस्मृतीत ढकलल्या गेल्या.
संपूर्ण भारतावर एकाच वेळी परचक्राची छाया पसरली. असे झाले नसल्याने जिथे स्वकीयांच्या राजवटीत अशा विद्यांच्या जोपासनेस प्रोत्साहन होते, अशा ठिकाणी ही परंपरा पुढे चालू राहिल्याचे दिसते आणि विरोधाभास म्हणजे, भारतीय गणितातील ‘कलनशास्त्र’ यासारख्या विषयातील संशोधन याच काळात झाले आहे. त्यानंतरचा तिसरा भाग म्हणजे, आजचा काळ, जिथे आपण या सर्व इतिहासाचे पुनर्शोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत. आज आपल्याकडे ऐतिहासिक साधनांच्या आधारे त्या काळातील वैज्ञानिक प्रगतीचे ज्ञान काही प्रमाणात आहे. परंतु, ते परंपरागत नसल्याने त्याचा अन्वयार्थ आपल्याला योग्य प्रकारे लावता येतोच आहे, असे नाही. त्याचवेळी अतिरंजित आणि संपूर्ण नकारात्मक असे दोन्ही टोकांचे दावे पुरेशा माहितीच्या अभावात सतत होत असताना भारतीय विज्ञान परंपरेच्या योग्य त्या स्थानाचा सन्मान होण्याचा मध्यममार्ग दुर्दैवाने चोखाळला जात नाही. या योग्य स्थानाची ओळख जागतिक पटलावर होण्यासाठी केवळ या वैज्ञानिक परंपरेच्या प्रगतीचाच नाही, तर तिच्या र्हासाचा आणि विस्मृतीचा प्रवास कसा होता, ते समजून घ्यायला हवे.
अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात जगभर पसरलेल्या युरोपीय राष्ट्रांच्या साम्राज्याने युरोपीय समाजाच्या वंशश्रेष्ठत्वाच्या संकल्पनेस कसा जन्म दिला ते आपण पाहिले. याच श्रेष्ठत्वाच्या संकल्पनेतून प्रसवलेला विचार म्हणजे, जगभरातील सर्वश्रेष्ठ संकल्पनात्मक चिंतनाचे मूळ हे युरोपीय आहे. युरोपातील पुनरुज्जीवन कालखंडात जेव्हा विज्ञानाचा आणि गणिताचा अभ्यास साधारण एक हजार वर्षांच्या अंतराने सुरू झाला, तेव्हा प्राथमिक संकल्पनांचा आधार म्हणून त्यांच्या इतिहासातील ग्रीक आणि रोमन सिद्धांतांचा अभ्यास सर्वप्रथम सुरू झाला. याच कालखंडाच्या आसपास भारतीय गणिताचाही परिचय युरोपास झालेला होता. या काळातील युरोपीय गणिततज्ज्ञांनी चालू केलेली एक पद्धत म्हणजे, विविध सिद्धांतांना त्यांच्या संशोधकांच्या नावाने ओळखण्याची श्रेयनाम पद्धत. याच काळात काटकोन त्रिकोणाच्या कर्णाचा नियम पायथागोरसचा सिद्धांत म्हणून मान्यता पावला. ‘केप्लरचे ग्रहगतीचे सिद्धांत’ आणि ‘न्यूटनचा गुरुत्वाकर्षण सिद्धांत’ हे याच काळात मांडले गेले आणि त्या त्या संशोधकांच्या नावाने विख्यात झाले. भारतीय ज्ञानपरंपरांमध्ये श्रेयनामाची पद्धत नसावी. परंतु, त्यामुळे सर्व महत्त्वाच्या शोधांना त्यांच्या युरोपीय संशोधकांच्या नावे ओळखले जाऊ लागले. मध्ययुगातील ‘फिबोनाचीची सारणी’ आणि ‘पेलचे समीकरण’ त्यांना त्यांच्या भारतीय गणिताच्या ग्रंथांच्या अभ्यासातून मिळाले असावे असे दिसते. मात्र, त्यांचे श्रेयनाम या शोधांशी जोडले गेल्याने त्यामागील भारतीय परंपरेचे योगदान नाकारले गेले.
भारताच्या वैज्ञानिक संशोधनाच्या इतिहासात अडचणीचा ठरणारा दुसरा घटक म्हणजे ‘प्राच्यविद्या संशोधना’ची सुरुवातीची दिशा. ‘प्राच्यविद्या संशोधन’ हे वेदकाळाचा आणि त्यानंतरच्या ख्रिस्तपूर्व काळाचा अभ्यास करण्यासाठी सुरू झाले. ख्रिस्ताच्या संदेशाचा प्रकाश जगात पसरण्यापूर्वी अंधःकारयुक्त जगातील बाल्यावस्थेतील समाज कसे होते, हे समजून घेणे असा त्यामागचा उद्देश होता. या संस्कृतीकडून आपल्याला शिकण्यासारखे काही असेल किंवा आपल्या प्रगतीच्या मुळाशी या संस्कृतीचे काही योगदान असेल, याची कल्पनाही या प्राच्यविद्या अभ्यासकांच्या मनाला शिवली होती? का असा प्रश्न पडतो. दुसरे म्हणजे, प्राचीन काळाबद्दल जी दृष्टी या अभ्यासकांनी बाळगली, तीच दृष्टी त्यांनी आधुनिक म्हणजे वेदोत्तर कालखंडाबद्दल बाळगली. त्यामुळे या काळात झालेल्या गणिती आणि वैज्ञानिक संशोधनाचा आढावा कधी जागतिक परिप्रेक्ष्यात घेतला गेला नाही. या काळातील वैज्ञानिकांमध्ये संकल्पनात्मक आदानप्रदान कसे होत होते आणि संकल्पनांचे प्रवाह कसे होते, याचा अभ्यास एक तर केला गेला नाही किंवा जेव्हा केला गेला, तेव्हा त्यामागे वंशश्रेष्ठत्वाचा दुषित दृष्टिकोन होता. याच काळात भारतीय वैज्ञानिक परंपरेचा र्हास जवळपास पूर्णत्वास पोहोचला होता. पारंपरिक पद्धतीतून प्रशिक्षित अशा भारतीय विद्वानांची वानवा असल्याने ही परंपरा समर्थपणे जगास उलगडून सांगेल, असा कोणी प्राच्यविद्येचा अभ्यासक नव्हता. स्वाभाविकपणे भारतीय विज्ञानपरंपरेचा अभ्यास एकांगी पद्धतीने होत राहिला.
आजच्या काळात भारतीय विज्ञान परंपरेच्या अभ्यासातील अडचणी आपण पाहिल्या. मागील दोन शतकातील प्राच्यविद्या अभ्यासकांच्या विशिष्ट दृष्टिकोनामुळे हे आकलन एकांगी कसे राहिले, हेही आपण पाहिले. पण, या परिस्थितीच्या मुळाशी जो विज्ञानपरंपरेचा क्रमबद्ध विनाश आहे, तो कशामुळे घडला, हे पाहणेही आवश्यक आहे. इसवी सन पूर्व दुसरे किंवा तिसरे शतक ते इसवी सन १२०० हा साधारण दीड सहस्रकाचा काळ भारतीय वैज्ञानिक परंपरेचा सुवर्ण काळ म्हणता येईल. या काळाचे महत्त्वाचे लक्षण म्हणजे, समर्थ हिंदू राजवटींच्या आधिपत्याखालील स्थिर सामाजिक परिस्थिती. स्थिर राजकीय परिस्थितीमुळे स्वाभाविकपणे अर्थव्यवहारात आलेली गती त्या काळात भारतास जागतिक व्यापारात अग्रगण्य स्थानावर घेऊन गेलेली होती. वैज्ञानिक प्रगतीसाठी या दोन्ही परिस्थिती आवश्यक आहेत. ज्ञानोपासनेची कदर करणारा राजा आणि ज्ञानोपासना करताना ऐहिक चरितार्थ चालावा म्हणून आवश्यक ती आर्थिक व्यवस्था पाहणारा श्रेष्ठीवर्ग, यांचे पाठबळ नसेल, तर स्वतःच्या आणि परिवाराच्या जीविताच्याच विवंचनेत असताना वैज्ञानिक प्रगती होऊ शकत नाही.
दुसरे म्हणजे, वैज्ञानिक प्रगती हे एखाद दुसर्या विद्वान वैज्ञानिकाचे काम नव्हे. अनेक वैज्ञानिकांनी शोधलेल्या छोट्याछोट्या तत्त्वांचा समुच्चय होऊन एखादा सिद्धांत तयार होत असतो. त्यामुळे संशोधनाची एक परंपरा निर्माण झाल्याशिवाय एखाद्या शास्त्रशाखेत मोठी प्रगती करता येत नाही. अशा प्रगतीची केंद्रे म्हणजे विद्यापीठे. वैज्ञानिक प्रगतीच्या सुवर्ण युगात संपूर्ण भारतभर पसरलेली अत्यंत नावाजलेली विद्यापीठे होती.
या परंपरेवर पहिला आघात झाला तो इस्लामी आक्रमणाचा. इस्लामी आक्रमण भारतीय ज्ञानपरंपरा नष्ट होण्यामागे तीन-चार प्रकारे कारणीभूत ठरले. सर्वप्रथम म्हणजे विद्यापीठांची प्रत्यक्ष जाळपोळ. इस्लामच्या स्थापनेपूर्वीचा काळ हा अज्ञान, अंधकाराचा काळ मानला गेल्याने त्यापूर्वी निर्माण झालेल्या ज्ञानाकडे पाहण्याची इस्लामी राज्यकर्त्यांची दृष्टी पूर्वग्रहाची होती. या ज्ञानाचा प्रसार करणारी विद्यापीठे त्यांच्या दृष्टीने हानिकारक होती. त्या काळात बरेचसे ग्रंथ हे हस्तलिखित स्वरूपात असल्याने त्यांच्या मर्यादित प्रती उपलब्ध असत. त्यामुळे संपूर्ण ग्रंथालये जाळल्याने कित्येक ग्रंथ असेच नष्ट झाले. त्यातूनही सिद्धांत ग्रंथांच्या अधिक प्रती देशभर उपलब्ध असतील. परंतु, टीकाग्रंथ हे त्या विद्यापीठांच्या पुरते मर्यादित असतील, तर ते पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता अधिक. आज सिद्धांत ग्रंथांमधील तत्त्वे समजून घेण्यास या टीकाग्रंथांची अनुपलब्धी हा मोठा अडसर ठरू शकतो. विद्यापीठ संस्थाच नष्ट झाल्याने विद्वानांची पुढील पिढी निर्माण करण्याचे कार्यच खुंटले. इस्लामी आक्रमण असे इथे त्याच्या भारतभर निर्माण झालेल्या व्याप्तीमुळे म्हटले आहे. पण, पंधराव्या शतकात गोव्यात झालेल्या ख्रिस्ती आक्रमणाची पद्धत हीच राहिलेली आहे.
या आक्रमणाचा दुसरा परिणाम म्हणजे, या ज्ञानाचा प्रसार करणारा जो शिक्षकवर्ग आहे त्याची प्रत्यक्ष हत्या. मोठ्या प्रमाणावर शिक्षकवर्ग नष्ट झाल्याने भारतीय परंपरांचे ज्ञान छोट्या गावांतील शाळांमध्ये अडकून राहिले. स्वाभाविकपणे उच्च विज्ञानासारखे विषय शिकवण्यावर भर राहिला नाही. तसेच, या विद्यांचे शिक्षण घेतल्यास जीवाचे भय निर्माण झाल्याने कित्येकजण विज्ञानापासून दूर वळले असतील. इस्लामी सत्ता दृढमूल झाल्यावर विद्वानांचा राजाश्रय कमी झाला. त्यामुळे विज्ञानाच्या प्रगतीस आवश्यक स्थैर्य आणि प्रोत्साहन दोन्ही कमी झाल्याने हळूहळू या क्षेत्राची अधोगती सुरू झाली. त्यातच इस्लामी सत्तांचे व्यापारविषयक आणि करविषयक धोरण अतिशय पक्षपाती प्रकारचे होते. त्यामुळे श्रेष्ठीवर्गाचा पाठिंबा हळूहळू कमी होऊ लागला. तरीही विजयनगर साम्राज्याच्या आधारे उत्तरकाळात निर्माण झालेली केरळी गणिततज्ज्ञ परंपरा दाखवून देते की, भारतीय वैज्ञानिकांनी परिस्थिती थोडी जरी अनुकूल झाली, तरी विद्याभ्यासाकडे पुन्हा लक्ष दिले होते.
थोडक्यात म्हणजे, अब्राहमिक पंथांच्या अवैज्ञानिक दृष्टिकोनामुळे जेव्हा भारतावर त्यांचा राजकीय अंमल बसला, तेव्हा वैज्ञानिक परंपरा नष्ट होण्यास सुरुवात झाली. आपण युरोपकडे जर इसवी सनाच्या पहिल्या सहस्रकात पाहिले, तर ख्रिस्ती धर्ममताचा पगडा आणि नंतर इस्लामी आक्रमकांशी झालेल्या क्रुसेड यामुळे तिथे वैज्ञानिक प्रगतीची अशीच वाताहत होऊन अंधारयुग आल्याचे दिसते. चर्चचे दडपण झुगारून आणि भारतीय गणितास आत्मसात करून युरोपने या अंधारयुगाचा अंत केला आणि वैज्ञानिक प्रगतीत मोठीच झेप घेतली. याच काळात भारतात इस्लामी आक्रमकांनी हैदोस घालून, विज्ञानाची परंपरा नष्ट करणे सुरू केले होते. या ऐतिहासिक घटनाक्रमाचा परिपाक म्हणून युरोपात औद्योगिक क्रांती झाली आणि वैज्ञानिक प्रगतीत ते जगाच्या पुढे निघून गेले. परंतु, वसाहतींमधून केलेल्या लुटीमुळे आलेली आर्थिक समृद्धी आणि भारतीय गणिताचा पाया यांच्याशिवाय युरोपची प्रगती संभव होती का? हा प्रश्न राहतोच.
विज्ञानपरंपरेच्या विस्मृतीची कारणे तिचे जागतिक इतिहासातील योग्य स्थान जाणून घेण्यास आवश्यक आहेतच. परंतु, आजच्या आधुनिक जगातील सर्वंकष विज्ञान व तंत्रज्ञानाचे मूळ केवळ युरोपीय नाही, तर भारतीयांचा त्यात मोलाचा वाटा आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर मुक्तहस्ताने करताना त्याच्या जडणघडणीत कुठेतरी आपलाही हातभार आहे, ही जाणीव सामाजिक स्वाभिमानासाठी महत्त्वाची आहे.
(लेखकाने मुंबईतील टीआयएफआर येथून खगोलशास्त्रात ‘पीएच.डी’ प्राप्त केली आहे. सध्या एका खासगी वित्तसंस्थेत नोकरी करत असून, ‘प्रज्ञा प्रवाह’ या संस्थेचे कोकण प्रांत कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.)
९७६९९२३९७३