Waqf Amendment Bill : उबाठाची गोलमाल भूमिका, बाळासाहेब ठाकरे नव्हे तर राहुल गांधींच्या पावलावर पाऊल

    02-Apr-2025
Total Views | 47


Waqf Amendment Bill 
 
नवी दिल्ली : वक्फ सुधारणा विधेयकाविषयी उबाठा शिवसेनेने गोलमाल भूमिका घेऊन वक्फ सुधारणांना विरोध आहे की पाठिंबा हे सांगण्याचे अपेक्षेप्रमाणेच टाळले आहे. त्यामुळे उबाठाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाकीत खरे ठरले आहे.
 
लोकसभेत बुधवारी वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात आले. सुमारे १० तासांहून अधिक काळ चाललेल्या चर्चेमध्ये सत्ताधारी आणि विरोधकांनी भाग घेऊन विधेयकाला विरोध आणि पाठिंबा अतिशय स्पष्ट शब्दात दिला. मात्र, त्याला अपवाद ठरले ते उबाठा गटाचे खासदार. उबाठातर्फे खासदार अरविंद सावंत यांनी भाषण केले. मात्र, आपल्या भाषणामध्ये उबाठाचा वक्फ सुधारणांना पाठिंबा आहे की विरोध, हे मात्र त्यांनी सांगितले नाही. अखेरिस केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्यांक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी अखेर सावंत यांना “तुमचा विधेयकाला पाठिंबा आहे की विरोध हे तरी सांगा” असा प्रश्न विचारला.
 
उबाठा खासदार सावंत यांनी आपल्या भाषणात अजब दावे केले. ते म्हणाले, केंद्र सरकारच्या मनात काहीतरी वेगळेच आहे, सरकारला जमीन बळकावायची आहे. सरकारच्या बोलण्यात आणि कृतीत फरक आहे. या विधेयकाद्वारे न्याय देण्याचा कोणताही हेतू नाही. भाजपने आम्हाला (उबाटा) हिंदुत्व शिकवू नये. देशाच्या स्वातंत्र्यात भाजपचे कोणतेही योगदान नाही. या विधेयकाद्वारे न्याय मिळणार नाही, असे दावे सावंत यांनी केले. केंद्र सरकार आज मुस्लिमांकडून संपत्ती काढून घेण्याचा कायदा करत आहे, भविष्यात असाच कायदा हिंदू आणि ख्रिश्चनांसाठी केला जाईल. त्याचप्रमाणे अशाप्रकारे संपत्ती काढून ती उद्योगपतांनी द्यायचा भाजप सरकारचा डाव असल्याचाही हास्यास्पद आरोप सावंत यांनी केला.
 
बाळासाहेबांना आज वेदना झाल्या असत्या – डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार – शिवसेना
 
शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वक्प सुधारणा विधेयकास पाठिंबा दिला. यावेळी त्यांनी गोलमाल भूमिका घेणाऱ्या उबाठा गटावर जोरदार टिका केली. ते म्हणाले, उबाठा गटाचे खासदार अरविंद सावंत यांचे भाषण अतिशय दुर्दैवी होते. उबाठा आता नेमक्या कोणत्या विचारसरणीचे पालन करत आहे, ते आजच्या भाषणाने स्पष्ट झाले आहे. या विधेयकाच्या निमित्ताने उबाठाला आपल्या चुका सुधारण्याची संधी होती, ती त्यांनी गमावली आहे. आज बाळासाहेब ठाकरे हयात असते आणि त्यांनी ही भूमिका बघितली असती तर त्यांना अतिशय वेदना झाल्या असत्या, असाल टोला खासदार डॉ. शिंदे यांनी लगावला.
 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेच होते...
 
उबाठा गटाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ एप्रिल रोजी भाकित केले होते, ते अखेर खरे ठरल्याचे दिसून आले. वक्फ सुधारणा विधेयक उद्या संसदेत ! बघू या उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना, हिंदूहृदयसम्राट, वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विचार राखणार की राहुल गांधी यांच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करीत राहणार?, अशी पोस्ट मुख्यमंत्री फडणवीस यांनी एक्सवर केली होती.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121