सिनेक्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करत, समाजभान जपणार्या वनिता राजे गडदे यांची गोष्ट...
एखाद्या कलाकारासाठी सर्वांत आनंदाचा क्षण कोणता? हा प्रश्न जर आपण कुठल्याही कलाकाराला विचारला, तर त्याचे स्वाभाविक उत्तर असेल, पाठीवर मिळालेली कौतुकाची पहिली थाप. कारण, या आशीर्वादामुळेच त्या कलाकाराला पुढची गरुडभरारी घेण्याची प्रेरणा मिळते. वनिता राजे यांना ही कौतुकाची थाप त्या दुसरीत असतानाच मिळाली. दि. १५ ऑगस्ट रोजीच्या एका कार्यक्रमात वनिता गाणे गात होत्या. लाऊडस्पीकरवरून या गाण्याचे बोल सर्वदूर ऐकू येत होते. वनिता यांच्या आई कपडे धूत होत्या. आपल्या लेकीचे गाणे ऐकण्यासाठी त्या वस्तीच्या बाहेर आल्या. आपल्या लेकीला गाताना बघून त्यांचे डोळे भरून आले. आईने दिलेली कौतुकाची थाप वनिता यांच्यासाठी प्रेरणादायी ठरली.
वनिता राजे यांचे बालपण मुंबईतील चेंबूर, वाशी नाका येथील झोपडपट्टीत गेले. लहानपणापासूनच धडपडत स्वतःची वेगळी वाट निर्माण करण्याचा चंग त्यांनी बांधला होता. इयत्ता पहिलीत असताना भगवद् गीतेमधील १४वा अध्याय त्यांना मुखोद्गत होता. याव्यतिरिक्त मैदानी खेळांमध्येदेखील त्यांना रुची होती. लहानपणापासून शिकताना, इतरांना शिकवण्याची कामेसुद्धा त्यांनी केली. शिक्षक होण्याचा छंद त्यांना लहानपणीच जडला होता. पुढे जाऊन, वनिता यांनी ‘रयत शिक्षण संस्थे’च्या वाशी येथील मॉडर्न कॉलेज इथून वाणिज्य शाखेत पदवी संपादित केली. यानंतर जाहिरात व्यवस्थापनाचा तीन वर्षांचा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केला. याचवेळी रंगभूमीशी त्यांची नाळ जोडली गेली. त्यांनी ‘नाट्यभूमी, नवी मुंबई’ या संस्थेकडून कला प्रशिक्षण व निवेदनाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘मांडवाच्या मंगारी चाललंय काय!’ या आगरी नाटकामध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली. शाहीर दामोदार विटावकर यांचे स्मारक बांधण्यासाठी या नाटकाचे ५० प्रयोग करण्यात आले. नवी मुंबईच्या विविध गावांमध्ये या नाटकाचे प्रयोग झाले. तुर्भेकर आणि मंडळी यांच्या समूहातून दूरदर्शन केंद्र वरळी येथे होळी सणांच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये वनिता यांच्या नृत्य सादरी करणाचादेखील समावेश होता.
रंगमंचावर सहज वावरणार्या वनिता यांना चित्रपटसृष्टी खुणावत होती. त्यांचा पहिला लघुपट ‘चित्रांगणा’ याला जागतिक स्तरावर तब्बल २७ पुरस्कारांना सन्मानित करण्यात आले. या लघुपटाचे लेखन, दिग्दर्शन वनिता यांनी स्वतःच केले होते. ‘महिला सक्षमीकरण’ हा विषय केंद्रस्थानी ठेवून बनवलेला हा लघुपट लोकप्रिय ठरला. सिनेमा, लघुपट यांच्या निर्मितीसाठी ‘जीएस सिनेएंटरटेनमेंट’ची स्थापना त्यांनी केली. या संस्थेच्या मार्गदशनामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये अनेक कलाकारांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. सिनेमा ही जीवनातील आवड असली, तरी समाजकार्याचा ध्यास त्यांनी घेतला होता. २००१ साली त्यांचे लग्न पोलीस कॉन्स्टेबल किशोर गडदे यांच्यासोबत झाले. २००२ साली ‘श्री धनलक्ष्मी महिला मंडळा’ची स्थापना केली. सदर एनजीओच्या अंतर्गत महिलांवर होणार्या घरगुती अत्याचाराच्या विरोधात त्यांनी कार्याला सुरुवात केली. त्यांच्या इतक्या वर्षांच्या प्रवासात त्यांचे पती किशोर गडदे सदैव त्यांच्या पाठिशी उभे होते. परंतु, दुर्दैवाने २०२० साली त्यांचे निधन झाले. या शोकाकुल परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांची लेखणीच त्यांच्या मदतीला धावून आली. आतापर्यंत ४० पेक्षा अधिक पटकथांचे लेखन त्यांनी केले आहे. याव्यतिरिक्त एक नवाकोरा मराठी सिनेमासुद्धा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘जीएस सिनेएंटरटेन्मेंट’च्या माध्यमातून कलाकारांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक समूह नृत्य स्पर्धांमध्येसुद्धा सहभाग नोंदवला. इतकेच नव्हे, तर या स्पर्धांमध्ये त्यांच्या समूहाने घवघवीत यशही प्राप्त केले.
भारतातील चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हे वनिता यांचे प्रेरणास्थान. अभिव्यक्तीचे एक समृद्ध दालन त्यांच्यामुळे भारतीयांना खुले झाले. परमपूज्य माताजी निर्मला देवी यांच्यावर त्यांची नितांत श्रद्धा आहे. दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्या व्यक्तिमत्त्वाची छाप त्यांच्यावर पडली आहे, असे त्या सांगतात. वनिता म्हणतात की, “भूमिका कितीही कठीण असली, तरी मी ती साकारू शकते, याचे बळ मला स्मिता पाटील यांच्यामुळे मिळाले.” सिनेसृष्टीला ‘मायानगरी’ म्हणूनही ओळखले जाते. या नगरीत येऊ इच्छिणार्या युवकांना मार्गदर्शन करताना त्या म्हणतात की, “आपल्याला किती कामे मिळाली हे महत्त्वाचे नाही, आपण मिळालेली कामे सक्षमपणे कसे पूर्ण करू शकतो, यावर युवकांनी भर द्यायला हवा. भूमिका कुठलीही असो, एक कलाकार म्हणून आपण प्रेक्षकांवर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला पाहिजे. सिनेसृष्टीत काम करताना अहंकार बाजूला सारून समूहभान बाळगणे जास्त महत्त्वाचे आहे. एकमेकांना सहाकार्य करूनच आपण यशाच्या शिखरावर पोहोचू शकतो.” बर्याचदा असे म्हटले जाते की, सिनेसृष्टीमध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते. याविषयी बोलताना वनिता म्हणतात की, “सिनेसृष्टीत येणार्या महिलांचा स्वतःचा एक दृष्टिकोन असतो. कधी कधी काम करताना काही फसवी लोकं आपल्याला भेटतात. पण, म्हणून संपूर्ण चित्रपटसृष्टीच्या संदर्भात विधान करणे चुकीचे आहे,” असे त्या म्हणतात. नव्या कलाकारांना व्यासपीठ मिळावे, यासाठी वनिता कायम तत्पर असतात. त्याचबरोबर आपले समाजभान जपत, अनेक महिलांसाठी त्या कार्यरत असतात. वनिता राजे गडदे यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने शुभेच्छा!
९९६७८२६९८३