वक्फ सुधारणा विधेयकावरून संजय राऊतांचा अजब दावा! म्हणाले, वक्फचा आणि हिंदुत्वाचा...
02-Apr-2025
Total Views | 21
मुंबई : संसदेत लवकरच वक्फ सुधारणा विधेयक मांडण्यात येणार असून उबाठा गट याबाबत कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. परंतू, त्याआधीच संजय राऊतांनी वक्फ सुधारणा विधेयकावरून अजब दावा केला आहे. वक्फचा आणि हिंदुत्वाचा काहीही संबंध नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, "शिवसेनाप्रमुखांनी वक्फ बोर्डसंबंधी काही भूमिका मांडली होती हे दाखवून द्यावे. आम्हाला हिंदूत्व शिकवू नये. वक्फच्या विधेयकाचा आणि हिंदूत्वाचा काहीही संबंध नाही. हे एक नॉर्मल विधेयक आहे. सरकार त्यात काही सुधारणा करणार आहे. त्यामुळे हिंदूत्वाचा आणि या विधेयकाचा कुणी मेळ घालत असल्यास तो मुर्खपणा आहे. इतर बिलांप्रमाणेच हे बिल आहे. भविष्यात काही उद्योगपतींना वक्फ बोर्डाच्या संपत्तीवर कब्जा मिळवणे सोपे जावे यासाठी या बिलाचे स्पष्ट प्रयोजन दिसत आहे."
"शिवसेना ही प्रखर हिंदूत्ववादी आहे. शिवसेना ही प्रगतीशील विचारांचा हिंदूत्ववाद मानणारी आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सातत्याने हिंदुत्वाला सुधारणा आणि विज्ञानवादाचा पाठींबा दिला आहे. आम्ही स्वत: कलम ३७० विधेयकाला पाठिंबा दिला. कारण तो विषय राष्ट्रीय सुरक्षा, राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदूत्वाशी संबंधित होता. तसेच आम्ही तिहेरी तलाकच्या विधेयकालाही विरोध केला नाही. कारण तो विषय गरीब मुस्लीम महिलांसंदर्भात होता. वक्फ बोर्डाच्या विधेयकाचा विषय हा त्यांच्या लाखों कोटी रुपयांच्या जमिनींसंदर्भात आहे. भविष्यात या मालमत्ता आपल्या लाडक्या उद्योगपतींना देता येईल का यासाठी झालेली ही पायाभरणी आहे. आम्ही रात्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेवरून सर्व खासदारांनी चर्चा केली. आमची भूमिका ठरलेली असून शेवटच्या क्षणी ती दिसेल. काही गोष्टी फ्लोअरवर गेल्यावर करायच्या असतात आणि त्या आम्ही करू," असे संजय राऊत म्हणाले. दरम्यान, आता वक्फ विधेयकावर उबाठा गट कोणती भूमिका घेणार याबाबत सर्वांना उत्सुकता लागली आहे.